पंतप्रधान कार्यालय
जनऔषधी दिनानिमित्त प्रधानमंत्री जनऔषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी साधलेला संवाद
Posted On:
07 MAR 2020 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2020
नमस्कार !!
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभर हजारो जनऔषधी केंद्रांशी जोडले गेलेल्या सर्व सहकारी-मित्रांना होळीच्या शुभेच्छा आणि या कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत! अनेक केंद्रांवर माझे, मंत्रिमंडळातील सहकरी देखील उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना दुसऱ्या जनऔषधी दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो!
गेला आठवडाभर साजरा करण्यात आलेल्या जनऔषधी सप्ताहाचाही आज शेवटचा दिवस आहे. या प्रशंसनीय उपक्रमासाठी मी सर्व जनऔषधी केंद्रांच्या संचालकांचे, भारत सरकारच्या अधिकाऱ्यांचे आणि या केंद्रांसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो!
मित्रांनो,
जनऔषधी दिवस केवळ एक योजना साजरा करण्याचा दिवस नाही, तर अशा अनेक भारतीय व्यक्ती, ज्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे, अशांशी संवाद साधण्याचा दिवस आहे. त्यांच्या माध्यमातून इतर अनेक लोकांपर्यंत देखील ही योजना पोहचवण्यासाठी या योजनेचा प्रचार करण्याची ही संधी आहे. जेणेकरुन भारतातील प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळावा. प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या आरोग्यासाठी आम्ही चार सुत्रांवर काम करतो आहोत.
पहिले सूत्र :-प्रत्येक भारतीयाला आजारी पडण्यापासून रोखणे.
दुसरे- आजारपण आल्यास त्यांना माफक दरात उत्तम उपचार देणे.
तिसरे, उपचारासाठी उत्तम आणि आधुनिक रुग्णालये असावीत, आवश्यक तेवढे चांगले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी असावेत, याची सोय केली जात आहे. आणि,
चौथे सूत्र आहे, मिशन मोडवर काम करत आव्हानांचा सामना करणे.
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना म्हणजे पीएमबीजेपी या चार सूत्रांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. हा देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वाजवी दरात उत्तम औषधे पोहचवण्याचा संकल्प आहे. मला खरोखर आनंद होत आहे की, आता संपूर्ण देशभरात 6 हजार पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रे उघडली आहेत. जसजशी ही साखळी वाढते आहे, तसतसा या योजनेचा लाभ देखील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतो आहे. आज दर महिन्याला एक कोटींपेक्षा अधिक कुटुंबे या केंद्रांच्या माध्यमातून खूप स्वस्त औषधांचा लाभ घेत आहेत.
आपण सर्वांनीच अनुभव घेतला असेल, की जनऔषधी केंद्रांवर मिळणाऱ्या औषधांची किंमत बाजारातील किमतींपेक्षा 50 ते 90 टक्के कमी असते. उदाहरणार्थ कर्करोगाच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे औषध, जे बाजारात सुमारे साडे सहा हजार रुपयांना मिळते, ते जनऔषधी केंद्रावर केवळ साडेआठशे रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे, आधीच्या तुलनेत, उपचारांवरचा खर्च अत्यंत कमी झाला आहे.
मला सांगण्यात आले आहे की पूर्ण देशभरात आधी कोट्यवधी गरीब आणि मध्यमवर्गाच्या लोकांचा औषधांवर जो खर्च होत असे, त्या तुलनेत आता जनऔषधी केंद्रातून घेतलेल्या औषधांमुळे सुमारे दोन-अडीच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. आपल्यासारख्या देशात एक कोटी कुटुंबांची दोन-अडीच हजार कोटी रुपयांची बचत हीच एक खूप मोठी मदत आहे. 2200 रुपयांची बचत जनऔषधी केंद्रांमुळे झाली आहे.
मित्रांनो,
आजच्या या कार्यक्रमात जनऔषधी केंद्र चालवणारे अनेक लोकदेखील उपस्थित आहेत. आपण सर्व अत्यंत स्तुत्य कार्य करत आहात. तुमच्या या कामाची यथोचित दखल घेतली जावी यासाठी सरकारने या योजनेशी संबंधित पुरस्कार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.मला विश्वास आहे की या पुरस्कारांमुळे जनऔषधीच्या क्षेत्रात एक नवी निकोप स्पर्धा सुरु होईल, ज्याचा लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला होईल,पर्यायाने देशाला होईल.
