संरक्षण मंत्रालय

एकात्मिक वित्त सेवा विभाग हा कोणत्याही मंत्रालयाचा कणा असतो- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

प्रविष्टि तिथि: 24 DEC 2019 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2019

 

कोणत्याही मंत्रालय किंवा विभागाला आपले काम दिलेल्या निधीत पूर्ण करायचे असेल आणि त्याच वेळी त्या कामाच्या दर्जाशी काहीही तडजोड न करता इच्छित उदिृष्ट साध्य करायचे असेल तर त्यासाठी केवळ एकात्मिक वित्तीय विभाग मदत करु शकतो. त्यामुळे या अर्थाने एकात्मिक वित्त विभाग कोणत्याही मंत्रालय किंवा विभागाचा कणाच असतो असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत आज एकात्मिक वित्तीय सल्लागार कार्यशाळेत ते बोलत होते. संरक्षण मंत्रालयाचा वित्त विभाग आणि वित्तीय खात्यांचा महालेखापाल विभाग यांची तिन्ही संरक्षण सेवांच्या कार्यक्षमतेत महत्वाची भूमिका आहे. या तीन सेवांसह संरक्षणाशी संबंधित इतर सेवांसाठीही सूत्रबद्ध पद्धतीने काम करण्याचे उदिृष्ट वित्त विभागामुळेच पूर्ण होते.

गेल्या तीन वर्षात संरक्षणासाठी मिळालेला सर्व निधी वापरण्यात आला आहे अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. त्याशिवाय लष्कराच्या आकस्मिकता कारवायांची गरज लक्षात घेऊन आर्थिक बाबतीत लष्करी सेवांना आकस्मिक अधिकारही देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.

अशा कार्यशाळातून सरकारची धोरणे राबवण्याला मदत होते तसेच भविष्यातील धोरणांची दिशाही निश्चित होते. ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ या संकल्पनेवर चालणाऱ्या कार्यपद्धतीत अधिक प्रभावी फलश्रुती मिळते असे राजनाथ सिंह म्हणाले. या कार्यशाळेतून संरक्षण विभागाला मिळणाऱ्या निधीचा अधिक चांगला उपयोग करण्यासाठी प्रभावी साधने मिळू शकतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 


(रिलीज़ आईडी: 1597339) आगंतुक पटल : 130
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English