माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ऑस्कर रेट्रोस्पेक्टीव्ह

Posted On: 21 NOV 2019 10:57PM by PIB Mumbai

गोवा, 21 नोव्हेंबर 2019

 

गोव्यात सुरु असलेल्या इफ्फीमध्ये पहिल्या दिवशी ‘ऑस्कर रेट्रोस्पेक्टीव्ह’ अशा विशेष सत्राची ‘कासाब्लांका’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने सुरुवात झाली. या सत्रात ऑस्कर पुरस्काराने सन्मानित झालेले चित्रपट दाखवले जाणार आहेत.

इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद आणि ‘अमेरिकन फिल्म एडिटर’च्या संपादक कॅरोल लिटीलटन यांनी या सत्रात सहभाग घेतला. सत्राचे संचालन चित्रपट समीक्षक नमन रामचंद्रन यांनी केले.

इफ्फीमध्ये ऑस्कर चित्रपटांसाठी या विशेष विभागामागची प्रेरणा काय होती, असे विचारले असता चैतन्य प्रसाद यांनी सांगितले की, ‘आम्ही हे दर्जेदार चित्रपट बघत मोठे झालो. या उत्कृष्ट चित्रपटांचा मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा अनुभव घेणे ही एक पर्वणीच आहे. सर्व वयोगटातले रसिक प्रेक्षक या चित्रपटांचा आस्वाद घेत आहेत, यातच या विभागामागच्या प्रेरणेचे उत्तर आहे.’

कॅरोल लिटीलटन यांनी ऑस्कर्स पुरस्कारांमागच्या परीश्रमांची माहिती दिली. आम्ही या पुरस्कारांसाठी संपूर्ण वर्षभर काम करतो. विविध चर्चासत्र, कार्यशाळा घेतल्या जातात. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट अचूक व्हावा यासाठी मेहनत घेतली जाते. चित्रपट निर्मितीचे शास्त्र आम्ही जाणून घेतो. एक चित्रपट बनवण्यासाठी कलात्मक आणि शास्त्रीय असे दोन्हीही दृष्टीकोन सारखेच महत्वाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

जगभरातल्या कोणत्याही व्यक्तींना ॲकॅडमीचे सदस्य होता येते. त्यासाठी त्यांना दोन ॲकॅडमी सदस्यांचे शिफारस पत्र लागते. या ॲकॅडमीमध्ये संपूर्ण जगभरातल्या चित्रपट अभ्यासकांचा सहभाग वाढावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे त्या म्हणाल्या.

ऑस्कर रेट्रोस्पेक्टीव्ह गटात व्यापक विषयांवरच्या चित्रपटांची निवड केल्याबद्दल लिटीलटन यांनी प्रसाद यांचे अभिनंदन केले. या चित्रपट महोत्सवात रोमँटिक, विनोदी, संगीत प्रधान, अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. हे सोपे काम नाही, पण ही अचूक निवड केल्यामुळे आपण नक्कीच यशस्वी व्हाल असे त्या म्हणाले.

इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांचा हा विशेष विभाग ठेवण्यात आला आहे. यात दाखवल्या जाणाऱ्या सर्व चित्रपटांना केवळ उत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार मिळालेला नाही, तर इतर अनेक श्रेणींमध्ये मानांकनेही मिळालेली आहेत. त्यातील काही चित्रपटांची गणना सर्वकालिक सदबहार चित्रपटांमध्ये होते.

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

 



(Release ID: 1593066) Visitor Counter : 62


Read this release in: English