चला तर मग, आजची चर्चा सुरु करु या—
मला सांगण्यात आले आहे की आपल्याला सर्वात आधी आसामच्या गुवाहाटी येथे जायचे आहे-
प्रश्न. 1—पंतप्रधान महोदय, माझे नाव अशोक कुमार बेटाला आहे आणि मी आसामच्या गुवाहाटी इथला रहिवासी आहे. माझे वय 60 वर्षे इतके आहे.
मला मधुमेह आणि रक्तचापाचा त्रास आहे. मी हार्ट पेशंट देखील आहे. पाच वर्षांपूर्वी माझे ऑपरेशन देखील झाले होते, तेव्हापासूनच मी औषधे घेत आहे. गेल्या दहा महिन्यांपासून मी जनऔषधी केंद्रांतून सातत्याने औषधे घेत आहे.
जेव्हापासून मी जनऔषधी केंद्रातून औषधे घेणे सुरु केले आहे, तेव्हापासून माझी दरमहा 2500 रुपयांची बचत होते आहे. या वाचलेल्या पैशातून मी माझ्या नातीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात पैसे जमा करु शकतो आहे.
आपल्या अशा योजनांसाठी खूप खूप धन्यवाद !!
आपण माझे औषधांचे टेन्शन तर कमी केले आहे, मात्र ह्या कोरोना वायरसचे जे टेन्शन आहे, त्याच्याबद्दल सगळीकडे जी चर्चा सुरु आहे. या वायरसपासून बचाव करण्यासाठी आपण काय करायला हवं?
उत्तर : 1
सर्वात आधी आपल्याला खूप खूप शुभेच्छा ! जनऔषधीमुळे आपली जी बचत होते आहे, ते पैसे आपण आपल्या नातीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वापरत आहात. आणि तुम्ही विचारलेला दुसरा प्रश्न-कोरोना वायरसविषयी... तर हे खरेच आहे की अनेक लोक ह्या विषाणूविषयी चिंतेत आहेत.
मला असं वाटतं की या वायरसचा सामना करण्यासाठी तुम्ही आणि आम्हीही सतर्क राहणे अत्यंत महत्वाचे आहे. केंद्र सरकार असो. किंवा राज्य सरकारे, या प्रकरणी आवश्यक ती सर्व व्यस्था आणि देखरेख करत आहेत. आपल्याकडे कुशल डॉक्टर्स आणि वैद्यकीय चमू देखील आहेत, संसाधने आहेत आणि जागरूक नागरिक देखील आहेत. आपल्याला फक्त संपूर्णतः दक्ष रहायला हवे आहे, त्यात कुठे कमी पडायला नको. नेमकी काय दक्षता घ्यायची, हे वेगवेगळ्या माध्यमातून सांगितले जात आहे. मी पुन्हा एकदा त्या सगळ्या तुम्हाला सांगतो.
मित्रांनो.
एकतर आपल्याला गरज नसतांना कुठे एकत्र येणे टाळायला हवे आणि दुसरे म्हणजे जेव्हा जेव्हा शक्य असेल, तेव्हा तेव्हा आपण सर्वांनी पुनःपुन्हा आपले हात धूत राहायला हवे. आपल्या चेहऱ्याला, आपले नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करण्याची सवय आपल्याला असते. तेव्हा जेवढे शक्य होईल, ती सवय आपण टाळायला हवी आणि स्वच्छ धुतलेल्या हातांनीच आपल्या चेहऱ्याला स्पर्श करायचा आहे. तज्ञांचे असे मत आहे की खोकला आल्यावर किंवा शिंकतांना जे थेंब पडतात, त्यांच्या संपर्कात आल्यावर हा विषाणू पसरतो. अशावेळी ज्या कुठल्या वस्तूवर हे थेंब पडतात, त्यात हा विषाणू अनेक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे आपण वारंवार साबणाने हात धुणे गरजेचे आहे. आणखी एक सवय आपल्याला लावून घ्यायला हवी आहे. जर आपल्याला खोकला किंवा शिंक येत असेल, तर असा प्रयत्न करा की त्याचे थेंब दुसऱ्या कोणावर पडणार नाही. आणि जो रुमाल तुम्ही शिंकताना वापराल, त्याचा दुसऱ्या कोणी वापर करु नये, याचीही काळजी घेतली जावी.
मित्रांनो,
ज्या लोकांना याचा संसंर्ग झाला आहे, त्यांना तर तपासणी केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेच, मात्र जर कोणाला असा संशय असेल की तो कोणत्या संसर्ग लागलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला आहे, तर त्यानेही घाबरण्याची गरज नाही. आपल्या तोंडावर मास्क लावून किंवा कुठल्या कापडाने तोंड झाकून त्याच्याजवळच्या रुग्णालयात तपासणीसाठी जावे. कुटुंबात जे इतर लोक असतात, त्यांना आजाराचा संसर्ग होण्याची जास्त भीती असते, अशावेळी त्यांनी आवश्यक त्या चाचण्या करुन घ्यायला हव्यात. अशा लोकांनी मास्क घालून, हातात मोजे घालून इतरांपासून काही अंतर ठेवून राहायला हवे.
