पंतप्रधान कार्यालय
बँकॉकमधील भारतीयांपुढे पंतप्रधान मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
02 NOV 2019 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2019
मित्रांनो,
प्राचीन सुवर्णभूमी थायलँडमध्ये तुम्हा सर्वांमध्ये आल्यानंतर असं वाटतंय की, तुम्ही सर्वांनी या सुवर्णभूमीच्या रंगामध्ये स्वतःलाही रंगवून घेतलं आहे. हे वातावरण, ही वेशभूषा पाहिल्यानंतर चोहोबाजूंनी आपलेपणाची भावना जागृत होत आहे. तुम्ही मूळ भारतीय आहात, केवळ म्हणूनच नाही तर थायलँडच्या कणा-कणामध्ये आणि जना-जनामध्ये आपलेपणा ठळकपणे दिसून येतोय. इथं केल्या जाणाऱ्या संवादामध्ये, इथल्या भोजनाच्या पद्धतीमध्ये, इथल्या परंपरांमध्ये, आस्थेमध्ये, इथल्या स्थापत्य शास्त्रामध्ये कुठे ना कुठे भारतीयत्वाची झलक मला जरूर अनुभवायला मिळत आहे.
मित्रांनो,
संपूर्ण जगभरामध्ये आत्ता-आत्ताच दीपावली सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. इथं थायलँडमध्येही भारतातल्या पूर्वांचलामधून मोठ्या संख्येने लोक आले आहेत. आज पूर्व भारतामध्ये आणि आता तर जवळपास संपूर्ण हिंदुस्तानमध्ये सूर्यदेव आणि षष्ठीमातेची उपासना म्हणजे ‘छठ’चे महापर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जात आहे. भारतवासियांच्या बरोबरच मी थायलँडमध्ये वास्तव्य करीत असलेल्या आपल्या सर्व मित्रांनाही छठ पूजेनिमित्त खूप-खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
थायलँडची ही माझी पहिली अधिकृत भेट आहे. तीन वर्षांपूर्वी थायलँडच्या नरेशांचे निधन झाले होते, त्यावेळी शोक संतप्त भारताच्यावतीने मी इथं येवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. आणि आज थायलँडचे नूतन नरेशांच्या राज्यकाळामध्ये आपले मित्र प्रधानमंत्री प्रयुत चान ओ चा यांच्या निमंत्रणावरून मी भारत-आसियान शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी आज इथं आलो आहे. थायलँडचा संपूर्ण राजपरिवार, थायलँड साम्राज्याचे सरकार आणि थाई मित्रांना, मी भारताच्या 130 कोटी लोकांच्यावतीने शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
थायलँडच्या राज परिवाराचे भारताविषयी असलेले स्नेहबंध आपल्या घनिष्ठ आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहेत. राजकुमारी महाचकरी स्वतः संस्कृत भाषेच्या मोठ्या पंडिता आहेत. आणि त्यांना संस्कृतीमध्ये खूप चांगली रूचीही आहे. भारताविषयी त्यांना अतिशय आत्मीयता आहे. त्यांचे भारताशी दृढ ऋणानुबंध आहेत, तसेच भारताचा त्यांना व्यापक परिचयही आहे, ही आपल्यासाठी अतिशय सौभाग्याची गोष्ट आहे. त्यांना पद्मभूषण आणि संस्कृत सन्मान देवून भारताने त्यांच्याविषयी असलेला आदर आणि आभार व्यक्त केले आहेत.
