माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पटकथा, सिनेमॅटोग्राफी आणि प्रॉडक्शन डिझाईन हे उत्तम चित्रपट निर्मितीचे अतिशय महत्वाचे पैलू-प्रियदर्शन


नव्या चित्रपट निर्मात्यांना आपल्या कल्पनांचा अविष्कार घडविण्यासाठी इफ्फी म्हणजे उत्तम संधी-इंडियन पॅनोरमाचे ज्युरी सदस्य

Posted On: 21 NOV 2019 8:20PM by PIB Mumbai

गोवा, 21 नोव्हेंबर 2019

 

गोव्यात सुरू असलेल्या 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, इंडियन पॅनोरमाच्या फिचर फिल्म विभागाचे अध्यक्ष प्रियदर्शन नायर तसेच श्रीलेखा मुखर्जी, हरीश भिमाणी, विनोद गणात्रा, आरती श्रीवास्तव, रोनील हाओबाम हे ज्युरी सदस्य आणि नॉन फिचर फिल्म विभागाचे ज्युरी सदस्य यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

वास्तववादी चित्रपट निर्मात्यांच्या गुणवत्तेत मोठी घसरण ज्युरींना आढळल्याचे प्रियरंजन यांनी सांगितले. हे कठीण काम होते मात्र आम्हाला वाटते तितके ते कठीण नव्हते. 30 दिवसात 314 चित्रपट पाहणे हे मोठे काम आहे मात्र विविध राज्यांमधले वैविध्यपूर्ण चित्रपट पाहणे आनंददायी होते. उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांनी चांगले काम केले आहे. मात्र आशय चांगला असतो तेव्हा दर्जा घसरू शकतो असे आढळल्याचे ते म्हणाले. पटकथा, सिनेमॅटोग्राफी आणि प्रॉडक्शन डिझाईन हे उत्तम चित्रपट निर्मितीचे तीन महत्वाचे पैलू असल्याचे प्रियदर्शन यांनी नवनिर्मात्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. आपल्या काळात कॅमेऱ्यामागे राहणे कठीण काम होते मात्र आजच्या काळात प्रत्येकाच्या खिशात एक कॅमेरा असतो. प्रत्येकाच्या मनात एक चित्रपट असतो. प्रत्येक जण आपल्या मनात असलेले लोक चित्रपटात आणत आहे. मात्र अशा लोकांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे ते म्हणाले. युवापिढीकडे प्रतिभा आहे पण फिल्ड वर्कचा अभाव आहे. प्रशिक्षण आणि फिल्डवर्कमुळे त्यांना उत्तम चित्रपट निर्माण करण्यासाठी मदत होईल असे ते म्हणाले.

हा महोत्सव म्हणजे नव चित्रपटनिर्मात्यांसाठी आपल्या कल्पनांचा अविष्कार घडविण्यासाठी संधी असल्याचे ज्युरी सदस्यांनी सांगितले. देशाच्या दुर्गम भागासह सर्व क्षेत्रातल्या चित्रपट निर्मात्यांसाठी, मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे विनोद गणात्रा यांनी सांगितले. प्रत्येकाला राष्ट्रीय मंच मिळणे ही मोठी बाब आहे, आम्ही काही अद्वितीय चित्रपट पाहिल्याची भावना हरीश भिमाणी यांनी व्यक्त केली.

लघुपट आणि कथापट निर्मात्यांसाठी अधिक निधीची आवश्यकता आरती श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.

इफ्फी 2019 मध्ये संपूर्ण जगभरातले चित्रपट दाखवले जात असून इंडियन पॅनोरमामध्ये 26 समकालीन फिचर तर 15 नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येत आहेत.

दिग्दर्शक अभिषेक  शहा हे 15 गुजराती चित्रपटांचे कास्टींग डायरेक्टर आहेत. तसेच गेली 18 वर्ष ते नाट्यक्षेत्रात लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणूनही कार्यरत आहेत. इंडियन पॅनोरमाच्या नॉन फिचर विभागातल्या ‘नूरेह’ या उद्‌घाटनपर चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष पांडे यांनी आपल्या चित्रपटात अशांत भागात वाढणाऱ्या मुलांचे संघर्ष विरहित सुंदर जगाचे स्वप्न रेखाटले असल्याचे सांगितले. काश्मीर खोऱ्यात भारत-पाकिस्तान सीमेवरच्या छोट्या खेड्यात घडणारे हे कथानक आहे.

काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरच्या खेड्यात या चित्रपटाचे चित्रीकरण केले जिथे संघर्षाच्या वातावरणात शांततामय जगाचे स्वप्न बाळगत मुले वाढतात असे आशिष पांडे यांनी सांगितले. कलाकारात गावातल्या नागरिकांचा समावेश असून स्थानिक बोलीभाषेसह काश्मीरी आणि उर्दूमध्ये संवाद असल्याचे ते म्हणाले. नूर, सानिया आणि आफ्रिन यांचा कलाकारात समावेश आहे. सिनेमॅटोग्राफर सुशील गौतम या ‘मीट द प्रेस’ साठी उपस्थित होते.

ज्या जगात लोक राहतात त्याविषयी चित्रपटांनी त्यांना अधिक संवेदनशील बनवावं आणि मानवतेची जोपासना करावी असे मत आशिष पांडे यांनी व्यक्त केले.

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1593060) Visitor Counter : 73


Read this release in: English