मास्क घालायचा आहे की नाही, या संदर्भात तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. मात्र आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की खोकला आल्यावर अथवा शिंक आल्यावर पडणारे थेंब इतर कोणाच्या अंगावर पडणार नाहीत. मास्क घातला असेल तर अनेकदा तो नीट लावण्यासाठी आपला हात नकळतपणे तोंडाकडे जातो. त्यामुळे बचाव होण्यापेक्षा संसर्ग होण्याचीच भीती जास्त असते.
मित्रांनो,
अशा वेळी अफवा देखील खूप वेगाने पसरत असतात. कोणी म्हणते हे नाही खायचं, हे करु नका. तर कोणी आणखी काही गोष्टी घेऊन येतील आणि सांगतील की ह्या खाल्याने कोरोनापासून संरक्षण होते. आपल्याला या अफवांना बळी पडायचे नाही. आपण जे करु ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करुया. आणि हो, सगळ्या जगानेच आता हस्तांदोलनाऐवजी हात जोडून नमस्कार करण्याची सवय लावून घेतली आहे. आपणही या काळात हात जोडून नमस्कार करण्याची सवय लावून घ्यायला हवी.
मोदी जी, सादर प्रणाम सर! माझे नाव मुकेश अग्रवाल आहे आणि मी देहराडून इथे अनेक जनऔषधी केंद्रे चालवतो. माझ्या आजूबाजूला मी अनेक गरीब रुग्ण पाहिले ज्यांना महागडी औषधे परवडत नसल्याने ते अत्यंत दयनीय स्थितीत होते.त्यांना मदत करण्याची माझी इच्छा होती, त्यातूनच मला ही केंद्रे सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. मी यासाठी आमच्या मुख्यमंत्र्याशी संपर्क साधला. आणि आम्ही एक धर्मदाय विश्वस्त संस्था स्थापन केली, ज्यामार्फत आम्ही रुग्णांना मोफत औषधे देऊ शकतो. आमच्याकडे माफक दरातील औषधेंही मिळतात.
प्रश्न- 2 नमस्कार पंतप्रधान महोदय,
माझे नाव दीपा शहा आहे. मी उत्तराखंडच्या देहरादूनची रहिवासी आहे. माझे वय 65 वर्षे आहे.
2011 साली मला अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासूनच मी औषधे घेत आह. मात्र 2015 पासून मी जनऔषधी केंद्रातून औषधे घेत आहे. माझे यजमान देखील दिव्यांग आहेत.आता जनऔषधीमुळे आधीच्या तुलनेत माझा खर्च 3000 रुपये कमी झाला आहे. माझा अनुभव आहे की हि औषधे स्वस्त आहेत आणि त्यांची गुणवत्ता पण उत्तम आहे. आधी मला बोलतांना आणि चालतांना खूप त्रास होत असे.मात्र, आता त्यात खूप सुधारणा झाली आहे. मात्र, लोकांमध्ये अजूनही जेनेरिक औषधांविषयी अनेक भ्रम आहेत. असे भ्रम दूर करण्यासाठी काय करायला हवे?
उत्तर -2 :
तुमचं म्हणणं खरं आहे के जेनेरिक औषधांविषयी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. काही जुन्या अनुभवांमुळे काहीलोकांना असेही वाटते की औषढे एवढी स्वस्त कशी असू शकतात? यात काही काम तर नाही? यात काही कमतरता तर नाही? रंगीत गोळ्या तयार करुन कोणी खोटी औषधे तर विकत नाही ना? मात्र दीपाजी, आपल्याला बघून आता देशभरातल्या लोकांच्या मनात याविषयी विश्वास निर्माण होईल. जेनेरिक औषधाची ताकद काय आहे, हे आज तुम्ही पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. आणि आपला स्वतःचा अनुभव कुठल्याही प्रयोगशाळेपेक्षा अधिक महत्वाचा आहे.
अशा सर्वच मित्रांना मला सांगायचं आहे की ही औषधे जगभरातल्या बाजारात मिळणाऱ्या औषधांच्या तुलनेत गुणवत्तेत कुठंही कमी नाहीत. ही औषधे उत्तमोत्तम प्रयोगशाळांनी प्रमाणित केलेली असतात. सगळ्या प्रकारच्या कठोर तपासणीतून तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतरच ही औषधे खरेदी केली जातात. जर एखाद्या औषध निर्मात्याविरोधात काही तक्रारी आल्या तर, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाते.
