पंतप्रधान कार्यालय
भारत कृती आराखडा 2020 परिषदेला पंतप्रधानांनी केले संबोधित
प्रक्रिया केंद्रित करव्यवस्थेऐवजी नागरिक केंद्रीय करव्यवस्थेच्या मार्गावर वाटचाल- पंतप्रधान
नवभारताच्या उभारणीत माध्यमांनी महत्वपूर्ण रचनात्मक भूमिका बजावली पाहिजे- पंतप्रधान
भारत नव्या उंचीवर पोहोचावा यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य बजावले पाहिजे- पंतप्रधान
Posted On:
12 FEB 2020 10:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2020
‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने नवी दिल्ली येथे आज आयोजित केलेल्या भारत कृती आराखडा 2020 या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण झाले.
जगातील सर्वात तरुण राष्ट्र या नात्याने नव्या दशकासाठी भारत कृती आराखडा आखत असून वेगवान प्रगतीसाठी युवा भारत सज्ज आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
सरकारनेही हे चैतन्य अंगीकारले असून गेल्या आठ महिन्यात सरकारने निर्णयांबाबत शतक झळकावले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये या बदलांनी नव ऊर्जा संचारली असून विश्वासाचे वातावरण आहे.
आपण आपले जीवनमान सुधारु शकतो, दारिद्रयनिर्मूलन होऊ शकते हा विश्वास आज देशातल्या गरिबांमध्ये निर्माण झाला आहे आणि शेतीतले आपले उत्पन्न वाढू शकेल, हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
5 ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्था- छोटी शहरे आणि नगरांवर लक्ष:-
“पुढील पाच वर्षात अर्थव्यवस्था पाच ट्रिलिअन डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. उदिृष्ट निश्चित करुन त्या दिशेने प्रयत्न करणे श्रेयस्कर असते. हे उदिृष्ट सोपे नाही पण असाध्यही नाही;”असे पंतप्रधानांनी सांगितले.
हे उदिृष्ट साध्य करण्यासाठी देशातून होणारी निर्यात वाढवण्याबरोबरच निर्मिती क्षेत्र बळकट होणे अत्यंत महत्वाचे असून सरकारने त्यासाठी अनेक पावले उचलली असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
मात्र उदयोन्मुख अर्थव्यवस्था असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतारांमुळे येणाऱ्या आव्हानांचा सामना भारताला करावा लागतो, असे पंतप्रधानांनी सांगितले.
छोट्या शहरांच्या आर्थिक विकासावर एखाद्या सरकारकडून प्रथमच लक्ष केंद्रित करण्यात येत असून विकासाची नवी केंद्र निर्माण करण्याकडे लक्ष दिले जात असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला.
करव्यवस्था सुधारणे:-
“करव्यवस्था सुधारण्याबाबत प्रत्येक सरकारची पावले डळमळती होती. त्यामुळे वर्षानुवर्ष बदल झालाच नव्हता. आमचे सरकार आता प्रक्रियाकेंद्रित कर व्यवस्थेकडून नागरिक केंद्रीत करव्यवस्थेच्या मार्गावर वाटचाल करत आहे. करदात्यांच्या सनदेची अंमलबजावणी ज्या देशांमध्ये होते अशा निवडक देशांमध्ये भारत सहभागी होईल. करदात्यांच्या हक्कांची स्पष्ट व्याख्या ही सनद करेल.” असे पंतप्रधान म्हणाले.
लोकांकडून होणारी करचुकवेगिरी आणि त्यामुळे प्रामाणिक करदात्यांवर पडणारा दुप्पट बोजा याबाबत प्रत्येक भारतीयाने अंतर्मुख होऊन विचार करावा, असे सांगत जबाबदार नागरिक होण्याचे आणि आपला कर भरण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
समृद्ध भारताच्या उभारणीसाठी रचनात्मक भूमिका बजावण्याचे आवाहन पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना केले.
“जेव्हा प्रत्येक जण आपले कर्तव्य बजावेल, तेव्हा सोडवता येणार नाही, अशी कुठलीच समस्या नसेल. मग देशाला नवी शक्ती, नवी ऊर्जा मिळेल. यामुळे या दशकात भारत नव्या उंचीवर पोहोचेल;” असे पंतप्रधानांनी सांगितले.
R.Tidke/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1603122)
Visitor Counter : 113