Posted On:
23 FEB 2020 11:15AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2020
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’च्या माध्यमातून मला कच्छपासून ते कोहिमापर्यंत आणि काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशभरातल्या नागरिकांना पुन्हा एकदा नमस्कार करण्याची संधी मिळतेय, हे माझं सौभाग्य आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार! आपल्या देशाची विशालता आणि विविधता यांचं स्मरण करणं, त्याला वंदन करणं म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. आणि या विविधतेचा अनुभव करण्याची संधी तर नेहमीच आगळी अनुभूती देणारी, भावविभोर करणारी असते, आनंददायी असते, तो अनुभव म्हणजे एक प्रकारे प्रेरणापुष्प असतो. काही दिवसांपूर्वी मी दिल्लीमधल्या हुन्नर हाटमध्ये म्हणजे एका छोट्याशा स्थानी, आपल्या देशाची विशालता, संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि भावभावना यांच्यामधल्या विविधतेचं जणू दर्शन घेतलं. पारंपरिक वस्त्र, हस्तशिल्प, जाजम- गालिचे, वेगवेगळी भांडी आणि पितळी वस्तू, पंजाबची फुलकारी, आंध्र प्रदेशचे शानदार लेदरकाम, तामिळनाडूची सुंदर पेटिंग्स, उत्तर प्रदेशची पितळी उत्पादनं, भदोहीचे गालिचे, कच्छमधल्या तांब्याच्या वस्तू, अनेक प्रकारची संगीत वाद्ययंत्रे, अशा अगणित वस्तू तिथं होत्या. त्यामधून समग्र भारताची कला आणि संस्कृती यांची झलक दिसत होती. इतकंच नाही तर या वस्तू बनवण्याच्यामागे शिल्पकारांची असलेली साधना, त्यांनी केलेले अथक परिश्रम आणि आपल्यामध्ये असलेल्या हुन्नर विषयी त्यांना असलेलं प्रेम, यांच्या कथा ऐकल्या तर लक्षात येतं, हे सगळं काही खूप प्रेरणादायी आहे. हुन्नर हाटमध्ये एका दिव्यांग महिलेचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला. त्यांनी मला सांगितलं की, आधी त्या फूटपाथवर आपली चित्र- पेंटिंग्स विकत होत्या. परंतु हुन्नर हाटबरोबर जोडल्यानंतर त्यांचं तर जीवन पूर्णपणे बदलून गेलं. आजमितीला त्या केवळ आत्मनिर्भर नाहीत तर त्यांनी स्वतःचं एक घरकूलही खरेदी केलं आहे. हुन्नर हाटमध्ये मला अनेक शिल्पकारांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. हुन्नर हाटमध्ये सहभागी होणा-या कारागिरांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महिला कलाकार आहेत, अशी माहिती मला यावेळी दिली गेली. आणि गेल्या तीन वर्षांमध्ये हुनर हाटच्या माध्यमातून जवळपास तीन लाख कारागिर, शिल्पकार मंडळींना रोजगाराच्या अनेक संधी मिळाल्या आहेत.
हुन्नर हाट म्हणजे कलेच्या प्रदर्शनासाठी एक उत्तम व्यासपीठ तर आहेच, आणि त्याच्याच जोडीला हाटमुळे लोकांच्या स्वप्नांनाही पंख देण्याचं काम होत आहे. एकाच स्थानी दिसत असलेल्या आपल्या देशाच्या विविधतेकडं दुर्लक्ष करणं कुणालाही अशक्य आहे. अर्थात प्रत्येकाची नजर या दुर्लभ विविधतेकडं जाणारच आहे. शिल्पकला तर आहेच आहे, त्याच्याच जोडीला खाद्यपदार्थांचीही विविधता आहे. तिथं एका रांगेमध्ये इडली-डोसा, छोले-भटुरे, दाल-बाटी, खमण-खांडवी, आणखी असे कितीतरी अगणित पदार्थ होते. मी, स्वतः तिथं बिहारच्या लिट्टी-चोखा या चविष्ट पदार्थाचा आनंद घेतला. खूप चवीनं आणि खुशीनं हा पदार्थ मी खाल्ला. भारताच्या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारचे मेळावे, जत्रा, प्रदर्शनं यांचं आयोजन करण्यात येत असतं. भारत नेमका कसा आहे, हे समजून घेण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी ज्या ज्यावेळी आपल्याला संधी मिळते, त्या त्यावेळी जरूर गेलं पाहिजे.
‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ म्हणजे काय हे मनापासून जगण्यासाठीच तर अशा संधी असतात. यामुळे तुम्ही केवळ देशाच्या संस्कृती आणि कला यांच्याशीच जोडले जाणार असं नाही, तर तुम्ही देशातल्या परिश्रमी कारागिरांची कला, विशेषतः महिलांच्या समृद्धीमध्येही आपले योगदान देवू शकणार आहात. त्यामुळे अशा प्रदर्शनांना सर्वांनीजरूर जावं.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या देशाला महान परंपरा लाभली आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो वारसा दिला आहे, जे शिक्षण दिलं आहे आणि आपल्याला जी दीक्षा मिळाली आहे. त्यामध्ये प्रत्येक जीवमात्रांविषयी दयेचा भाव आहे, निसर्गाविषयी अपार प्रेम आहे, या सर्व गोष्टी एकप्रकारे आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत. भारतातल्या या वातावरणाचे आतिथ्य घेण्यासाठी संपूर्ण दुनियाभरातले विविध प्रजातींचे पक्षीही दरवर्षी आपल्या देशात येतात. त्यामुळेच संपूर्ण वर्षभर भारत स्थलांतरीत पक्षांचे घरकूल बनत असतो. भारतामध्ये जवळपास पाचशेंपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या, जातींचे पक्षी दरवर्षी देशाच्या विविध भागांमध्ये येत असतात, असं सांगण्यात येतं. गेल्या काही दिवसांत गांधीनगरमध्ये ‘कॉप-13 कन्व्हेन्शन’ झालं. त्यामध्ये या विषयावर खूप मोठ्या प्रमाणावर चिंतन झालं, मनन झालं, मंथनही झालं. आणि भारताने जे जे प्रयत्न केले आहेत, त्याचं खूप कौतुकही झालं. मित्रांनो, आगामी तीन वर्षांपर्यंत स्थलांतरीत पक्षी यांच्याविषयी होणा-या ‘कॉप-कन्व्हेन्शन’चे अध्यक्षपद भारत भूषवणार आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशाला ही जी संधी मिळाली आहे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे, याविषयी तुम्हाला काही सुचवायचं असल्यास जरूर कळवा.
कॉप कन्व्हेन्शनविषयी आत्ता आपली चर्चा सुरू आहेच, त्यामुळं माझं लक्ष मेघालयाशी संबंधित एका महत्वाच्या माहितीकडं गेलं. अलिकडेच जीवशास्त्रज्ञांनी माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. या प्रजातीचे मासे मेघालयामधल्या गुहांमध्येच सापडतात, असा शोध या शास्त्रज्ञांनी लावला आहे. हे मासे गुहांमधल्या जमिनीच्या आत वास्तव्य करणा-या जल-जीवांमध्ये सर्वात मोठे आहेत, असं सांगण्यात आलं. हे मासे जमिनीच्या खाली अगदी खोल-खोल अंधा-या गुहांमध्ये राहतात. त्यांच्यापर्यंत प्रकाशकिरणे फार क्वचित पोहोचतात. इतक्या खोल गुहांमध्ये इतके मोठे मासे कसे काय जीवंत राहू शकतात, याचं संशोधकांनाही खूप नवल वाटतंय.
एकूणच काय आपला भारत आणि विशेष करून मेघालय म्हणजे दुर्मिळ प्रजातींचं घर आहे, असं म्हणता येईल, आणि अर्थातच ही खूप सुखद गोष्ट आहे. हे मासे सापडणे म्हणजे भारतातल्या जैव-विविधतेला एक नवे परिमाण देणारी घटना आहे. आपल्या आजू-बाजूला अशा खूप सा-या नवलपूर्ण गोष्टी असतात. त्या अजूनही आपल्याला सापडलेल्या नसतात. त्यामुळे अशा आश्चर्यजनक गोष्टींचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी संशोधनाची उर्मी असणं गरजेचं आहे.