ही औषधे भारतात तयार होतात म्हणून ती स्वस्त आहेत. भारतात तयार झालेल्या जेनेरिक औषधाना जगभरात मागणी आहे. सरकारने प्रत्येक रुग्णालयात जेनेरिक औषधे लिहून देणे अनिवार्य केले आहे. काही विशेष परिस्थिती वगळता डॉक्टरांनी जेनेरिक औषधेच लिहून द्यायला हवी, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माझी सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की आपले अनुभव अधिकाधिक लोकांना सांगा जेणेकरून जनऔषधी योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांना घेता येईल.
प्रश्न- 3 नमस्कार पंतप्रधान महोदय,
माझं नाव ज़ेबा खान आहे आणि मी पुण्याची रहिवासी आहे. माझे वय 41 वर्षे आहे. मी किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे आणि मला जनऔषधी केंद्रात मिळणाऱ्या औषधांमुळे खूप मदत मिळाली आहे.
गेल्या सहा महिन्यापासून मी जनऔषध केंद्रातून औषधे घेत आहे. या उपचारांचा मला खूप फायदा होतो आहे. आधीपेक्षा मला 14-1500 रुपये कमी खर्च करावे लागतात. यातून माझी जी बचत होते, त्यात माझ्या तीन मुलींच्या शिक्षणाला हातभार लागतो आहे.
जनऔषधी केंद्र सुरु केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण औषधे स्वस्त केलीत, स्टेंट पण स्वस्त केले, पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील, याचीही व्यवस्था केली. योग आणि आयुर्वेदाविषयी देखील आपण नेहमीच बोलत असता.
आता गरीब आणि मध्यम वर्गाच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कोट्यवधी लोकांच्या अपेक्षांचे ओझे आपण कसे पेलता?
उत्तर-3
सर्वात आधी मी तुमच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो. आपल्या मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा! मला विश्वास आहे की आपल्याला या औषधामुळे दुहेरी लाभ झाला आहे. एक तर महागड्या औषधाच्या खरेदीच्या दुष्टचक्रातून आपली सुटका झाली आहे आणि त्यातून आपल्याला आर्थिक मदत मिळते आहे. जेनेरिक औषधांमुळे आपल्याला स्वस्त औषधे आणि डायलिसिसची सुविधा मिळते आहे. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाचीही काळजी घेऊ शकता. मला वाटतं, सरकारच्या कोणत्याही योजनेमुळे जेव्हा पूर्ण कुटुंबाचे, सगळ्या समाजाचे कल्याण होते तेव्हा आपोआप या योजनांना जनतेचा आशीर्वाद मिळतो.
आणि बघा, आपल्यासारख्या देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या आयुष्यात येणाऱ्या बदलांविषयी मी जेव्हा ऐकतो तेव्हा अपेक्षांचे ओझे जाणवतच नाही. अपेक्षांना मी ओझे मानत नाही, तर प्रोत्साहन मानतो.
देशाच्या गरिबाला, मध्यमवर्गाला हा विश्वास वाटतो आहे की त्यांचे सरकार त्यांना उत्तम, स्वस्त आणि सुलभ उपचार सुविधा देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. जेवढी लोकांची अपेक्षा वाढली आहे, तेवढेच आमचे प्रयत्नही व्यापक होत आहेत.
आता हेच बघा ना आतापर्यंत सुमारे 90 लाख रुग्णांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार मिळाले आहेत. प्रधानमंत्री डायलिसिस कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 6 लाख पेक्षा जास्त लोकांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत.
केवळ एवढेच नाही, तर एक हजारपेक्षा अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित केल्यामुळे रुग्णांचे सुमारे 12,500 कोटी रुपये वाचले आहेत. स्टेंट्स आणि गुडघे प्रत्यारोपणाच्या उपकरणांची किंमत कमी झाल्यामुळे लाखो रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. वर्ष 2025 पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्याच्या दिशेने आम्ही जलदगतीने काम करतो आहोत. या योजनेअंतर्गत देशातील गावागावात आधूनिक आरोग्य केंद्रे उभारली जात आहेत. आतापर्यंत जी 31 हजारपेक्षा अधिक केंद्रे तयार झाली आहेत, त्यामध्ये 11 कोटींपेक्षा जास्त नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत.
