उपराष्ट्रपती कार्यालय
चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटातून हिंसा, अश्लिलता आणि भडक चित्रण टाळावे: उपराष्ट्रपतींचे आवाहन
भारतीय चित्रपट सृष्टीत आणि प्रादेशिक चित्रपटांनी जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली, 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपराष्ट्रपतींचे गौरवोद्गार
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2019 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2019
चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटातून हिंसा, अश्लिलता आणि भडक चित्रण टाळावे, कारण त्याचा प्रेक्षकांवर विशेषत: तरुणांवर परिणाम होतो, असे मत उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले. उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज नवी दिल्लीत 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण झाले, त्यावेळी ते बोलत होते.
सिनेमा हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, त्यामुळेच सिनेमा बनवतांना निर्मात्यांनी गांभिर्याने सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. सिनेमा हा सामाजिक परिवर्तन आणि लोक शिक्षणाचे उत्तम माध्यम बनू शकतो, असे नायडू म्हणाले. समाजातल्या कुप्रथांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी सामाजिक सौहार्द निर्माण करण्यासाठी चित्रपट निर्मितीवर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक संदेश असलेला चित्रपट लोकप्रिय होणार नाही, हा गैरसमज आहे. सामाजिक संदेशही मनोरंजक पद्धतीने आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून मांडला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. चित्रपटातून भारतीयत्व समोर यावे, यावर भर द्यावा, असे आवाहन नायडू यांनी केले. सिनेमातील व्यक्तीरेखा, भारतीय संस्कृती, परंपरा, प्रादेशिक वैशिष्ट्ये, भाषा यांचे प्रतिनिधित्व करतील, अशारितीने बारकाईने रेखाटल्या जाव्या, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कार मिळालेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करत, नायडू यांनी 2020 हे वर्ष चित्रपट सृष्टीसाठी अधिक कलात्मक आणि सृजनशील ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय चित्रपट विशेषत: प्रादेशिक चित्रपटांनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे त्यांनी सांगितले. उत्तराखंड राज्याला चित्रपट स्नेही राज्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी विशेष अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, सचिव रवी मित्तल, यांच्यासह ज्युरी आणि पुरस्कार प्राप्त कलावंतांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1597234)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English