महान तमिळ कवियत्री अव्वैयार यांनी लिहिलं आहे.
कट्टत केमांवु कल्लादरू उडगडवु,
कड्डत कयिमन अडवा कल्लादार ओलाआडे !!
याचा अर्थ असा आहे की, आपण जे काही जाणतो ते मुठीतल्या अवघ्या वाळूच्या एका कणाएवढंच आहे. आणि आपल्याला जे माहिती नाही, ते मात्र एकूणच या संपूर्ण ब्रह्मांडासमान आहे. या देशाच्या विविधेतेविषयीही अगदी असंच आहे. आपण जितकं जाणून घेवू, तितकं कमीच आहे. आपली जैवविविधता म्हणजे तर संपूर्ण मानवतेसाठी अनोखे भंडार आहे. आपण हा खजिना जतन केला पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि तो ‘एक्सप्लोअर’ही करण्याची, अनुभवण्याची गरज आहे.
माझ्या प्रिय युवा मित्रांनो,
अलिकडच्या काळामध्ये आपल्या देशातल्या मुलांमध्ये, युवकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याविषयी आवड सातत्यानं वाढतेय. अंतराळामध्ये उपग्रहांचं विक्रमी प्रक्षेपण केलं जात आहे. या क्षेत्रामध्ये नवनवीन विक्रमांची नोंद होत आहे.आपल्या अंतराळ मोहिमा म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा, गर्वाचा विषय बनल्या आहेत. ज्यावेळी चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाच्यावेळी मी बंगळुरूमध्ये होतो, त्यावेळी पाहिलं की, तिथं उपस्थित असलेल्या मुलांमध्ये असलेला उत्साह वाखाणण्यासारखा होता. अपरात्रीही झोपेचं नामोनिशाण त्यांच्या डोळ्यावर नव्हतं. जवळपास पूर्ण रात्रभर ही मुलं एकप्रकारे जागीच होती. त्यांच्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंकल्पना यांच्याविषयी किती उत्सुकता होती, हे पाहिलेलं, मी कधीच विसरू शकणार नाही. मुलांच्या, युवकांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यातल्या वैज्ञानिकाला अधिक पोषण देण्यासाठी आता आणखी एक नवीन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आता तुम्ही श्रीहरिकोटा इथून होणा-या रॉकेटचं लॉचिंग अगदी समोर बसून पाहू शकणार आहात. अलिकडेच, ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी खास ‘व्हिजिटर गॅलरी’ म्हणजेच अभ्यागतांचा कक्ष बनवण्यात आला आहे. या कक्षामध्ये दहा हजार लोकांना बसण्याची सुविधा आहे.
इस्त्रोच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकच्या माध्यमातून आता ऑनलाईन बुकिंगही करता येणार आहे. अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना रॉकेट लॉचिंग दाखवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहलही घेवून जात आहेत, अशी माहिती मला दिली आहे. सर्व शाळांच्या प्राचार्यांना आणि शिक्षकांना माझा आग्रह आहे की, आगामी काळात त्यांनी या सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
मित्रांनो, आज मी आपल्याला आणखी एक रोमांचक माहिती देवू इच्छितो. नमो अॅपवर झारखंडमधल्या धनबादचे रहिवासी पारस यांनी नोंदवलेलं मनोगत मी वाचलं. इस्त्रोच्या ‘युविका’ या कार्यक्रमाविषयी मी, आपल्या युवा-मित्रांना काही सांगावं, असं पारस यांना वाटतंय. युवावर्गाला विज्ञानाशी जोडण्यासाठी ‘युविका’ हा इस्त्रोनं अतिशय प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे. 2019मध्ये हा कार्यक्रम शालेय वर्गातल्या मुलांसाठी सुरू केला होता.‘युविका’ याचा अर्थ आहे, ‘युवा विज्ञानी कार्यक्रम’!! हा कार्यक्रम म्हणजे आमचं ‘व्हिजन’ आहे. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन’ याला अनुरूप या कार्यक्रमाची रूपरेखा तयार केली आहे.