यात सुमारे साडेतीन कोटी उच्च रक्तचापाचे रुग्ण, सुमारे 3 कोटी मधुमेही, एक कोटी 75 लाख रुग्ण मुखाच्या कर्करोगाचे अशा गंभीर आजारांचे स्क्रिनिंग याच केंद्रांवर करण्यात आले आहे. देशातील लोकांना वैद्यकीय सुविधांसाठी फार दूर जावे लागू नये असे आमचे प्रयत्न आहेत. म्हणूनच देशभरात 22 नवी एम्स रुग्णालये तयार केली जात आहेत. देशभरातल्या 75 जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतरण केले जात आहे. यामुळे नव्या नोंदणीकृत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 157 इतकी झाली आहे.
या वर्षात देशात 75 नवी वैद्यकिय महाविद्यालये सुरु करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे देशभरात 4 हजार पेक्षा जास्त पदव्युत्तर आणि सुमारे 16 हजार एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार आहेत. आवश्यक तेवढे उत्तम डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध व्हावेत, यासाठी आवश्यक ते कायदेशीर बदल केले जात आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे.
देशात उत्तम औषधे निर्माण व्हावीत यासाठी तसेच संशोधन आणि चाचण्यांसाठीचे नवे नियम देखील बनवण्यात आले आहेत. अलीकडेच आपण ऐकले असेल, सर्व वैद्यकीय उपकरणांना देखील औषधांच्या व्याख्येत समाविष्ट करण्यात आले आहे. भारतात ही औषधे आणि इतर वैद्यकीय वस्तू जास्तीत जास्त तयार होतील तेव्हा त्यांच्या किमती आपोआपच कमी होतील. देशाच्या आरोग्य सुविधांमध्ये व्यापक सुधारणा करण्यासाठी असे अनेक प्रयत्न आम्ही करत आहोत.
प्रश्न 4:- माझे नाव अलका मेहरा आहे. माझे वय 45 वर्षे आहे. मी आपल्याच वाराणसी शहराची रहिवासी आहे. उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. मी स्वतः देखील जनऔषधी केंद्र चालवते. जनऔषधी केंद्रात आज फक्त एका रुपयांत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होत आहेत, ज्याचा ग्रामीण महिलांना खूप लाभ मिळतो आहे. अशा अनेक योजना आहेत, ज्या आपण महिलांचे आरोग्य लक्षात घेऊन आखल्या आहेत.
मग शौचालये बनवणे असो, सॅनिटरी पॅड असोत,उज्ज्वला असो, आपण समाजाच्या जुनाच विचारांनाच आव्हान दिले आहे. आपल्या या निर्णयांवर समाजातून काय प्रतिक्रिया उमटतील याविषयी आपल्याला कधीच चिंता वाटली नाही का?
उत्तर- 4
अलका जी हर हर महादेव!
तुम्हा सर्वांना, देशभरातील भगिनी आणि लेकींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आगावू शुभेच्छा! आपल्याला माहितच असेल की उद्या माझे सोशल मिडीया अकाउंट काही भगिनी चालवणार आहेत. गेल्या आठवडाभरापासून अनेक भगिनिंनी आपापल्या आयुष्यातील प्रेरक प्रसंग लिहून पाठवले आहेत, हे सगळे उत्साह वाढवणारे आणि देशाच्या नारी शक्तीच्या सामर्थ्याविषयी अद्भूत माहिती देणारे देखील आहेत आणि महिला आरोग्यासंबंधीचा जो मुद्दा आहे, तर त्याविषयी असलेल्या जुनाट विचारसरणीतून देशाला बाहेर काढण्यासाठी तर आपल्याला काम करायचे आहे.
जर एखादी गोष्ट योग्य असेल, तर मला असं वाटतं की समाजाला ते नक्कीच समजते.फक्त कोणीतरी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज असते. हेच या योजनांच्या बाबतीतही झाले. सरकारने फक्त पहिले पाऊल टाकले, पुढचे काम समाजानेच केले.
या योजनांचा परिणाम असा झाला की आज महिला आरोग्यात अभूतपूर्व सुधारणा होत आहे. मुलींच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. शाळांमध्ये मुलींसाठीशौचालये बांधल्यामुळे मुली आता शाळा मध्येच सोडत नाहीत. सुरक्षित मातृत्व अभियानामुळे माता आणि शिशु दोघांच्याही जीवनाला असलेला धोका कमी झाला आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत देशातील 1 कोटी 20 लाख महिलांना सुमारे 5 हजार कोटी रुपये सरकारकडून थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत, 3 कोटी 50 लाख बालके आणि सुमारे 90 लाखपेक्षा जास्त गर्भवती महिलांचे लसीकरण झाले आहे. जनऔषधी योजनेचा लाभही समाजातील पत्येक वर्गाला होतो आहे, गरीब आणि मध्यमवर्गाला होतो आहे. त्यातही आमच्या मुली, बहिणी यांना विशेष लाभ झाला आहे. आजच्या या कार्यक्रमात देखील अनेक महिला सहभागी झाल्या आहेत.
