राष्ट्रपती कार्यालय
आयएनएस शिवाजीला राष्ट्रपती ध्वज चिन्ह प्रदान केल्याप्रसंगी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केलेले भाषण
Posted On:
13 FEB 2020 5:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2020
- सह्याद्री पर्वतरांगाच्या हिरव्यागार परिसरात आल्याचा मला आनंद आहे. जंगल, धबधबे, सरोवर आणि सभोवतालच्या डोंगरांमुळे ही जागा निसर्गामध्ये विलीन होण्याचा एक शांत अनुभव देते.
- संचलनादरम्यान पवित्र उपस्थिती , स्मार्ट ड्रिल आणि हालचालींमधल्या नेमकेपणाबद्दल मला सर्व अधिकारी आणि जवानांचे अभिनंदन करायचे आहे. आज सकाळी ऊर्जेने परिपूर्ण असे संचलन आणि तुमच्या आचरणाद्वारे भारतीय नौदलाच्या या सर्वोच्च तांत्रिक प्रशिक्षण संस्थेत दिल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची प्रचिती आली.
- आयएनएस शिवाजीला राष्ट्रपतींचे ध्वज चिन्ह प्रदान करणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या संस्थेची स्थापना 1945 मध्ये एचएमआयएस शिवाजी म्हणून करण्यात आली. तेव्हापासून अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधांसह भारतीय नौदलाची प्रमुख तांत्रिक प्रशिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. या संस्थेने सागरी अभियांत्रिकीच्या सर्व बाबींमध्ये वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची गती कायम ठेवली आहे.
- मला हे जाणून घेताना आनंद होत आहे की नौदल, तटरक्षक दल आणि परदेशी मित्र देशांच्या सागरी अभियांत्रिकी शाखेच्या दोन लाखाहून अधिक अधिकारी आणि जवानांनी या सर्वोत्तम संस्थेमध्ये आतापर्यंत प्रशिक्षण घेतले आहे.
- तुम्हाला माहिती आहेच की, शांतता किंवा युद्ध प्रसंगी देशासाठी बजावण्यात आलेल्या अपवादात्मक सेवेच्या सन्मानार्थ सैनिकी विभागाला सन्मानित करण्याच्या सन्मानांमध्ये राष्ट्रपतींचे ध्वज चिन्ह सर्वोच्च स्थानी आहे. आयएनएस शिवाजीने गेल्या कित्येक वर्षांपासून देशाची उत्तम सेवा करून स्वत: चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामध्ये व्यावसायिक उत्कृष्टतेचा अभिमानपूर्ण विक्रम आहे तसेच त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडल्या आहेत. तुमची कर्तव्यनिष्ठा आणि समर्पणाबद्दल राष्ट्र तुम्हाला सलाम करत आहे. . तुम्हा सर्वांच्या कामगिरीचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि भारतीय नौदलातील तुमच्या उल्लेखनीय योगदानाची प्रशंसा करतो.
- आजच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी, ही उत्तम संस्था निर्माण करण्यासाठी अनेक दशकांपासून अथक परिश्रम घेतलेल्या सर्वांचे स्मरण करू या. आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे सुरू ठेवण्याच्या आपल्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी हे कार्य सुरु ठेवूया जेणेकरुन भारतीय नौदल नवीन शिखरे पादाक्रांत करेल आणि वैभवशाली बनेल.
- आयएनएस शिवाजी सर्वोत्कृष्टतेची 75 वर्षे पूर्ण करत असताना आपण आतापर्यंतच्या प्रवासाबाबत आत्मचिंतन करूया आणि भविष्याकडे लक्ष देऊया. स्वायत्त जहाजांची निर्मिती करण्यासाठी तंत्रज्ञान मोठी झेप घेत आहे. निर्णय प्रक्रिया आणि युद्ध सज्जतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तैनात आहेत. प्रमुख अभियांत्रिकी व्यवसायात स्पर्धा करत असताना, विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी सागरी अभियंत्यांचा त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रम देखील तयार करणे आवश्यक आहे. मला विश्वास आहे की आयएनएस शिवाजी आपल्या प्रशिक्षणार्थीना भविष्यात आवश्यक कौशल्य देत राहील.