या कार्यक्रमामध्ये तुमची परीक्षा झाल्यानंतर, म्हणजे मुलांना सुट्टी असते तेव्हा इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांमध्ये जावून अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान आणि त्याचा प्रत्यक्षात केला जाणारा वापर, यांच्याविषयी शिक्षण, माहिती घेता येणार आहे. जर तुम्हाला या प्रशिक्षणाविषयी आणखी काही माहिती हवी असेल, आणि असे प्रशिक्षण घेणे किती रोमांचक आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर मागच्यावर्षी ज्यांनी या प्रशिक्षण वर्गाला उपस्थिती लावली आहे, त्यांचे अनुभव तुम्ही सर्वांनी नक्की वाचावेत. जर तुम्हालाही या प्रशिक्षण वर्गाला जाण्याची इच्छा असेल तर ‘इस्रो’शी संबंधित ‘युविका’च्या संकेतस्थळी जावून स्वतःची नोंदणीही करू शकता. माझ्या प्रिय युवा मित्रांनो, आपल्यासाठी मी सांगतो की, या संकेतस्थळाचं नाव तुम्ही लिहून घ्या आणि आजच जरूर या संकेतस्थळाला भेटही द्या - www..yuvika.isro.gov.in लिहून घेतलं ना?
माझ्या प्रिय देशवासियांनो,
दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी लडाखच्या अतिशय सुंदर डोंगर द-यांच्या साक्षीनं एक ऐतिहासिक घटना घडली. लेह इथल्या कुशोक बाकुला रिम्पोची या विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या एएन 32 विमानानं ज्यावेळी हवेत उड्डाण केलं, त्यावेळी इतिहासाचा एक नवा अध्याय लिहिला गेला. या विमानामध्ये दहा टक्के भारतीय होते.
बायो-जेट इंधनाचं मिश्रण वापरण्यात आलं होतं. विमानाच्या दोन्ही इंजिनांमध्ये अशा प्रकारच्या इंधनाचं मिश्रण पहिल्यांदाच वापरण्यात आलं. इतकंच नाही तर, लेहमधल्या ज्या विमानतळावरून या विमानानं उड्डाण केलं, ते विमानतळ भारतातच नाही तर संपूर्ण दुनियेतल्या उंचावरच्या विमानतळांपैकी सर्वाधिक उंचीवरचं आहे. या घटनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, विमानात वापरलेलं बायो-जेट इंधन हे झाडांच्या अखाद्य तेलापासून बनवण्यात आलेलं आहे. भारतातल्या वेगवेगळ्या आदिवासी भागातून हे विशिष्ट इंधन खरेदी केलं आहे. या नवीन प्रयोगामुळे केवळ कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे, असं नाही; तर कच्चे तेल आयात करण्यासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून रहावं लागतं. आता देशाची ही निर्भरता कमी होवू शकणार आहे. इतकं प्रचंड काम करण्यासाठी अथक प्रयत्न करीत असलेल्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो. विशेष म्हणजे डेहराडूनच्या भारतीय पेट्रोलियम संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हे जैवइंधन वापरून विमान उडवण्याचे तंत्रज्ञान यशस्वी करून दाखवले आहे, त्यांचे तर खास अभिनंदन. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ‘मेक इन इंडिया’ अधिक सशक्त होणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपला नवा भारत आता जुन्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्यासाठी तयार नाही. विशेष म्हणजे, नवभारतामधल्या आमच्या भगिनी आणि माता तर त्यांच्यासमोर येत असलेल्या सर्व आव्हानांशी अगदी सहज दोन हात करताहेत. त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये एक सकारात्मक परिवर्तन पहायला मिळत आहे. बिहारमधल्या पूर्णियाची ही कथा, देशभरातल्या लोकांना प्रेरणा देणारी आहे. या भागाला अनेक दशकांपासून महापूर, अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त बसतो. इथले लोक अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या भागात शेती करण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी साधनसामुग्री जमा करणं , खूप अवघड काम आहे. मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णियाच्या काही महिलांनी एक वेगळाच मार्ग
स्वीकारला. मित्रांनो, आधी या भागातल्या महिला तूती किंवा मलबेरी यांच्या झाडांवर रेशम कीड्यांचे पालन करून कोकून तयार करीत होत्या. आणि ते विकत होत्या. त्यांना त्याचे खूपच कमी पैसे मिळत होते. मात्र त्यांच्याकडून घेतलेल्या कोकूनपासून रेशमाचा धागा बनवून चांगला नफा कमावणारी मंडळी होती. परंतु आज पूर्णियाच्या महिलांनी एक नवी सुरूवात केली आणि या भागाचं चित्रंच पालटवून टाकलं.