बाजारात 10 रुपयांपर्यंत मिळणारे सैनिटेरी पैड आज जनऔषधी केंद्रांमध्ये एक रुपयात उपलब्ध झाले आहेत. आपल्याला आठवत असेल की निवडणुकींच्या दरम्यान आम्ही वचन दिले होते की जनऔषधी केंदांवर अडीच रुपये प्रती पैड या दराच्या पैडची किंमत 1 रुपया इतकी कमी केली जाईल. हे वचन आम्ही पहिल्या 100 दिवसांतच पूर्ण केलं. हे सैनिटरी नैपकिन्स स्वस्त पण आहेत आणि पर्यावरण अनुकूल देखील आहेत. आपणही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचे काम करत आहात. भोले बाबाने तुम्हाला या कामासाठी उर्जा द्यावी, शक्ती आणि सामर्थ्य द्यावे हीच प्रार्थना!
प्रश्न-5 – नमस्कार पंतप्रधान महोदय. माझे नाव गुलाम नबी डार आहे. मी जम्मू काश्मीरच्या पुलवामाचा रहिवासी आहे.मी 74 वर्षांचा आहे. मला थायरॉइड, रक्तदाब,गैसट्रो असे आजार आहेत.मला डॉक्टरांनी कायम औषधे घेण्याचा सल्ला दिला आहे. आधी मी बाजारातून औषधे घेत असे, मात्र गेल्या अडीच वर्षांपासून मी जनऔषधी केंद्रांतून औषधे विकत घेतो. माझे मासिक उत्पन्न 20-22 हजार रुपये आहे. आधी माझ्या उत्पन्नातला मोठा भाग औषधांवर खर्च होत असे. जनऔषधी केंद्र सुरु झाल्यानंतर माझी मासिक 8-9 हजार रुपयांची बचत होत आहे. माझी आपल्याला विनंती आहे की जम्मू-काश्मीर सारख्या पर्वतीय भागात अशा योजनांना आणखी प्रोत्साहन द्यायला हवे.
उत्तर-5
गुलाम नबी साहेब, आपल्याच सारखे नाव असलेले दिल्लीतले एक सद्गृहस्थ माझे अत्यंत जवळचे स्नेही आहेत. ते ही जम्मू-काश्मीरचेच आहेत आणि देशाचे आरोग्यमंत्री देखील होते. मी जेव्हा दिल्लीत त्यांना भेटेन आणि त्यावेळी आपल्याविषयी नक्की सांगेन. गुलाम नबीजी, तुम्हाला जे आजार आहेत, त्यात सातत्याने औषधे घेणे आवश्यक असते. आम्हाला अतिशय आनंद आहे की जम्मू काश्मीरमध्ये जनऔषधी योजनेअंतर्गत आपल्यासारख्या अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आणि आपण योग्य बोललात- जम्मू काश्मीर असो, ईशान्य भारत असो किंवा इतर डोंगराळ आणि दुर्गम आदिवासी भागात देखील या योजनेचा विस्तार करण्याची गरज आहे. इथे सगळी औषधे मिळतील, याची व्यवस्था केली जाणार आहे.
आता जम्मू आणि काश्मीर तसेच लदाखमध्ये जी नवी प्रशासकीय व्यवस्था लागू करण्यात आली आहे, त्यामुळे याप्रकारच्या सुविधा आणखी जलद गतीने मिळू शकतील.आधी केंद्र सरकारच्या योजना तिथे लागू करणे खूप कठीण होते, मात्र आता हे अडथळे दूर झाले आहेत. गेल्या दीड वर्षात जम्मू काश्मीर येथे प्रचंड जलद गतीने विकासाची कामे सुरु आहेत. याच दरम्यान, साडे तीन लाख पेक्षा जास्त लोकांना आयुष्यमान योजनेशी जोडले गेले आहे. 3 लाख वृद्ध, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना सरकारच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो आहे.
केवळ एवढेच नाही, तर पीएम आवास योजनेअंतर्गत 24 हजार पेक्षा जास्त घरे बांधण्यात आली आहेत. अडीच लाख शौचालये बनवण्यात आली आहेत आणि सव्वा लाख पेक्षा जास्त घरांना मोफत वीजजोडणी देण्यात आली आहे. आरोग्य सुविधांविषयी बोलायचे झाल्यास, तिथे दोन एम्स आणि इतर वैद्यकीय महाविद्यालये बांधण्याचे कामही वेगाने सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासाला मिळालेली गती आता आणखी वाढली आहे. आता खऱ्या अर्थाने “सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” ही भावना तिथे प्रत्यक्षात रुजु लागली आहे.
