अर्थ मंत्रालय

जीएसटी करदाते आता जीएसटीआर-3बी विवरण टप्प्याटप्प्याने भरू शकतील

Posted On: 22 JAN 2020 7:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2020

 

जीएसटी कर विवरण पत्र भरताना व्यापारी आणि उद्योग क्षेत्रांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याच संदर्भात आज केंद्रीय अर्थमंत्रालयाने सांगितले की, आता जीएसटी करदाते त्यांचे जीएसटीआर-3बी पत्र तुकड्या तुकड्यांमध्ये भरू शकतील.

सध्या जीएसटीआर-3बी कर विवरण पत्र भरण्यासाठी अंतिम तारीख प्रत्येक महिन्याची 20 तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापुढे पाच कोटी आणि त्यापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या करदात्यांसाठी प्रत्येक महिन्याची 20 तारीख निश्चित करण्यात आली आहे. सुमारे आठ लाख नियमित करदात्यांना यापुढे दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत कर विवरण पत्र भरण्यासाठी कुठलेही विलंब शुल्क लागणार नाही.

ज्या करदात्यांची वार्षिक उलाढाल गेल्या वित्तीय वर्षात पाच कोटींपेक्षा कमी होती त्यांना दोन श्रेणीमध्ये विभाजित करण्यात आले आहे. यात 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील-यात महाराष्ट्राचाही समावेश आहे- करदात्यांसाठी जीएसटीआर-3बी कर विवरण पत्र भरण्याची अंतिम तारीख 22 असेल. यात 49 लाख करदात्यांचा समावेश आहे.

उर्वरित 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यातील 46 लाख करदात्यांसाठी जीएसटीआर-3बी अंतर्गत कर विवरण पत्र भरण्याची अंतिम तारीख प्रत्येक महिन्याची 24 तारीख निश्चित करण्यात आली आहे.

यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, अशी माहिती अर्थमंत्रालयाने दिली आहे. जीएसटीआर-3बी आणि इतर कर विवरण भरताना येणाऱ्या अडचणींची दखल वित्त मंत्रालयाने घेतली आहे. यासंदर्भात इन्फोसिस या सेवा पुरवठादार कंपनीशी चर्चा करण्यात आली असून कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. एप्रिलपर्यंत या उपाययोजना कार्यान्वित होतील, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.

 

M.Chopade/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1600269) Visitor Counter : 152


Read this release in: English