पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधल्या बिराटनगर आयसीपीचे ‘रिमोट’च्या माध्यमातून उद्‌घाटन केले आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या घरकुल पुनर्निर्माण प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला, याप्रसंगी केलेले भाषण

Posted On: 21 JAN 2020 4:24PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2020

 

माझे मित्र आणि नेपाळचे माननीय पंतप्रधान सन्माननीय के.पी. शर्मा ओली जी, दोन्ही देशांचे वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी वर्ग,

नमस्कार !

सर्वात प्रथम माझ्या वतीने आणि सर्व भारतवासियांच्या वतीने ओली जी आणि नेपाळमधल्या आमच्या सर्व मित्रांना नवीन वर्ष 2020 च्या शुभेच्छा देतो. 

ही केवळ नवीन वर्षांची सुरूवात आहे असे नाही, तर एका नव्या दशकाचा आरंभ झाला आहे.

हे नवीन दशक आपल्या सर्वांना चांगले आरोग्य, दीर्घ आयुष्य, प्रगती, प्रसन्नता आणि शांती घेवून येणार असावं, अशी भावना नववर्षाच्या शुभेच्छा देताना,  मी व्यक्त करतो.

दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संक्रांतीचा सणही वेगवेगळ्या रितीरिवाजानुसार परंतु अगदी एकसारख्या उत्साहामध्ये गेल्या आठवड्यामध्ये साजरा केला. या सणानिमित्तही मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.

सन्माननीय,

या नवीन वर्षाच्या आणि दशकाच्या प्रारंभीच आज आपण सर्वजण एका चांगल्या कार्यात सहभागी होत आहोत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

गेल्या पाच महिन्यामध्ये आज हे दुस-यांदा दोन्ही देशांच्या दरम्यान सुरू असलेल्या व्दिपक्षीय प्रकल्पांचे उद्घाटन ‘व्हिडिओ लिंक’च्या माध्यमातून केले जात आहे. हे एक भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधामध्ये होत असलेल्या विस्ताराचे आणि वेगाने होत असलेल्या विकासाचे प्रतीक आहे.

मित्रांनो,

नेपाळचा चहुबाजुंनी विकास व्हावा, यासाठी नेपाळने ज्या गोष्टींना प्राधान्य दिले आहे, त्याचा विचार करून भारत एक विश्वसनीय भागीदार म्हणून भूमिका निभावत आहे.

‘सर्वात प्रथम शेजारधर्म’ याला माझ्या सरकारने प्राधान्य दिले आहे. आणि सीमा पलिकडच्या देशांबरोबर संपर्कयंत्रणा अधिक मजबूत करणे हेही एक मुख्य ध्येय आहे.

ज्यावेळी भारत आणि नेपाळची चर्चा केली जाते, त्यावेळी चांगल्या संपर्क यंत्रणेचं महत्व जास्त वाढतं. कारण आमचे संबंध फक्त शेजारी म्हणून नाहीत. इतिहास आणि भूगोल यांच्यामुळे या दोन्ही देशांना अनेकानेक धाग्यांनी जोडले आहेत, यामध्ये निसर्ग, परिवार, भाषा, संस्कृती, प्रगती अशा अनेक धाग्यांचा समावेश आहे.

म्हणूनच आपल्या दोन्ही देशांमध्ये चांगली संपर्क यंत्रणा आपल्या दैनंदिन आयुष्याला अधिक चांगल्या पद्धतीने जोडणार आहे. आपली मने, हृदये यांना जोडून नवीन मार्ग मोकळे करणार आहे.

संपर्क यंत्रणा फक्त देशाचा नाही तर संपूर्ण क्षेत्राचा विकास करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते.

शेजारधर्मामध्ये सर्व मित्र देशांबरोबर येणे-जाणे अधिक चांगल्या पद्धतीने आणि सुकरतेने करतानाच आपल्या दरम्यान व्यापार, संस्कृती, शिक्षण आदि क्षेत्रांमध्ये संपर्क आणि सुगमता आणण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.

भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान सुरू असलेल्या अनेक संपर्क यंत्रणा प्रकल्पांच्या माध्यमातून दोन्ही देश जोडण्याचे काम केले जात आहे. यामध्ये रस्ते वाहतूक प्रकल्प, रेल्वे, ट्रान्समिशन लाईन्स यांचे काम सुरू आहे. आमच्या देशांच्या सीमेच्या मुख्य स्थानांवर ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’ (आयसीपी)बनवून एकमेकांच्या देशांच्या दृष्टीने व्यापार आणि येणे-जाणे अधिक सुविधादायी बनवण्यात येत आहे.

सन्माननीय,

आसीपी बनवण्याच्या पहिल्या टप्प्यात आपण बीरगंज आणि बिराटनगर इथं आसीपी विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बीरगंज आयपीसीचे आपण 2018 मध्ये उद्घाटन केले.

आता बिराटनगर आयसीपी सुरू होत आहे. ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. भारताच्याबाजूने रक्सौल आणि जोगबनी इथं या सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहेत. 

आगामी वर्षांमध्ये आपण अशा प्रकारच्या अनेक आधुनिक सुविधा प्रकल्प विकसित करू, असा मला पूर्ण विश्वास आहे. 

सन्माननीय,

2015 मध्ये अतिशय भीषण भूकंपाच्या आपत्तीला आपल्याला सामोरं जावं लागलं होतं. भूकंपासारखी नैसर्गिक संकटे माणसाच्या दृढतेची आणि निश्चयाची परीक्षा घेत असतात.  या संकटप्रसंगाला आमच्या नेपाळी बंधू आणि भगिनींनी अतिशय धैर्यानं तोंड दिलं, भूकंपाच्या त्रासदायक परिणामांचा सर्वजण अत्यंत धाडसाने सामना करीत आहेत, याचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटतो.

मदत आणि बचाव कार्यामध्ये भारताने शेजारधर्माचं पालन करून सर्वात पहिल्यांदा मदतीचा हात दिला. आणि नेपाळच्या पुनर्निर्माणाच्या कार्यात नेपाळींच्या खांद्याला खांदा लावून भारत उभा राहिला आहे. सर्वात जवळचा शेजारी आणि मित्र या नात्याने आम्ही नेपाळला ही मदत करणं आमचं कर्तव्य मानतो. 

म्हणूनच गोरखा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये घरकुलांच्या पुनर्निर्माणामध्ये चांगली प्रगती पाहून मला अतिशय आनंद झाला. 

ही नव्यानं बांधण्यात येणारी घरकुले पहिल्यापेक्षा अधिक चांगली, सुविधाजनक आणि भूकंपरोधक तंत्रज्ञान वापरून बनवली जावीत, यासाठी आमचा प्रयत्न आहे.

कोणत्याही आपत्तीमध्ये जास्त काळ टिकून राहणारी घरं निर्माण करण्याचं तंत्रज्ञान वापरण्यामागे एक विशिष्ट उद्देश भारताचा आहे. यामुळे भविष्यात एखादी नैसर्गिक आपत्ती आलीच तर कमीत कमी नुकसान आणि जीवितहानी होईल.

भारत आणि नेपाळ यांच्या सहयोगातून पन्नास हजारांपैकी आत्तापर्यत 35 हजार घरकुलांची निर्मिती पूर्ण झाली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. उर्वरित घरांचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. आणि ही सर्व नेपाळी बंधू आणि भगिनींना लवकरच समर्पित करण्यात येतील.

सन्माननीय,

आपल्या सहकार्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्या संबंधांमध्ये अभूतपूर्व प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. सहकार्य आणि विकास यांच्यातल्या भागीदारीमुळे दोन्ही देशांचे ऋणानुबंध अधिकाधिक दृढ होत आहेत. त्याचजोडीला आम्ही विविध नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य सुरू केले आहे.

नवीन वर्षामध्ये आपल्या सहकार्याने आणि समर्थनाने उभयतांचे संबंध नवीन उंची प्राप्त करतील, अशी कामना मी करतो. हे नवीन दशक भारत- नेपाळ यांच्या संबंधांचे स्वर्णिम दशक बनेल, अशी आशा करतो.

पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चांगल्या आरोग्याची कामना करतो आणि आपल्याला सर्व क्षेत्रात यश मिळावे, अशा शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जोडले गेलात, याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवादही देतो.

अखेरीस ‘मा, तपाई सबै लाइ धेरै शुभकामना दिन्छूँ !!

नमस्कार!

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1600813) Visitor Counter : 114


Read this release in: English