मित्रांनो,
थायलँड आणि भारत या देशांच्या नात्यांमध्ये इतकी आत्मीयता कशी काय निर्माण झाली असेल, याचा कधी कुणी खोलवर जावून विचार केला आहे का? आमच्यामध्ये संबंध आणि संपर्क इतके खोलवर कसे काय गेले, या मागचे कारण काय असेल? हा एकमेकांमध्ये असलेला विश्वास, सगळ्यांनी मिळून-मिसळून एकत्रित राहणं, हा सद्भाव कुठून आला.... या सर्व प्रश्नांवर एक साधे उत्तर आहे...ते म्हणजे आमच्यामधले नातेसंबंध काही फक्त दोन सरकारांमध्ये आहेत असे नाही आणि कोणा एकाच सरकारला काही आम्ही आमच्यातल्या जवळिकतेच्या नातेसंबंधांबाबत काही सांगितलं आहे असं अजिबात नाही. अमूक वेळी असं झालं होतं, किंवा तमूक वेळी दोन्ही देशांमध्ये असं घडलं होतं, असंही कधी कुणी सांगितलेलं नाही. तर यामागची हकिकत आहे की, इतिहास प्रत्येक क्षणाने, इतिहासातल्या प्रत्येक तारखेने, इतिहासातल्या प्रत्येक घटनेने आमच्यामध्ये हे संबंध विकसित केले आहेत. ते अधिक व्यापक केले आहेत. या संबंधांना इतिहासाने खोली प्राप्त करून दिली आहे. तसेच नवीन उंचीवरही नेवून ठेवलं आहे. हे नातेसंबंध हृदयाने जोडले गेले आहेत. यामध्ये आत्म्याचा संबंध आहे. आस्थेचा आहे. आध्यात्म आहे. भारताचे नाव अगदी पौराणिक काळापासून जंबूव्दीपाबरोबर जोडले गेले आहे. थायलँड हा सुवर्णभूमीचा भाग होता. जंबूव्दीप आणि सुवर्णभूमी, भारत आणि थायलँड हे समीकरण हजारों वर्षांपासूनचे- प्राचीन आहे. भारताच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिमी किनारी प्रदेश हजारो वर्षेआधी आग्नेय अशियाबरोबर समुद्राच्या मार्गाने जोडले आहेत. आमच्या नाविकांनी त्यावेळी सागरी लाटांवरून हजारो मैलांचा प्रवास केला होता आणि त्यावेळी समृद्धी आणि संस्कृतीचे जे सेतू तयार केले ते आजही शाबूत आहेत. या रस्त्यांच्या माध्यमातून समुद्री व्यापार झाला, याच सागरी मार्गाने लोक आले-गेले आणि याच मार्गांनी आमच्या पूर्वजांनी धर्म आणि तत्वज्ञान, ज्ञान आणि विज्ञान, भाषा, साहित्य, कला आणि संगीत तसेच आपली जीवनशैली यांचे परस्परांमध्ये देवाण-घेवाण केले.
बंधू आणि भगिनींनो, मी नेहमीच म्हणत असतो की, भगवान रामाची मर्यादा आणि भगवान बुद्धाची करूणा, यांचा वारसा आमच्याकडे आहे. करोडो भारतीयांच्या जीवनामध्ये रामायण प्रेरणास्थान आहे. तशीच दिव्यता थायलँडमध्ये रामाकियनची आहे. भारताची अयोध्या नगरी आहे, थायलँडमध्ये ती आयुथ्या होते. ज्या नारायणाने अयोध्येमध्ये अवतार घेतला त्या नारायणाचे पावन-पवित्र वाहन असलेल्या ‘गरूडा’विषयी थायलँडमध्ये अपार श्रद्धा आहे.
मित्रांनो,
आम्ही भाषेनेच नाही तर भावनेच्या स्तरावरूनही एकमेकांच्या खूप जवळचे संबंधित आहोत. इतके जवळचे आहोत की, काही काही वेळेस तर त्याचा आभासही होत नाही. जसं आपण मला म्हणाला ‘स्वास्दी मोदी....’ या स्वास्दी का संबंध संस्कृतमधला शब्द ‘स्वस्ति’ बरोबर आहे. याचा अर्थ आहे की- सु अधिक अस्ति, म्हणाजे कल्याण! म्हणजे आपले कल्याण व्हावे. हे अभिवादन आहे, अशा चांगल्या भावना व्यक्त करणे असो, आस्था असो, आपल्याला प्रत्येक वेळी दोन्ही संस्कृतीमध्ये खोलवर रूजलेल्या समानेतेच्या खुणा दिसून येतात.