- देशाच्या समुद्री हितांना साधारणपणे अर्थव्यवस्था आणि जनतेच्या कल्याणाशी जोडले जाते. मला सांगण्यात आले आहे की आपला सुमारे 90 टक्के व्यापार हा समुद्री मार्गाने हाताळला जातो. यामुळे केवळ राष्ट्रीय सुरक्षाच नव्हे तर आर्थिक सुरक्षेत आणि अशा प्रकारे राष्ट्र निर्मितीच्या विस्तृत प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्वाची ठरते. नौदल हे आपल्या सागरी सामर्थ्याचे प्रमुख साधन आहे. सैन्य आणि नागरी अशा दोन्ही सागरी हितांची ती मार्गदर्शक आहे. आपल्या सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी, आपले व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यात आणि नागरी आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात देण्याच्या नौदलाच्या प्रतिबद्धतेचा देशाला अभिमान आहे.
- संपूर्ण जगाला एकच कुटुंब मानून ‘वसुधैव कुटुंबंकम ’ (जग एक कुटुंब आहे) या भावनेने पुढे जात असताना, भारत सतत आपल्या जागतिक जबाबदाऱ्या पार पाडत आहे. मला हे समजून घेताना आनंद झाला की अलिकडेच चक्रीवादळ डायनामुळे मादागास्करमधल्या विध्वंसग्रस्त जनतेला मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन वॅनिला ’ सुरू केले. भारत आणि मादागास्कर हे हिंद महासागर प्रदेशाच्या माध्यमातून जोडलेले आहेत. मला 2018 मध्ये या बेटाचा दौरा करण्याचा बहुमान मिळाला. मला विशेष आनंद झाला की आमच्या मालागासी बंधू-भगिनींच्या बचावासाठी पुढाकार घेणारा भारत हा पहिला देश होता.
- एक अग्रगण्य शक्ती म्हणून आंतरराष्ट्रीय सुरक्षा, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रा संदर्भात जागतिक दृष्टिकोनाला आकार देण्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या वाढीस आपल्या सशस्त्र दलांच्या क्षमता आणि शौर्य यासह अनेक बाबींनी बळ दिले आहे.
- आज, जगातील भौगोलिक परिस्थिती आणि विशेषतः भारत-प्रशांत क्षेत्रात अधिक दक्षतेची गरज आहे. मला माहिती आहे की नौदलाने हिंद महासागर प्रदेशात मिशन-आधारित तैनाती स्वीकारल्या आहेत. निरंतर तैनाती आणि आमच्या हिताच्या क्षेत्रात अस्तित्वासाठी सागरी अभियंत्यांचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे. भविष्यात पारंपारिक ते अणु आणि इलेक्ट्रिक आणि संकरित प्रपल्शन प्रणालीत विविधता दिसून येईल. प्लटफॉर्मच्या कार्यात्मक उपलब्धतेवर आवश्यकतेनुसार देखभाल करण्याच्या संकल्पनेत आमूलाग्र बदल झाला आहे. आयएनएस शिवाजीने सर्व प्रशिक्षणार्थींना भविष्यातील आव्हानांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याची गरज आहे.
- आयएनएस शिवाजीचे ब्रीदवाक्य म्हणजे ‘कर्मसू कौशलम '’. याचा अर्थ “स्किल ॲट वर्क”. हे खरोखर एक आदर्श ब्रीद वाक्य आहे. मला खात्री आहे की आयएनएस शिवाजी व्यावसायिकता आणि कर्तृत्वासह आपली भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही त्यांची उंची आणि कर्तृत्व वाढतच जाईल.
- या अभिमानास्पद प्रसंगी मी पुन्हा एकदा भारतीय नौदल आणि आयएनएस शिवाजीचे अभिनंदन करतो आणि सर्व पुरुष आणि स्त्रियांना देशासाठी नि: स्वार्थ आणि समर्पित सेवा देण्याचे आवाहन करतो. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गौरवशाली भविष्य लाभो यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाच्या शुभेच्छा देतो.
तुम्ही कायम पाण्यावर अधिराज्य गाजवा .
धन्यवाद.
जय हिंद!
R.Tidke/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1603093)