या महिलांनी सरकारच्या मदतीनं मलबरी-उत्पादन समूह बनवले. त्यानंतर तूतीवर रेशम कीडेपालन करून त्यापासून रेशम धागे तयार केले, इतकंच नाही तर या रेशमी धाग्यांपासून स्वतःच साड्या तयार करायलाही प्रारंभ केला. आधी ज्या महिलांना कोकून विकून अगदी किरकोळ रक्कम हातात मिळत होती, त्याच कोकूनपासून बनवलेली साडी आता हजारो रुपयांमध्ये विकली जात आहे. ‘आदर्श जीविका महिला मलबरी उत्पादन समूहा’च्या या दीदींनी जी कमाल करून दाखवली आहे, त्याचा परिणाम आता अनेक गावांमध्येही पहायला मिळतोय. पूर्णियामधल्या अनेक गावच्या शेतकरी दीदी, आता केवळ साड्या बनवत नाही तर अनेक मोठमोठ्या मेळाव्यांमध्ये, प्रदर्शनांमध्ये आपले स्टॉल लावून आपला मालही विकत आहेत. आजच्या महिला म्हणजे नवशक्ती आहेत, नवीन विचारांच्या बरोबरीने त्या नवनवीन लक्ष्यं प्राप्त करीत आहेत, याचं हे उदाहरण आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या देशाच्या महिला, आमच्या कन्या उद्यमशील आहेत, त्यांच्याकडे असलेलं धाडस हे प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे तुम्हाला दिसतील. त्यावरूनच लक्षात येतं की, आजच्या कन्या जुन्या अनावश्यक बंधनांना बाजूला सारून नवीन उंची प्राप्त करत आहेत. आज, मी आपल्याबरोबर बारा वर्षांची कन्या काम्या कार्तिकेयन हिच्या यशाविषयी चर्चा करू इच्छितो. काम्याने फक्त बारा वर्ष वय असताना माउंट अंकागुआ शिखर सर करण्यात यश मिळवलं आहे. हे दक्षिण अमेरिकेमधलं सर्वात उंच पर्वतशिखर आहे. या पर्वतशिखराची उंची जवळपास सात हजार मीटर आहे. या महिन्याच्या प्रारंभी या सर्वात उंच शिखरावर यशस्वी चढाई करून तिथं आपला तिरंगा तिनं फडकवला. याचा प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल. देशाला गौरवान्वित करणारी काम्या आता एका नवीन मोहिमेवर आहे, त्या मोहिमेचं नाव आहे- ‘मिशन साहस’! अशी माहिती मला मिळाली आहे. या मोहिमेमध्ये सर्व खंडातल्या सर्वात उंच पर्वत शिखरे सर करण्याचं काम ती करणार आहे. या अभियानामध्ये तिला उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर स्किईंगही करावं लागणार आहे. काम्याच्या या मिशन साहसला मी शुभेच्छा देतो. तसं पाहिलं तर काम्यानं जे यश मिळवलं आहे, ते आपल्या सर्वांना ‘फिट’; राहण्यासाठीही प्रेरणा देणारे आहे. इतक्या कमी वयामध्ये काम्या ज्या उंचीवर पोहोचली आहे, त्यासाठी ‘फिटनेस’ असणं खूप महत्वाचं आहे.