मित्रांनो,
गेल्या पाच वर्षांमध्ये मला दुनियाभरातल्या अनेक देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि प्रत्येक ठिकाणी भारतीय समुदायाला भेटण्याची संधी मिळाली. त्यांचे दर्शन घेणे, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करणे यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीत असतो. आणि आजही आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी इथे आला आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. परंतु ज्यावेळी अशा भेटी झाल्या आहेत, त्यावेळी मी पाहिलं आहे की, भारतीय समुदायामध्ये भारत आणि त्यांच्या यजमान देशाची सभ्यता यांचा एक अद्भूत संगम दृष्टीस पडतो. मला मोठा गर्व वाटतो की, आपण सर्वजण जिथं कुठं वास्तव्य करता आहात, तिथंही तुमच्या रूपानं भारत वास्तव्य करीत असतो. आपल्या आतमध्ये भारताची संस्कृती आणि सभ्यता यांची मूल्ये जीवंत असतात. त्याचा मला खूप आनंद होत असतो. विशेष म्हणजे ज्यावेळी त्या देशांचे नेते, तसेच उद्योग क्षेत्रातले नेते भारतीय समुदायाकडे असलेली प्रतिभा, भारतीयांची परिश्रम करण्याची तयारी आणि त्यांच्या शिस्तप्रियतेचे कौतुक करतात त्यावेळी माझ्या मनात गर्वाची, अभिमानाची भावना येते. भारतीयांची बाहेर होत असलेली प्रशंसा माझ्यासाठी गर्वाची गोष्ट असते. तुम्ही लोक ज्यापद्धतीने सर्वांशी मिळून-मिसळून राहता, त्याचं त्यांना खूप कौतुक आहे, हे सगळीकडे दिसून येतं. संपूर्ण विश्वामध्ये भारतीय समुदायाची ही प्रतिमा प्रत्येक हिंदुस्तानीसाठी, संपूर्ण भारतासाठी अतिशय गर्वाची बाब आहे. आणि म्हणूनच विश्वभरामध्ये विखुरलेले तुम्ही सर्व भारतीय बंधू अभिनंदनास पात्र आहात.
मित्रांनो,
संपूर्ण विश्वामध्ये जिथं कुठं भारतीय आहेत, ते सर्वजण भारताच्या सातत्याने संपर्कात असतात, याचाही मला खूप आनंद होतो. काही लोक तर भारताविषयीच्या बातम्यांकडे नियमित लक्ष ठेवून असतात. विशेष करून भारताची प्रगती, तिथं गेल्या पाच वर्षात नेमकं काय होत आहे, याच्याविषयी सर्व माहिती बाहेरच्या अनेक लोकांना असते. गेल्या पाच वर्षात देशात झालेल्या कार्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये माझ्या देशवासियांची मान चांगलीच उंचावली आहे. त्यांची छाती गर्वाने फुलून गेली आहे. त्यांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढत आहे आणि हीच खरी आपल्या देशाची ताकद असते.
मित्रांनो,
आपल्या मित्रांना तुम्ही गर्वाने सांगू शकता की- पहा मी मूळचा भारतीय आहे. आणि माझा भारत किती वेगाने प्रगती करतो आहे. आणि ज्यावेळी कोणीही भारतीय दुनियेमध्ये असे आपल्या देशाविषयी बोलतो, त्यावेळी तिथले लोक त्याचं बोलणं अगदी कान लावून ऐकत असतात. तुम्हां लोकांनाही असा अनुभव थायलँडमध्ये नक्कीच आला असेल. याचे कारण म्हणजे 130 कोटी भारतीय आज नवीन भारताच्या निर्माणाच्या कामाला लागले आहेत. आपल्यापैकी अनेक सहकारी लोक जर पाच-सात वर्षांपूर्वी भारतामध्ये येवून गेले असतील, आणि आता पुन्हा भारताला भेट देतील तर त्यांना तिथ घडून आलेल्या सार्थक परिवर्तनाचा स्पष्ट अनुभव नक्कीच येईल. आज जे परिवर्तन भारतामध्ये घडून आले आहे, त्यामागे कारण असे आहे की, देशातल्या लोकांनी पुन्हा एकदा... पुन्हा एकदा या सेवकाला लोकसभा निवडणुकीव्दारे आशीर्वाद दिला आहे. विशेष म्हणजे यावेळी गेल्या लोकसभेपेक्षा जास्त मोठा आशीर्वाद या निवडणुकीत दिला आहे.
