पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाव्हायरस प्रादुर्भावावरील उच्चस्तरीय बैठक
Posted On:
25 JAN 2020 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली चीनमधील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावाबद्दल उच्चस्तरीय बैठक झाली.
बैठकीत अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराशी संबंधित अलिकडील घडामोडी, सज्जता आणि प्रतिसादात्मक उपाययोजनांची माहिती प्रधान सचिवांना दिली.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रधान सचिवांना रुग्णालयांची तयारी, प्रयोगशाळेची तयारी, जलद प्रतिसाद दलाची क्षमता वाढवण्याच्या उपाययोजना आणि मंत्रालयाने हाती घेतलेल्या व्यापक देखरेख उपक्रमांची माहिती दिली.
प्रधान सचिवांनी विमान वाहतूक मंत्रालयासारख्या अन्य मंत्रालयांनी घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा आढावा देखील घेतला.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, इतर विविध केंद्रीय मंत्रालये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयाने परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे अधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांना संगितले.
आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील 115 उड्डाणांमधून आलेल्या 20,000 लोकांची तपासणी केली गेली आहे. देशभरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅब विषाणूची चाचणी घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. सर्व राज्य आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांंना सतर्क करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आहेत.
केंद्रीय सचिव राजीव गौबा, गृह सचिव अजय कुमार भल्ला, परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले, संरक्षण सचिव अजय कुमार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रीती सुदान, नागरी उड्डयन सचिव प्रदीपसिंग खरोला आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
S.Tupe/S.Kane/D.Rane
(Release ID: 1600576)
Visitor Counter : 191