पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर लोकसभेत पंतप्रधानांचे उत्तर


लोकांना वेगाने आणि अनेक कामे, निर्धार आणि निर्णय क्षमता हवी आहे- पंतप्रधान

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या तरतुदींत 5 पटीने वाढ- पंतप्रधान

मोठी गुंतवणूक, उत्तम पायाभूत सुविधा आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती हे सरकारचे स्वप्न

Posted On: 06 FEB 2020 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2020

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आशेची भावना पल्लवीत केली तसेच आगामी काळात देशाला पुढे घेऊन जाण्यासाठीची रुपरेषा सादर केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देतांना सांगितले.

आपण या शतकाच्या तिसऱ्या दशकात प्रवेश करत असतांना राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणामुळे आशेची भावना पल्लवीत केली तसेच आगामी काळात देशाला पुढे घेऊन जाण्यासाठीची रुपरेषा सादर केली, असे पंतप्रधान म्हणाले.

देशातील जनता आता आणखी प्रतिक्षा करण्यासाठी तयार नाही, त्यांना वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर कामे व्हायला हवी आहेत, तसेच निर्धार, निर्णय क्षमता, संवेदनशीलता आणि समस्यांवर तोडगा हवा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आमच्या सरकारने जलदगतीने काम केले असून, त्याचा परिणाम म्हणजे गेल्या 5 वर्षात 37 दशलक्ष लोकांची बँक खाती उघडण्यात आली, 11 दशलक्ष लोकांच्या घरात शौचालये, तसेच 13 दशलक्ष लोकांच्या घरी स्वयंपाकाच्या गॅसच्या जोडण्या देण्यात आल्या. 2 कोटी लोकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न आज साकार झाले आहे. दिल्लीतल्या 1700 अवैध वसाहतीत राहणाऱ्या 40 लाख लोकांची स्वत: घराची प्रतिक्षा संपली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

कृषी अर्थसंकल्पात 5 पटीने वाढ

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याला आमचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पिकाला सर्वाधिक किमान आधारभूत किंमत, पीकविमा आणि सिंचनाशी संबंधित योजना अनेक दशके प्रलंबित होत्या. आम्ही किमान आधारभूत किंमत दीड पटीने वाढवली, तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च केले.

साडेपाच कोटींहून अधिक शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी झाले, शेतकऱ्यांना साडेतेरा कोटी रुपये प्रिमियम देण्यात आला, तसेच 56 हजार कोटींहून अधिक किंमतीच्या विम्याच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला, असे पंतप्रधान म्हणाले. सरकारच्या कार्यकाळात कृषी अर्थसंकल्पात 5 पटीने वाढ झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. पीएम किसान सम्मान योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडत आहे. 45 हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. या योजनेत कुणीही दलाल नाही, तसेच अतिरिक्त कागदपत्रांचा फापटपसारा यात नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

 

मोठी गुंतवणूक, उत्तम पायाभूत सुविधा आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती हे आमचे स्वप्न

आपल्या सरकारने वित्तीय तूट नियंत्रणात ठेवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितले. ते म्हणाले, महागाई नियंत्रणात आहे आणि आर्थिकबाबतीतही स्थैर्य आहे.

गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांबाबत मोदी यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, आम्ही उद्योग, सिंचन, सामाजिक आणि ग्रामीण पायाभूत विकास, बंदर, जलमार्ग या क्षेत्रात अनेक उपक्रम हाती घेतले.

स्टँड अप इंडिया आणि मुद्रा योजनेमुळे अनेकांच्या जीवनात समृद्धी आली आहे. बहुतांश मुद्रा लाभार्थी महिला आहेत. मुद्रा योजने अंतर्गत 22 कोटी रुपयांहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आली असून, कोट्यवधी युवकांना याचा लाभ होत आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले, सरकार कामगार सुधारणांवर काम करत असून, कामगार संघटनांशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

पंतप्रधान म्हणाले, आमच्यासाठी पायाभूत विकास म्हणजे महत्वाकांक्षा आणि कामगिरीचे मिश्रण आहे, लोकांना त्यांच्या स्वप्नांशी जोडणे आहे. एका मुलाला शाळेशी, शेतकऱ्यांला बाजारपेठेशी आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या ग्राहकांशी जोडणे म्हणजे पायाभूत विकास आहे.

भारताच्या विकासाला गती देणाऱ्या विविध घटकांमध्ये नव्या पिढीच्या पायाभूत सुविधांचा समावेश असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पूर्वीच्या काळात पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे काही निवडक लोकांसाठी आर्थिक संधी उपलब्ध झाल्या, इतरांसाठी नाही. आम्ही हे क्षेत्र पारदर्शक बनवले आणि संपर्क व्यवस्थेला चालना देण्यावर आम्ही काम करत आहोत, असे ते म्हणाले.

आगामी काळात पायाभूत क्षेत्रात आम्ही 100 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार असून, यामुळे विकास, अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

  

 

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane


(Release ID: 1602298) Visitor Counter : 302


Read this release in: English