मित्रांनो,
भारत हा संपूर्ण विश्वातला सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. ही पूर्ण दुनियेतील सर्वात मोठी लोकशाही आहे, हे सर्व दुनियेलाही माहिती आहे. परंतु लोकशाहीमध्ये महाकुंभ म्हणजे निवडणुका असतात... सर्वात मोठ्या निवडणुका कशा असतात, ही गोष्ट खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी त्या निवडणुका आपल्या डोळ्यांनी पाहिल्या पाहिजेत. तुम्हा लोकांना कदाचित माहितीही असेल की, यावर्षी झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीमध्ये इतिहासात सर्वात जास्त म्हणजे 60 कोटी मतदारांनी मतदान केले. ही जगातल्या लोकशाहीच्या इतिहासातली सर्वात मोठी घटना आहे. आणि प्रत्येक भारतीयाला या गोष्टीचा गर्व वाटला पाहिजे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला मतदारांची संख्या म्हणजे मतदान करणाऱ्या महिलांची संख्या ही पुरूष मतदारांपेक्षा कमी नव्हती तर त्यांच्या इतकीच होती. इतकंच नाही तर यावेळी पहिल्यापेक्षा कितीतरी जास्त संख्येने महिला खासदार निवडून आल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने खासदार पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. भारतातली निवडणूक आणि मतदान, मतदार याविषयी काही गोष्टी जाणून तुम्हाला खूप नवल वाटणार आहे. लोकशाहीविषयी आम्ही इतके समर्पित आहोत की, गुजरातमध्ये गीर सोमनाथ जिल्ह्यामध्ये गीरच्या जंगलामध्ये एक मतदार राहतो. हा भाग जंगलात अगदी उंच डोंगरावर आहे. त्या एका मतदाराला आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जंगलामध्ये वेगळे मतदान केंद्र बनवण्यात येते. हे आमच्या लोकशाहीचे एक महत्वाचे उदाहरण म्हणता येणार आहे.
बंधू आणि भगिनींनो, भारताविषयी आणखी एक बातमीही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल. भारतामध्ये गेल्या सहा दशकांमध्ये म्हणजे 60 वर्षांनी कोणत्याही एका सरकारने पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर पुन्हा त्याच पक्षाला पहिल्यापेक्षा आणखी जास्त मतांनी जनादेश दिला आहे. 60 वर्षात असे पहिल्यांदाच घडले आहे. आणि त्याचे कारण आहे की, गेल्या पाच वर्षात भारताने केलेली प्रगती.... परंतु याचा आणखी एक अर्थ असाही आहे की, भारताच्या लोकांच्या अपेक्षा आणि आशा आता जास्त वाढल्या आहेत. जे लोक काम करत असतात, त्यांनाच लोक काम सांगत असतात. जे लोक काम करीत नाहीत, त्यांचे दिवस गणले जातात, काम न करणाऱ्याचे दिवस कधी संपतील, याची गणना लोक करतात. तर जे लोक काम करतात, त्यांच्याकडून आणखी काम करवून घेण्यासाठी काम देतात. आणि म्हणूनच मित्रांनो, आता आम्ही काही लक्ष्य निश्चित करून कामाला लागलो आहोत. कधी काळी हे लक्ष्य सर्वांना अशक्य कोटीतले वाटत होते, ती अशक्य वाटणारी कामे आम्ही आता करायला घेतली आहेत. भारतामध्ये जी कामे होतील, असे कोणालाच वाटत नव्हते, ती कामे आम्ही करीत आहोत. तुम्हा सर्वांना एक गोष्ट चांगली परिचित आहे. दहशतवाद आणि फुटिरता यांचे बीज रोवले जाणारे एक मोठे कारण आम्ही या देशातून कायमचे संपुष्टात आणले आहे. हे बीज फोफावू नये म्हणून त्यातून आम्ही देशाला कायमचे मुक्त करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला माहिती आहे ना... माहिती आहे.... आम्ही काय केलं ते तुम्ही जाणून आहात... थायलँडमध्ये वास्तव्य करीत असलेल्या प्रत्येक हिंदुस्तानीला ही गोष्ट माहिती असणार आहे....ज्यावेळी निर्णय योग्य असतो, चांगली इच्छाशक्ती असते...त्यावेळी त्याचा आवाज संपूर्ण दुनियेमध्ये ऐकू जात असतो आणि आज थायलँडमध्येही हाच आवाज ऐकू येतोय.