‘ए नेशन दॅट इज फिट, विल बी ए नेशन इज हिट’ म्हणजेच जो देश फिट आहे, तोच नेहमी हिट होणार. तसं पाहिलं तर आगामी महिने धाडसी, साहसी खेळांसाठी खूपच उपयुक्त आहेत. भारताची भौगोलिक रचना अशी आहे की, आपल्या देशात साहसी क्रीडा प्रकारांना अनेक संधी आहेत. एकीकडे उंच-उंच डोंगर आणि दुसरीकडे दूर-दूरपर्यंत पसरलेलं वाळवंट आहे. एकीकडे अगदी घनदाट जंगल आहे तर दुसरीकडे समुद्राचा अथांग विस्तार आहे. म्हणूनच आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे की, आपल्याला जी कोणती जागा आवडेल, जे करावसं वाटेल, ते निवडा आणि आपल्या जीवनाला धाडस, साहसाची जरूर जोड द्या. आयुष्यात साहसीपणा तर असलाच पाहिजे. तसं पाहिलं तर मित्रांनो, अवघी बारा वर्षांची कन्या- काम्या हिच्या साहसाची, यशाची कथा ऐकल्यानंतर आता ज्यावेळी तुम्ही 105 वर्षांच्या भागीरथी अम्मा यांची यशोगाथा ऐकाल तर तुम्हाला नक्कीच नवल वाटेल. मित्रांनो, जर आपण जीवनात प्रगती करू इच्छिता, विकास करू इच्छिता, काही विशेष करून दाखवू इच्छित असाल तर सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे, आमच्यामध्ये असलेला विद्यार्थी कधीच मारून टाकता कामा नये. आता तुम्ही विचार करत असणार की, या भागीरथी अम्मा कोण बरं?
भागीरथी अम्मा केरळमधल्या कोल्लममध्ये वास्तव्य करतात. खूप लहान असतानाच त्या आईविना पोरक्या झाल्या. अगदी लहान वयातच विवाह झाला. नंतर पतीचेही निधन झाले. परंतु भागीरथी अम्माने या संकटाला मोठ्या धैर्यानं तोंड दिलं. कधीच रडत बसल्या नाहीत. अगदी दहा वर्षांपेक्षा लहान असतानाही त्यांना आपली शाळा सोडावी लागली. वयाच्या 105 व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा शालेय शिक्षण घ्यायला प्रारंभ केला. इतकं वय झालेलं असलं तरीही अम्मांनी चैाथीची परीक्षा दिली आणि परीक्षेच्या निकालाची आतुरतेनं वाट पाहू लागल्या. त्यांना परीक्षेत 75 टक्के मिळाले. इतकंच नाही तर गणितामध्ये त्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले. आता अम्मांना आणखी पुढची परीक्षा देण्याची इच्छा आहे. जाहीर आहे, भागीरथी अम्मा यांच्यासारखे लोक, तर या देशाची ताकद आहेत. असे लोक तर प्रेरणेचे खूप मोठे स्त्रोत असतात. आजमी या भागीरथी अम्मांना विशेष प्रणाम करतो.
मित्रांनो, जीवनात काही विपरीत प्रसंग आले तर आपल्याकडे असलेलं धैर्य, आपल्याकडे असलेली इच्छाशक्ती कोणतीही परिस्थिती बदलवून टाकते. अलिकडेच मी एक अशीच कथा वाचली, ती आपल्याशी ‘शेअर’ करू इच्छितो.
ही कथा आहे, मुरादाबादच्या हमीरपूर या गावामध्ये राहणा-या सलमानची. सलमान जन्मापासूनच दिव्यांग आहे. त्याचे पाय काही त्याला साथ देत नाहीत. हा त्रास असतानाही सलमान यानं हार मानली नाही. त्यानं स्वतःचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर असाही निश्चय केला की, यापुढे आपल्यासारख्या दिव्यांग मित्रांनाही मदत करायची. एकदा ठरवलं की मग काय? सलमाननं आपल्या गावामध्येच चप्पल आणि डिटर्जंट बनवण्याचं काम सुरू केलं. पाहता पाहता त्याच्या जोडीला 30 दिव्यांग साथीदारही आले. इथं एक गोष्ट नमूद करावी वाटते, सलमानला स्वतःला चालायला त्रास होत होता. तरीही त्यानं इतरांना चालायला कोणताही त्रास होवू नये, इतरांचं चालणं सोपं व्हावं, अशी चप्पल बनवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सलमाननं आपल्या बरोबरच्या दिव्यांगजनांना स्वतःच प्रशिक्षणही दिलं. आता या सर्वांनी मिळून चप्पलांची निर्मिती सुरू केली आहे. आणि तयार मालाचे विपणनही ते करत आहेत. स्वतः परिश्रम करून या लोकांनी केवळ स्वतःसाठी रोजगार उपलब्ध करून घेतला नाही तर आपल्या कंपनीला नफ्यामध्ये आणलं आहे. आता हे सर्व लोक मिळून दिवसभरामध्ये दीडशे जोडी चपला तयार करतात. सलमानने यावर्षी 100 दिव्यांगांना रोजगार देण्याचा संकल्पही केला आहे.
