पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

देशातल्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्राची 24.56 टक्क्यांपर्यंत वाढ


गेल्या 4 वर्षात वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्रात 130 दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक वाढ; ही वाढ म्हणजे एक उल्लेखनीय कार्य- केंद्रीय पर्यावरण मंत्री

Posted On: 30 DEC 2019 6:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2019

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ या द्वैवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा अहवाल भारतीय वन सर्वेक्षणाने प्रकाशित केला आहे. या अहवालात देशातील वन आणि वृक्ष संसाधनांचा द्वैवार्षिक आढावा घेण्यात आला आहे. 1987 पासून अशा अहवालांचे प्रकाशन होत असून, हा 16वा अहवाल आहे.

वन आच्छादनात सातत्याने वाढ होणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी भारत हा एक देश असल्याचे जावडेकर यांनी नमूद केले. सध्याच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण वन आणि वृक्ष आच्छादन 80.73 दशलक्ष हेक्टर इतके असून, ते देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.56 टक्के आहे.

2017 च्या अंदाजाच्या तुलनेत देशातल्या एकूण वन आणि वृक्ष आच्छादनात 5188 चौ.किमी.ची वाढ दिसून आली आहे. यापैकी वन आच्छादन 3976 चौ.किमी. तर वृक्ष आच्छादन 122 चौ.किमी इतके आहे.

देशात क्षेत्रफळाचा विचार करता वन आच्छादनात मध्य प्रदेश, पहिल्या क्रमांकावर असून, त्या खालोखाल अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागत असल्याचे आकडेवारीत आढळून आले आहे.

खारफुटी क्षेत्र वाढीमधे गुजरातचा पहिला, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.

देशात बांबू आच्छादित क्षेत्र अंदाजित 16.00 दशलक्ष हेक्टर असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

जंगलातील पाणथळ भाग पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी जैवविविधता आढळून येते. या अहवालानुसार देशात 62,466 पाणथळ जागा आहेत.

हा अहवाल तयार करताना अत्याधुनिक उपग्रहाद्वारे प्राप्त झालेल्या आकडेवारीचा वापर करण्यात आला आहे.

 

 

 

S.Tupe/J.Patankar/D.Rane

 (Release ID: 1598013) Visitor Counter : 453


Read this release in: English