प्रश्न- 6 पंतप्रधान महोदय, माझे नाव गीता आहे. मी तमिळनाडू इथल्या कोइम्बतुरची रहिवासी आहे. मी 62 वर्षांची आहे. मी मधुमेह आणि रक्तचाप यावर उपचार घेते आहे.जेव्हापासून मी जनऔषधी केंद्रातून औषधे विकत घेते आहे, तेव्हापासूनच दर वर्षी माझी 30 हजार रुपयांची बचत होते आहे. गरीब आणि मध्यमवर्गासाठी ही खूप मोठी बचत आहे. त्यासाठी आपले खूप खूप आभार! मी माझ्या परिचयातल्या अनेक लोकांनाही जनऔषधी केंद्रातून औषधे घेण्याचा सल्ला देत असते. आपण नेहमीच योग आणि आयुर्वेदाविषयी बोलत असता, त्यामुळे मला आपल्याला विचारायचं आहे की मधुमेहासारख्या आजारांवर याचा किती आणि कसा परिणाम होतो?
उत्तर-6 - धन्यवाद गीताजी।
जेनेरिक औषधांमुळे आपल्या पैशांची बचत होते आहे आणि त्याचा लाभ इतरांनाही मिळावा यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहात. आपल्यासारख्या जागरूक नागरीकांमुळेच देश आणखी मजबूत बनतो आहे. आपण केवळ स्वतःचेच नाही तर इतरांच्या हितांविषयी देखील विचार करता आहात, एक नागरिक म्हणून आपली ही खूप मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला उत्तम आणि स्वस्त उपचार मिळावेत ही सरकारची जबाबदारी असते.
मात्र, आपल्याला उपचारांची गरजच पडू नये, असाच आपला प्रयत्न असायला हवा. आजारी होण्यापेक्षा, निरोगी असणे केव्हाही चांगलेच! सरकर स्वच्छ-भारत, योग दिवस, फिट इंडिया असे अभियान यासाठीच राबवत आहे.
लक्षात घ्या, मधुमेह आणि रक्तचाप सारखे अनेक आजार आज देशात वेगाने वाढत आहेत. हे सगळे जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत. यांचे पूर्ण उच्चाटन तर शक्य नाही, मात्र त्यांना नियंत्रित ठेवावे लागते. आणि जेव्हा या आजारांचे कारण आपली जीवनशैली आहे तेव्हा हे स्पष्ट आहे की आपल्याला आपली जीवनशैली नियंत्रित ठेवायची आहे. याच कारणामुळे आपल्याला आपल्या जीवन शैलीत फिटनेस आणि स्वच्छतेशी संबंधित सवयींचा अंतर्भाव करायला हवा आहे.
योग तेच काम करतो. योग आपल्या शरीरासोबतच आपल्या श्वसनाचाही व्यायाम आहे. योगाभ्यास आपल्याला अनेक प्रकारे, शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत असतो. आपल्या माता-भगिनींना तर याची जास्त गरज आहे. कारण आपल्या माता-भगिनी नेहमीच इतरांची, कुटुंबीयांची काळजी घेता घेता, आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करते. हे योग्य नाही. कुटुंबातल्या इतर सदस्यांची देखील ही जबाबदारी आहे की जर आपल्या माता-भगिनी संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळत असतील, तर त्यांना स्वतःची, स्वतच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी प्रेरणा द्यायला हवी.
प्रश्न 7 – सर माझे नाव पंकज कुमार झा आहे. मी बिहारच्या मुजफ्फरपूर इथला रहिवासी आहे. सात वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी माझ्या गावात एक बॉम्बस्फोट केला होता. त्या बॉम्बस्फोटामुळे मला माझा हात गमवावा लागला.मी हात गमावला, पण माझी जिद्द आणि हिंमत गमावली नाही.एकदिवस वर्तमानपत्रातून मला जनऔषधींविषयी माहिती मिळाली आणि मी यासाठी काम करायचा निश्चय केला. आता तीन वर्षांपासून मी हे काम करतो आहे.यामुळे लोकांची सेवाही घडते आहे आणि दर महिन्याला 4-5 लाख रुपयांची विक्री देखील होते आहे.
माझा प्रश्न असा आहे की अधिकाधिक दिव्यांग व्यक्ती या योजनेत सहभागी व्हाव्यात यासाठी आपण काय करु शकतो?
उत्तर 7 : पंकज जी सगळ्यात आधी आपले खूप खूप आभार! आपली जिद्द आणि हिंमत कौतुकास्पद आहे. आपण खऱ्या अर्थाने जनऔषधी योजनेमागच्या भावनांचे प्रतिनिधित्व करता.