सलमान आणि सहकारी मंडळींचे धैर्य, त्यांची उद्यमशीलता यांना मी सलाम करतो. अशीच संकल्पशक्ती गुजरातमधल्या कच्छ भागातल्या अजरक गावातल्या लोकांनीही दाखवली आहे. सन 2001 मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर सर्व लोक गांव सोडून जात होते. त्याचवेळी इस्माईल खत्री नावाच्या व्यक्तीने गावांमध्येच राहून ‘अजरक प्रिंट’ ही आपली पारंपरिक कला जोपसण्याचा, तिचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. मग काय? पाहता पाहता नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून बनलेली अजरक कला सर्वांना मोहवून टाकू लागली. आता हे संपूर्ण गाव हस्तशिल्पाच्या आपल्या पारंपरिक कृतीनं जोडलं गेलं आहे. गावकरी वर्गानं केवळ शेकडो वर्षांची आपली जुनीकला जोपासली आहे, असं नाही तर त्याला आता आधुनिक फॅशनचीही जोड दिली आहे. आता खूप मोठ- मोठे, नामांकित डिझायनर, मोठमोठी संस्थाने, अजरक प्रिंटचा वापर करायला लागले आहेत. या गावातल्या परिश्रमी लोकांमुळे आज अजरक प्रिंट एक मोठा ब्रँड बनत आहे. संपूर्ण जगभरातून मोठे मोठे खरेदीदार या प्रिंटचे कापड खरेदी करण्यासाठी आकर्षित होत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
अलिकडेच देशभरामध्ये महाशिवरात्रीचं पर्व साजरं केलं. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादानं देशाचं चैतन्य जागृत व्हावं. महाशिवरात्रीला भोले बाबांनी दिलेल्या आशीर्वादाची कृपा आपल्या सर्वांवर कायम रहावी, आपल्या सर्व मनोकामना शिवजींनी पूर्ण कराव्यात, आपण सर्वजण ऊर्जावान, आरोग्यदायी रहावं, सुखी रहावं आणि देशाविषयी आपल्या कर्तव्याचं सर्वांनी पालन करीत रहावं.
मित्रांनो, महाशिवरात्रीबरोबरच आता वसंत ऋतूची बहार दिवसांगणिक वाढत जाणार आहे. आगामी काही दिवसातच होळीचा सण आहे. त्यानंतर लगेचच गुढी-पाडवाही येणार आहे. नवरात्रीचे पर्वही त्याला जोडून येणार आहे. राम-नवमीचा उत्सव येणार आहे. उत्सव आणि सण आपल्या देशाच्या सामाजिक जीवनाचे अभिन्न भाग आहेत. प्रत्येक सणाच्यामागे कोणता-ना-कोणता सामाजिक संदेश दडलेला असतोच. हाच संदेश केवळ समाजालाच नाही तर, संपूर्ण देशाला एकतेच्या धाग्यामध्ये बांधून ठेवतो. होळीनंतर चैत्र शुक्ल- प्रतिपदेपासून भारतीय विक्रम नव-वर्षाचा प्रारंभही होत असतो. त्यासाठीही, म्हणजेच, भारतीय नव-वर्षाच्याही मी आपल्या सर्वांना आधीच शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
पुढच्या ‘मन की बात’पर्यंत तर मला वाटतं, कदाचित विद्यार्थी परीक्षेत व्यग्र असणार. ज्यांच्या परीक्षा झालेल्या असतील, ते अगदी मस्त असतील. म्हणून जे व्यस्त आहेत आणि जे मस्त आहेत, त्यांनाही अनेक अनेक शुभेच्छा देतो. चला, यापुढची ‘मन की बात’ करण्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधण्यासाठी पुन्हा एकदा नक्की भेटू.
खूप-खूप धन्यवाद ! नमस्कार !!
B.Gokhale/AIR/P.Kor