मंत्रिमंडळ

भारत-ब्राझील यांच्यात जैवऊर्जा सहकार्या संबंधित सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली

Posted On: 24 DEC 2019 5:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने जैवऊर्जा सहकार्या संदर्भात भारत आणि ब्राझील यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे.

भारत आणि ब्राझील हे जगातील उर्जेचे सर्वात मोठे वापरकर्ते आहेत आणि संपूर्ण एलएसी (लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन) प्रदेशात ब्राझील हा भारताचा एक महत्त्वपूर्ण व्यापारिक भागीदार आहे. ब्राझील हा सध्या जगातील दुसर्‍या क्रमांकाचा जैवइंधन उत्पादक आणि ग्राहक आहे. जैव-इंधन क्षेत्रात भारतानेही आपले लक्ष केंद्रित केले आहे आणि 2018 मध्ये जैव-इंधना संदर्भातील नवीन धोरण जाहीर केल्याने, 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये इथॅनॉलचे 20% आणि डिझेलमध्ये बायोडीझेलचे 5% मिश्रण करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात 2016 मध्ये झालेल्या बैठकी दरम्यान, अक्षय ऊर्जा तसेच आधुनिक क्षेत्रातल्या संशोधन आणि विकासासाठी सहकार्य करण्याचे उभय पक्षांनी मान्य केले.

या संदर्भात, सामंजस्य करार फीडस्टॉक, औद्योगिक रूपांतरण, वितरण आणि शेवटच्या वापराच्या क्षेत्रांसह जैवइंधन, बायोइलेक्ट्रिसिटी आणि बायोगॅस पुरवठा शृंखलेमध्ये गुंतवणूकीला सहकार्य आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक आराखडा प्रदान करेल. सामंजस्य कराराच्या काही अन्य वैशिष्ट्यांमध्ये ऊस, मका, तांदूळ, तेल-पिके आणि लिग्नोसेल्युलोसिक पीकांसह जैव उर्जेसंदर्भात कृषी पद्धती आणि धोरणांची माहितीची देवाण-घेवाण; जैव-इंधनाच्या वापरावर आधारित हरितगृह वायू उत्सर्जन पातळी कमी करण्याची धोरणे, इंजिन आणि इंधन बदल/जीवाश्म इंधनासह मिश्रित जैवइंधनाच्या भिन्न टक्केवारीसाठी आवश्यक असणारी समायोजने आदींचा समावेश आहे.

 

S.Tupe/S.Mhatre/P.Malandkar

 

 



(Release ID: 1597434) Visitor Counter : 121


Read this release in: English