पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसीला भेट देणार
दीनदयाल उपाध्याय स्मारकाचे लोकार्पण आणि पुतळ्याचे अनावरण
वाराणसी, उज्जैन आणि ओंकारेश्वर या तीन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार
वाराणसीमध्ये 430 खाटांचे अतिविशेष सरकारी रुग्णालयांसह अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ/लोकार्पण करणार
Posted On:
14 FEB 2020 5:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदार संघात भेट देणार आहेत.
पंतप्रधान जगद्गुरू विश्वराध्य गुरूकूलच्या शतकमहोत्सवी समारंभाच्या समारोप कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पंतप्रधान मोदी यावेळी श्री सिद्धांत शिखमणी ग्रंथच्या 19 भाषांमधील अनुवादीत आवृत्तींचे प्रकाशन तसेच त्याच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ करणार आहेत.
त्यानंतर नरेंद्र मोदी पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती केंद्राचे लोकार्पण करतील. या कार्यक्रमात पंतप्रधान पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 63 फूट उंचीच्या पंचलोह पुतळ्याचे अनावरण करतील. एखाद्या नेत्याचा देशातला हा सर्वात मोठा पुतळा आहे. हा पुतळा पूर्ण करण्यासाठी गेले वर्षभर 200हून अधिक कारागीर दिवस-रात्र काम करत होती.
या स्मृती केंद्रात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर आधारित कोरिव काम देखील पाहायला मिळेल. या प्रकल्पावर गेले वर्षभर ओदिशातले सुमारे 30 कारागीर काम करत होते.
त्यानंतर पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात 30हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. यामध्ये काशी हिंदू विश्वविद्यालय (व्हीएचयू) येथील 430 खाटांचे अतिविशेष सरकारी रुग्णालय आणि 74 खाटांचे मनोरुग्णालयाचा समावेश आहे.
पंतप्रधान व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून आयआरसीटीसीच्या महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. ही रेल्वे गाडी वाराणसी, उज्जैन आणि ओंकारेश्वर या तीन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. रात्रीचा प्रवास करणारी देशातील ही पहिली खासगी रेल्वे असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘काशी एक रुप अनेक’ चे उद्घाटन करतील. अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह जगाच्या विविध देशांमधून आलेल्या ग्राहक आणि कारागिरांशी पंतप्रधान संवाद साधतील. ‘काशी एक रुप अनेक’ हा दोन दिवस चालणारा कार्यक्रम पंडित दीनदयाल उपाध्याय हस्तकला संकुलात आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशातील वस्तू पाहायला मिळतील.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1603226)
Visitor Counter : 122