धन्यवाद, धन्यवाद!! आपण असे उभे राहून केलेले अभिवादन भारतासाठी आहे. भारताच्या संसदेसाठी आहे. भारताच्या संसदेच्या संसद सदस्यांसाठी आहे. तुम्हां सर्वांचे हे प्रेम, तुमचा हा उत्साह, तुमचे असलेले हे समर्थन हिंदुस्तानच्या प्रत्येक संसद सदस्याला खूप मोठी ताकद देणारे आहे. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे... थँक यू!!
मित्रांनो,
अलिकडेच गांधीजींची 150 वी जयंती साजरी झाली. यादिवशी भारताने स्वतःला उघड्यावरच्या शौचातूनमुक्त झाल्याचे घोषित केले आहे. इतकंच नाही तर आज भारतातल्या गरीबातल्या गरीबाचे स्वयंपाकघर धुरापासून मुक्त झाले आहे. आम्ही 3 वर्षांपेक्षांही कमी कालावधीमध्ये 8 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले आहे. 8 कोटी ही संख्या थायलँडच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. दुनियेतील सर्वात मोठी आरोग्य सुविधा योजना कार्यान्वित केली आहे. या ‘आयुष्यमान भारत’मध्ये आज जवळपास 50 कोटी भारतीयांसाठी 5 लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचाराची सुविधा आहे. मोफत औषधापचारासाठी आरोग्य विमा देण्यात येत आहे. अगदी अलिकडेच ही योजना सुरू होवून एक वर्ष झालं आहे. या वर्षभरामध्ये जवळपास 60 लाख लोकांना या योजनेतून मोफत औषधोपचार मिळाले आहेत. याचा अर्थ असा झाला की, आगामी दोन-तीन महिन्यांमध्ये ही संख्यास बँकॉकच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त होईल.
मित्रांनो,
गेल्या 5 वर्षांमध्ये आम्ही प्रत्येक भारतीयाला बँक खात्याने जोडले आहे. वीजेचे कनेक्शन देवून जोडले आहे. आता एक मोहीम हाती घेवून आम्ही पुढे वाटचाल करीत आहोत. प्रत्येक घरामध्ये पुरेसे पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही काम सुरू केले आहे. 2022 मध्ये ज्यावेळी हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतील, तोपर्यंत प्रत्येक गरीबाकडे आपल्या मालकीचे पक्के घर मिळावे, यासाठी आम्ही सर्व शक्ती पणाला लावून काम करीत आहोत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. मला विश्वास आहे की, भारताने हे जे काही साध्य केलं आहे, त्याविषयी तुम्हाला ज्यावेळी ऐकायला मिळते, त्यावेळी तुम्हाला भारताविषयी गर्व, अभिमान वाटत असणार, तसेच भारताविषयी तुमच्या मनात अभिमानाची भावना दिवसेंदिवस वाढत असणार, असा मला विश्वास आहे.
मित्रांनो,
ज्यावेळी मी व्यासपीठावर आलो, त्यानंतर लगेचच थोड्या वेळात भारताचे दोन महान सुपुत्र, दोन महान संतांशी जोडलेल्या स्मारक चिन्हांचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. मला चांगलं आठवतंय की, 3-4 वर्षांपूर्वी संत थिरूवल्लुवर यांच्या महान कृतीचा- थिरूक्कुरलचा गुजराती अनुवाद प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली होती. आणि यावेळी थिरूक्कुरलचे थाई भाषेत अनुवाद प्रकाशित करण्यात येत आहे. मला विश्वास आहे की, या भू-भागात वास्तव्य करणाऱ्या लोकांना याचा खूप लाभ होईल. कारण हा काही फक्त एक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्यासाठी एक मार्गदर्शक दीप आहे. जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ग्रंथामध्ये ज्या मूल्यांचा समावेश करण्यात आला आहे, ती मूल्ये आजही आमच्यासाठी अमूल्य सांस्कृतिक वारसा आहेत. उदाहरणार्थ संत थिरूवल्लूवर सांगतात की -
ताडात्रि दंड पोरूडेल्ल
इक्करक्क वेल्डामि सइदर पुरूट्ट !!
