पंतप्रधान कार्यालय
ईशान्य प्रदेश देशातील विकासाचे प्रमुख इंजिन बनत आहे- पंतप्रधान
अनेक दशकं जुन्या बोडो समस्या सर्व संबंधितांना एकत्र आणून सोडवण्यात आली
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधानांचे उत्तर
Posted On:
06 FEB 2020 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2020
ईशान्य प्रदेश हा आता दुर्लक्षित भाग राहिलेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर उत्तर देतांना सांगितले.
अनेक क्षेत्रात सरकारने केलेल्या कामांमुळे आज ईशान्य प्रदेश देशातील विकासाचे प्रमुख इंजिन बनले आहे, असे ते म्हणाले.
“ईशान्य भागातील लोकांना आता दिल्ली खूप दूर आहे, असे वाटत नाही. आता सरकार त्यांच्या दाराशी उभे आहे. आमचे मंत्री आणि अधिकारी नियमितपणे त्या भागाचा दौरा करत आहेत,” असे ते म्हणाले.
आपल्या सरकारने या भागाच्या विकासाच्या विविध पैलूंवर तसेच वीज जोडणी, रेल्वे जोडणी, मोबाईल संपर्क व्यवस्था पुरवण्यावर काम केल्याचे पंतप्रधान म्हणाले.
अलिकडेच स्वाक्षरी करण्यात आलेल्या बोडो करारासंदर्भात पंतप्रधान म्हणाले की, अनेक दशकं जुनी ही समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतांना सर्व संबंधितांना एकत्र आणून त्यावर तोडगा काढण्यात आला.
अनेक मुद्यांबाबत केवळ चालढकल केल्यामुळे अनेक दशकांपासून संकटाने ग्रासलेल्या या भागात किमान 40 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला, असे पंतप्रधान म्हणाले.
“मात्र यावेळी आम्ही सर्व संबंधितांना एकत्र आणले आणि या करारात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की यानंतर कोणतेही मुद्दे प्रलंबित नाही.”
S.Tupe/S.Kane/D.Rane
(Release ID: 1602301)
Visitor Counter : 250