ही योजना स्वस्त औषधांसोबतच आज दिव्यांग व्यक्तिंसह अनेक युवकांसाठी देखील आत्मविश्वासाचे साधन बनली आहे. जनऔषधी केंद्रा सोबतच, वितरण, गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा अशा इतर साधनांचा देखील विस्तार होत आहे. ज्यातून हजारो युवा सहकाऱ्यांना रोजगार मिळतो आहे.
आणि दिव्यांगाविषयी बोलायचे झाल्यास, माझे तर नेहमीच हे सांगणे असते की त्यांच्या सामर्थ्याचा आणखी चांगला उपयोग व्हायला हवा.
एकविसाव्या शतकात भारताच्या अर्थव्यवस्थेत दिव्यांगांचे कौशल्य, त्यांची उत्पादन क्षमता याला राष्ट्राच्या विकासात अधिकाधिक भागीदारी असायला हवी. हेच कारण आहे की गेल्या पाच वर्षात दिव्यांग व्यक्तींची सुविधा आणि त्यांचे कौशल्य विकास याकडे व्यापक लक्ष दिले जात आहे. दिव्यांगांना शिक्षण, रोजगार आणि इतर अधिकार देण्यासाठी आवश्यक ये कायदेशील बदल देखील केले गेले आहेत. आणि निश्चितच, जनऔषधी सारख्या आमच्या योजनांमध्ये देखील अधिकाधिक दिव्यांग व्यक्ती सहभागी होतील, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत.
आमचे मंत्री, खासदार जे या कार्यक्रमात सहभागी झाले आहे, त्या सर्वांनी औषधकेंद्राचा हा उत्सवच सुरु केला आहे. आज इथे देशातील कानाकोपऱ्यातल्या लोकांशी बोलण्याची संधी मला मिळाली आहे. तुम्ही सर्वांनीही या कार्यक्रमासाठी वेगळा वेळ काढला. आणि इथे एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जनऔषधी अभियान आता खऱ्या अर्थाने जनशक्ती चळवळ बनली आहे.
सरकार देशातल्या आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जनऔषधी योजनेला देखील अधिक प्रभावी बनवण्यासाठी सातत्याने काम सुरु आहे. यासोबतच, देशातल्या प्रत्येक नागरिकाने, वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याप्रती आपली जबाबदारी समजून घेण्याचीही गरज आहे.
आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात,स्वच्छता, योग, संतुलित आहार, खेळ आणि इतर व्यायाम यांना प्राधान्याने स्थान द्यायला हवे. मी पालकांनाही आग्रह करेन की मुलांना तुम्ही अभ्यासासाठी जेवढा आग्रह करता, खेळासाठीही तेवढाच आग्रह करा. मुलांना दिवसातून चार वेळा घाम नाही आला, तो मेहनत करत नसेल तर आई-वडिलांनी चिंता करायला हवी. निरोगी आणि तंदुरुस्त समाज घडवण्याच्या आमच्या प्रयत्नांतूंच निरोगी भारताचे स्वप्न साकारले जाणार आहे.
मी पुन्हा एकदा जनऔषधी केंदाच्या या अभियानात सहभागी झालेले, जे जनऔषधी केंद्र चालवत आहेत, अशा सर्वांना अनेक शुभेच्छा देतो. देशातील कोट्यवधी लोकांना अद्याप या योजनेविषयी फारशी माहिती नाही. मी आपल्याला आणि माध्यमातील आमच्या सहकाऱ्यांना अशी विनंती करेन, की ह्याचा प्रसार म्हणजे मानवतेची सेवा आहे. आणि तुम्ही देखील याचा होईल तेवढा प्रसार-प्रचार करा. गरिबांपर्यंत या योजना पोचवल्या तर तुम्ही कोणाच्या आयुष्यात मोलाची मदत करु शकाल. आपण सर्वांनी एकत्र येत हे काम करुया. आपल्या सगळ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करतो.
आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा! आणि जसे मी सुरवातीला सांगितले होते, की कोरोना विषाणूमुळे आपल्याला घाबरायची गरज नाही, मात्र सतर्क, दक्ष राहण्याची गरज आहे. अफवा पसरवू नका. अधिकृत स्त्रोतांनी या आजाराच्या बचावासाठी “काय करावे-काय न करावे” याची विस्तृत यादी दिली आहे, त्याचे काटेकोर पालन करा. एवढे जरी आपण केले तरी आपण या आजारावर मात करण्यात यशस्वी होऊ. सर्वांना खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद !!
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1606015)
Visitor Counter : 265