पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 11 आणि 12 जानेवारी 2020 रोजी कोलकाताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार


4 पुनर्विकसित वारसा इमारतींचे लोकार्पण करणार

कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समारंभात सहभागी होणार

कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या निवृत्त आणि विद्यमान कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन विषयक गरजा पूर्ण करणार

पोर्ट ट्रस्टच्या दोन सर्वात वयोवृद्ध शंभरी पार केलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार

Posted On: 10 JAN 2020 2:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 जानेवारी 2020 रोजी कोलकात्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

वारसा इमारतींचे लोकार्पण

11 जानेवारी रोजी पंतप्रधान कोलकाता येथील चार पुनर्विकसित वारसा इमारतींचे लोकार्पण करणार आहेत.

ओल्ड करन्सी बिल्डींग, बेल्वेडेर हाऊस, मेट काल्फ हाऊस आणि व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल या त्या चार इमारती आहेत. या चार प्रसिद्ध गॅलरींचा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने पुनर्विकास करुन त्यांचे नवीन प्रदर्शनात रुपांतर केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार सांस्कृतिक मंत्रालय देशातल्या विविध महानगरांमधील प्रसिद्ध इमारतींचा सांस्कृतिक विकास करत आहे. कोलकाता, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि वाराणसी या शहरांपासून त्याची सुरुवात करण्यात येत आहे.

कोलकाता पोर्ट ट्रस्टचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम

पंतप्रधान 11 आणि 12 जानेवारी रोजी  कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या निवृत्त आणि विद्यमान कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन निधीतील तफावत दूर करण्यासाठी पंतप्रधान 501 कोटी रुपयांचा धनादेश अंतिम हफ्ता स्वरुपात प्रदान करतील.

अन्य एका कार्यक्रमात पंतप्रधान नगीना भगत (105 वर्ष) आणि नरेशचंद्र चक्रवर्ती (100 वर्ष) या कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दोन वयोवृद्ध निवृत्ती वेतन धारकांचा सत्कार करणार आहेत.

पंतप्रधान या कार्यक्रमात पोर्ट ॲन्थेम प्रकाशित करतील.

मूळ बंदर जेट्टीच्या ठिकाणी 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ एका पट्टिकेचे उद्‌घाटनही ते करतील.

नेताजी सुभाष सुकी गोदी येथे कोचीन कोलकाता जहाज दुरुस्ती कारखान्याच्या सुधारित जहाज दुरुस्ती सुविधेचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

मालवाहतूक सुरळीत चालावी आणि माल हाताळणीच्या वेळेत बचत व्हावी यासाठी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या कोलकाता डॉक प्रणालीच्या सुधारित रेल्वे पायाभूत सुविधेचे लोकार्पण करतानाच फूल रेक हाताळणी सुविधेचे उद्‌घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या हल्दीया गोदी संकुलात बर्थ क्रमांक तीनच्या यांत्रिकीकरणाचा प्रारंभ तसेच प्रस्तावित नदी-किनारा विकास योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न गोसाबा इथल्या पूर्वांचल कल्याण आश्रमाच्या सहकार्याने कोलकाता पोर्ट ट्रस्टने हाती घेतलेल्या सुंदरबनच्या 200 आदिवासी विद्यार्थीनींसाठी कौशल्य विकास केंद्र आणि प्रितीलता विद्यार्थीनी आवास या प्रकल्पाचे उद्‌घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे.

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 



(Release ID: 1599004) Visitor Counter : 142


Read this release in: English