माहिती आणि प्रसारण मंत्रालय

संयुक्त चित्रपट निर्मितीमुळे भारत आणि रशियाचा आत्मा एकत्र येईल - रशियाचे राजदूत निकोलाय कुद्‌शेव्ह


भारतीयांमध्ये रशियन चित्रपटांबद्दल मोठी उत्सुकता - मारीया लमॅशेव्ह

Posted On: 21 NOV 2019 10:28PM by PIB Mumbai

गोवा, 21 नोव्हेंबर 2019

 

संयुक्त चित्रपट निर्मिती आणि चित्रपटांच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण यामुळे भारत आणि रशियाचा आत्मा जोडला जाईल, असे रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय कुद्‌शेव्ह यांनी सांगितले. रशियातल्या व्लादीवोस्टोक इथे सप्टेंबर 2019 मध्ये दोन्ही देशादरम्यानचे सांस्कृतिक संबंधांचा अधिक विस्तार करण्याबाबत संयुक्त करार करण्यात आला. या कराराचा फायदा घेऊन एकत्रित काम करुन संयुक्त लक्ष्य साध्य करण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी सांगितले. निकोलाय कुद्‌शेव्ह आज 50व्या इफ्फी चित्रपट महोत्सवादरम्यान पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.

समकालीन रशियन साहित्य पुरेशा प्रमाणात भारतात पोहोचत नाही, असे कुद्‌शेव्ह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ही दरी भरुन काढण्यासाठी 10 सर्वोत्तम रशियन पुस्तके हिंदीत आणि 10 सर्वोत्तम भारतीय पुस्तके रशियन भाषेत भाषांतरीत करण्याची सरकारची योजना आहे, असे ते म्हणाले. शिक्षण क्षेत्रातही अधिक सहकार्य आणि आदान-प्रदान वृद्धिंगत करण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षीय संबंधाना चालना देण्यासाठी रशिया कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले. रशियात एक भारतीय दूरचित्रवाणी चॅनेल कार्यरत असून, त्यावर भारतीय चित्रपट पाहता येतात असेही त्यांनी सांगितले.

सुवर्णमहोत्सवी इफ्फी मध्ये रशियाची भागिदार देश म्हणून निवड केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय आणि गोवा सरकारचे आभार मानले.

भारतीयांमध्ये रशियन चित्रपटांबद्दल मोठी उत्सुकता आहे, असे इफ्फी मधील रशियाच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख आणि किनोरिपोर्टरच्या संपादिका मारीया लामशेव्ह म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रशियातील चित्रपट इफ्फी मध्ये फोकस कंट्री सादरात दाखवण्यात येत आहेत. ॲबगेल सारख्या चित्रपटात तरुणाईचे स्वप्नरंजन दाखवण्यात आल्याच त्यांनी सांगितले.

सह-निर्मिती बाबत झालेल्या करारानुसार चित्रपटाच्या अर्थसंकल्पापैकी 40 टक्के रक्कम सांस्कृतिक मंत्रालयातर्फे परत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात सह-निर्मिती शक्य व्हावी, यासाठी चर्चा करण्यासाठी त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला.

‘कंट्री फोकस’ विभागात दाखवल्या जाणाऱ्या 8 चित्रपटांपैकी पुरस्कार प्राप्त ‘बिनपोल’ या चित्रपटातील नायिका व्हिक्टोरिया मिरशेनेचेन्को यांनी ‘बिनपोल’ चित्रपटात रशियाच्या इतिहासातील कठीण काळ दर्शवण्यात आल्याच सांगितले. लहानपणी टीव्हीवर रामायण पाहात होतो आणि त्यामुळे भारताच्या अध्यात्मिक पैलूशी जोडलो गेल्याच ‘ॲबगेल’ चित्रपटातील अभिनेता पीटर झेकाव्हिका म्हणाले. उद्‌घाटन समारंभात काही आवडल्या भारतीय नामकांना जवळून पाहता आल्याबद्दल त्यांनी महोत्सवाचे आभार मानले.

एकूण तिसऱ्या इफ्फी महोत्सवाला उपस्थित राहिलेल्या अभिनेत्री अनफिसा चेर्निख यांनी आपल्याला भारतीय चित्रपट आवडतात असे सांगितले. महोत्सवात आपला कोणताही चित्रपट दाखवला जात नसूनही शिष्टमंडळाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असल्याचे अनाफिसा म्हणाल्या.

‘ॲबगेल’ मधील अभिनेता ग्लीब बोकचेव्ह हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. भविष्यात भारतीय चित्रपटात काम करण्याची इच्छाही कलाकारांनी व्यक्त केली.

‘ॲबगेल’, ‘ॲसीड’, ‘आंद्रे नरकोव्होस्की : चित्रपट कलावंत’, ‘बिनपोल’, ‘ग्रेट पोएशी’, ‘वन्स इन टुब्रेकेव्ह’ ‘व्हाय डोंट यू जस्ट डाय! द हिरो’ आदी चित्रपट यंदाच्या ‘इफ्फी’ मधल्या फोकस विभागात दाखवण्यात येत आहेत.

 

G.Chippalkatti/J.Patankar/D.Rane



(Release ID: 1593079) Visitor Counter : 107


Read this release in: English