गृह मंत्रालय
अमली पदार्थ तस्करीची समस्या मुळापासून संपवण्याचा संकल्प करुया- केंद्रीय गृहमंत्री
अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी भारत कटिबद्ध
Posted On:
13 FEB 2020 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2020
अमली पदार्थ तस्करीची समस्या मुळापासून संपवण्याचा संकल्प करुया, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिम्सटेक देशांना केले आहे. ‘अमली पदार्थ तस्करी प्रतिबंध’ या बिम्सटेक सदस्य देशांच्या दोन दिवसांच्या परिषदेचे उद्घाटन आज नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
अमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार ही आज प्रत्येक देशासाठी मोठी समस्या आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काठमांडू येथे वर्ष 2018 मध्ये बिम्सटेक परिषदेत केलेल्या भाषणातले मुद्दे गृहमंत्र्यांनी उपस्थित केले.
अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पंतप्रधानांनी आखलेल्या धोरणानुसार भारतात अमली पदार्थ येऊ दिले जाणार नाहीत तसेच भारतातून त्याचा व्यापारही होऊ दिला जाणार नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी एकजुटीची आवश्यकता असून या कार्यात जगाचे नेतृत्व करण्याची भारताची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने उचललेल्या पावलांची माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली. भारतीय सुरक्षा दलांनी सप्टेंबर 2019 पर्यंत दोन मेट्रिक टनांहून अधिक बेकायदेशीर हेरॉईन जप्त केल्याची माहिती शहा यांनी दिली. भारतात गेल्या पाच वर्षात 1 लाख 89 हजारांहून अधिक अमली पदार्थ प्रकरणांची नोंद झाली असून 2 लाख 31 हजारांहून अधिक तस्करांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 1500 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
अमली पदार्थांचे सेवन व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी घातक आहेच याखेरीज अमली पदार्थांच्या व्यापारातून दहशतवादाला प्रोत्साहन मिळत असते, असे शहा यांनी नमूद केले.
या समस्येवर मात करण्यासाठीच्या सर्वोत्तम पद्धतींचे आदान-प्रदान करण्यासाठी हा मंच उपयुक्त ठरेल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
भारतासह बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे बंगालचा उपसागर आणि त्यालगतचे सात देश बिम्सटेकचे सदस्य आहेत.
R.Tidke/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1603127)
अभ्यागत कक्ष : 588