पंतप्रधान कार्यालय
कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनदिन समारंभाला पंतप्रधान उपस्थित, कोलकाता बंदरासाठी बहुविध विकास प्रकल्पांचा केला शुभारंभ
पोर्ट अँथेम सुरु केले
किनारपट्टी विकासाचे प्रवेशद्वार आहेत - पंतप्रधान
कोलकाता पोर्ट ट्रस्टचे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी असं नामकरण
कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाप्रती 501कोटी रुपयांचा धनादेश केला सुपूर्द
सुंदरबनच्या आदिवासी विद्यार्थीनींसाठी कौशल विकास केंद्र आणि प्रीतीलता छात्र आवासचे केले उद्घाटन
Posted On:
12 JAN 2020 7:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी झाले.
कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी मूळ बंदर जेट्टीच्या ठिकाणी एका पट्टिकेचे अनावरण केले.
देशाच्या जलशक्तीचे ऐतिहासिक प्रतीक असलेल्या कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनदिन समारंभात सहभागी होणे हे आपले सौभाग्य असल्याचे मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, “हे बंदर परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यापर्यंतच्या अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे सत्याग्रहापासून स्वच्छग्रहापर्यंत, या बंदराने देशाला बदलताना पाहिले आहे. या बंदराने केवळ मालवाहतूक पाहिली नाही तर देशात आणि जागत आपला ठसा उमटवणारे ज्ञान वाहक देखील पाहिले. एक प्रकारे कोलकाताचे हे बंदर भारताच्या औद्योगिक, अध्यात्मिक आणि आत्मनिर्भरतेच्या आकांक्षांचे प्रतीक आहे.”
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पोर्ट अँथमचाही शुभारंभ केला.
पंतप्रधानांनी नमूद केले की, गुजरातचे लोथल बंदर ते कोलकाता बंदर पर्यंतची भारताची लांब किनारपट्टी केवळ व्यापार आणि व्यवसायातच नव्हे तर जगभरात संस्कृती आणि सभ्यता यांचा प्रसार करण्याचे कामही करत आहे.
“आमच्या सरकारचा असा विश्वास आहे की आपली किनारपट्टी विकासाचे प्रवेशद्वार आहेत. यामुळेच पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि बंदरांचा संपर्क सुधारण्यासाठी सरकारने सागरमाला प्रकल्प सुरू केला. या योजनेअंतर्गत सहा लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 हजार 600 प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी तीन लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 200 हून अधिक प्रकल्पांचे काम सुरू असून सुमारे एकशे पंचवीस प्रकल्प पूर्ण झाले आहेत. कोलकाता बंदर नदीवरील जलमार्गाच्या निर्मितीमुळे पूर्व भारतातील औद्योगिक केंद्रांशी जोडलेले आहे आणि नेपाळ, बांगलादेश, भूतान आणि म्यानमारसारख्या देशांसमवेत व्यापार सुकर झाला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट
पंतप्रधानांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टचे श्यामा प्रसाद मुखर्जी असे नामकरण केले. “बंगालचे सुपुत्र डॉ. मुखर्जी यांनी देशातील औद्योगिकीकरणाची पायाभरणी केली आणि चितरंजन लोकोमोटिव्ह फॅक्टरी, हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी, सिंदरी फर्टिलायझर फॅक्टरी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन यासारख्या प्रकल्पांच्या विकासात मोलाची कामगिरी बजावली. बाबासाहेबांचीही मला आठवण येते. डॉ. मुखर्जी आणि बाबासाहेबांनी स्वातंत्र्योत्तर भारताला एक नवीन दृष्टी दिली”, असे पंतप्रधान म्हणाले.
कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या निवृत्तिवेतनधारकांचे कल्याण
नरेंद्र मोदी यांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या सेवानिवृत्त आणि विद्यमान कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतनाच्या निधीतील तूट भरुन काढण्यासाठी अंतिम हप्ता स्वरूपात 501 कोटी रुपयांचा धनादेशही दिला.
पंतप्रधानांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दोन सर्वात वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारक नगीना भगत आणि नरेश चंद्र चक्रवर्ती (अनुक्रमे 105 आणि 100 वर्षे) यांचा सत्कार केला.
सुंदरबनच्या 200 आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधानांनी कौशल्य विकास केंद्र आणि प्रीतीलता छात्र आवासचे उद्घाटन केले.
पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम बंगालच्या विकासासाठी विशेषत: गरीब, वंचित आणि शोषितांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ते म्हणाले की, पश्चिम बंगाल राज्य सरकारने आयुष्मान भारत योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधीला मंजुरी दिल्यास पश्चिम बंगालमधील लोकांनाही या योजनांचा लाभ मिळू शकेल
पंतप्रधानांनी नेताजी सुभाष सुकी गोदी येथे कोचीन कोलकाता जहाज दुरुस्ती कारखान्यात सुधारित जहाज दुरुस्ती सुविधेचे उद्घाटन केले.
पंतप्रधानांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या फुल रेक हँडलिंग सुविधेचे उद्घाटन केले आणि सुरळीत मालवाहतूक आणि माल हाताळणी वेळेत बचत करणाऱ्या कोलकाता डॉक सिस्टमच्या सुधारीत रेल्वे पायाभूत सुविधेचे लोकार्पण केले.
पंतप्रधानांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या हल्दिया गोदी संकुलात धक्का क्रमांक 3 चे यांत्रिकीकरण आणि प्रस्तावित रिव्हरफ्रंट विकास योजना देखील सुरू केली.
D.Wankhede/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1599204)
Visitor Counter : 136