पंतप्रधान कार्यालय

नेपाळ आणि भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते संयुक्तिकरित्या जोगबनी-बिराटनगर एकात्मिक तपास चौकीचे उद्‌घाटन


नेपाळमधल्या घर पुनर्बांधणी प्रकल्पाच्या प्रगतीचा घेतला आढावा

Posted On: 21 JAN 2020 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी आज संयुक्तरित्या जोगबनी-बिराटनगर एकात्मिक तपास चौकीचे उद्‌घाटन केले.

जोगबनी-बिराटनगर हे दोन्ही देशांमधले महत्वाचे व्यापार केंद्र आहे. एकात्मिक तपास चौकी अद्ययावत सुविधांनी सज्ज आहे.

भारत-नेपाळ सरहद्दीवर व्यापार आणि नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी भारताच्या साहाय्यातून जोगबनी-बिराटनगर ही दुसरी एकात्मिक तपास चौकी बांधण्यात आली.

दोन्ही पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

नेपाळच्या सर्वांगीण विकासासाठी विश्वासू भागीदाराची भूमिका भारत बजावत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

‘शेजारी प्रथम’ हे माझ्या सरकारचे प्रमुख धोरण आहे आणि सीमेपार दळणवळण सुधारणा हा त्यातला महत्वाचा पैलू आहे; असे त्यांनी सांगितले.

भारत-नेपाळ यांच्यातील उत्तम दळणवळण तर अधिकच महत्वाचे आहे कारण केवळ शेजारी देश म्हणूनच आपले संबंध मर्यादित नाहीत. संस्कृती, कुटुंब, भाषा, निसर्ग, विकास अशा अनेक दुव्यांच्या माध्यमातून आपल्या इतिहास आणि भूगोलाने आपल्याला जोडले आहे; असे मोदी म्हणाले.

मैत्री असलेल्या सर्व देशांसोबत वाहतुकीच्या चांगल्या सुविधा विकसित करण्यासाठी आणि व्यापार, संस्कृती, शिक्षण इत्यादी क्षेत्रातले संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी माझे सरकार प्रतिबद्ध आहे; असे पंतप्रधानांनी सांगितले.

रस्ते, रेल्वे आणि ट्रान्समिशन लाइन्स अशा सीमापार दळणवळण प्रकल्पांसाठी भारत काम करत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

नेपाळमध्ये भूकंपानंतर भारताच्या साहाय्यातून सुरु असलेल्या घर पुनर्बांधणी प्रकल्पाची उल्लेखनीय प्रगती दोन्ही पंतप्रधानांनी पाहिली.

नेपाळमध्ये 2015 मध्ये झालेल्या भूकंपाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. तेव्हा मदत आणि बचावकार्यात भारताने धाव घेतली होती आणि आताही आपल्या मित्राच्या नेपाळच्या पुनर्बांधणीत भारत खांद्याला खांदा लावून काम करत आहे.

गोरखा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये 50,000 घरे बांधण्याचे वचन भारताने दिले होते. त्यापैकी 45,000 बांधून झाली आहेत.

नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी भारताचे आभार मानले.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1599995) Visitor Counter : 151


Read this release in: English