पंतप्रधान कार्यालय
उत्तम आणि परवडणारी औषधे देण्यासाठी जनऔषधी योजना-पंतप्रधान
प्रत्येक भारतीयाचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी चार उद्दिष्टे
प्रत्येक नागरिकाने आरोग्याप्रति कर्तव्य समजून घेण्याचे केले आवाहन
Posted On:
07 MAR 2020 6:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परिषयोजनेच्या लाभार्थी आणि जन औषधी केंद्राच्या मालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
पंतप्रधान म्हणाले की जन औषधी दिन हा केवळ एखादी योजना साजरा करण्याचा दिवस नाही तर याचा लाभ झालेल्या कोट्यवधी भारतीयांशी संवाद साधण्याचा दिवस आहे.
प्रत्येक भारतीयाच्या आरोग्यासाठी आम्ही चार उद्दिष्टांवर काम करत आहोत. प्रथम, प्रत्येक भारतीयाला आजारी पडण्यापासून रोखायला हवे. दुसरे म्हणजे, आजारपणात परवडणारे आणि चांगले उपचार असायला हवेत. तिसरे, आधुनिक रूग्णालये, उत्तम डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांची उपचारासाठी पुरेशी संख्या आहे आणि मिशन मोडवर काम करून आव्हानांचा सामना करणे हे चौथे उद्दिष्ट आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, जन औषधी योजना ही देशातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आणि परवडणाऱ्या दरात उपचार देण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे.
“मला खूप समाधान आहे की आतापर्यंत देशभरात 6 हजाराहून अधिक जन औषधी केंद्रे उघडली गेली आहेत. हे जाळे जसजसे वाढेल तसतसे त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आज दरमहा एक कोटीहून अधिक कुटुंबे या केंद्रांद्वारे अतिशय परवडणारी औषधे घेत आहेत”, असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले कि जन औषधी केंद्रांवर औषधांच्या किंमती बाजारातील दरांपेक्षा 50% ते 90% कमी आहेत. उदाहरणार्थ, कर्करोगावरच्या उपचारात वापरले जाणारे औषध जे बाजारात सुमारे साडेसहा हजार रुपयांत उपलब्ध आहे. ते जन औषधी केंद्रांमध्ये केवळ 800 रुपयांत उपलब्ध आहे.
“पूर्वीच्या तुलनेत उपचाराचा खर्च कमी होत आहे. जन औषधी केंद्रांमुळे आतापर्यंत देशभरातील कोट्यवधी गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीयांची 2200 कोटी रुपयांची बचत झाली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी जनऔषधी केंद्रे चालविणाऱ्या संबंधितांच्या भूमिकेची प्रशंसा केली. या योजनेशी संबंधित लोकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी जनौषधी योजनेशी संबंधित पुरस्कार देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
पंतप्रधान म्हणाले की जन औषधी योजना दिव्यांगांसह तरुणांसाठी आत्मविश्वासाचे एक मोठे साधन बनत आहे. प्रयोगशाळांमधील जेनेरिक औषधांच्या चाचणीपासून ते सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये शेवटच्या दुकानात वितरणापर्यंतच्या प्रक्रियेत हजारो तरुण कार्यरत आहेत.
“देशात आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जनऔषधि योजना आणखी प्रभावी करण्यासाठी निरंतर काम सुरू आहे”, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की आयुष्मान भारत योजनेंतर्गत सुमारे 90 लाख गरीब रुग्णांवर उपचार झाले आहेत. डायलिसिस प्रोग्राम अंतर्गत 6 लाखाहून अधिक डायलिसिस विनामूल्य करण्यात आले. तसेच, एक हजाराहून अधिक आवश्यक औषधांच्या किंमती नियंत्रणातून 12,500 कोटी रुपयांची बचत झाली आहे. स्टेंट आणि गुडघा प्रत्यरोपणाच्या किमती कमी झाल्यामुळे लाखो रूग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.
“सन 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्यासाठी आम्ही वेगाने काम करत आहोत. या योजनेंतर्गत, देशातील प्रत्येक गावात आधुनिक आरोग्य आणि कल्याण केंद्रे उभारली जात आहेत. आतापर्यंत 31 हजाराहून अधिक केंद्रे पूर्ण झाली आहेत”, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्याविषयीचे आपले कर्तव्य समजून घेण्याची विनंती केली.
“आपण आपल्या दैनंदिन कामात स्वच्छता, योग, संतुलित आहार, खेळ आणि अन्य व्यायामांना योग्य महत्त्व दिले पाहिजे. तंदुरुस्तीच्या दिशेने आपल्या प्रयत्नांमुळे निरोगी भारताचा संकल्प सिद्ध होईल”, असे ते म्हणाले.
S.Tupe/S.Kane/D.Rane
(Release ID: 1605674)
Visitor Counter : 156