याचा अर्थ आहे, व्यक्ती परिश्रमाने जे काही धन कमावतो, त्याला दुस-यांचे चांगले आशीर्वाद मिळतात. भारत आणि भारतीयांच्या जीवनामध्ये आजही असे आदर्श प्रेरणा देतात.
मित्रांनो,
आज गुरू नानकदेव जी यांच्या 550 व्या प्रकाशोत्सवानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नाणी जारी करण्यात आली आहेत. आणि मला असं सांगण्यात आलं आहे की, इथं बँकॉकमध्ये पन्नास वर्षांपूर्वी गुरूनानक देव जी यांचा पाचशेव्वा प्रकाशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात, उत्साहात साजरा करण्यात आला होता. मला खात्री आहे की, यंदा गुरूनानक देवजींचा 550वा प्रकाशोत्सवही अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाईल. इथल्या शिख समुदायाने फित्सानुलोक - या विष्णुलोकामध्ये जो गुरूनानक देवजी बगिचा बनवला आहे, तो एक कौतुकास्पद प्रयत्न आहे.
बंधू आणि भगिनींनो, या पवित्र पर्वाच्यानिमित्ताने भारत सरकार गेल्या एक वर्षापासून बँकॉकसहित संपूर्ण विश्वामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. गुरूनानक देवजी काही फक्त भारताचे, शिख पंथाचेच नव्हते तर त्यांचे विचार संपूर्ण दुनियेसाठी, संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी वारसा आहेत. आणि आम्हा भारतीयांची तर ही विशेष जबाबदारी आहे की, आपण आपल्या या अमूल्य वारशाचा लाभ संपूर्ण दुनियेला दिला पाहिजे. आमचा प्रयत्न आहे की, संपूर्ण दुनियाभरातल्या शिख पंथाशी जोडले गेलेल्या मित्रांना, आपल्या आस्थेच्या केंद्राशी जोडले जाण्याची संधी सहजपणाने मिळावी.
मित्रांनो,
आपल्या सर्वांना आणखी गोष्ट नक्कीच माहिती असेल, काही दिवसांनी कर्तारपूर साहिबला जाण्यासाठी थेट व्यवस्था सुनिश्चित करण्यात येणार आहे. दि. 9 नोव्हेंबरला करतारपूर कॉरिडॉर मुक्त केल्यानंतर भारतातून श्रद्धावानांना थेट कर्तारपूर साहिबच्या दर्शनासाठी जाता येणार आहे. आपल्याला मी आग्रह करतो की, आपण सर्वांनी मोठ्या संख्येने अगदी सपरिवार भारतामध्ये यावे आणि गुरूनानक देवजींच्या वारशाचा स्वतः अनुभव घ्यावा.
मित्रांनो,
भारतामध्ये भगवान बुद्ध यांच्याशी जोडलेल्या तीर्थ स्थानांचे आकर्षण अधिक वाढावे यासाठी आमचे सरकार निरंतर प्रयत्न करीत आहे. लड्डाखपासून ते बोधगया, सारनाथ ते सांचीपर्यंत जिथं-जिथं भगवान बुद्धाची स्थाने आहेत, त्यांच्यामध्ये सहज संपर्क व्यवस्था निर्माण करण्यासाठी अभूतपूर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा स्थानांना बुद्ध शक्तीच्या रूपाने विकसित करण्यात येत आहेत. तिथं आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मला विश्वास आहे की, ज्यावेळी आपण सर्वजण थायलँडमधल्या आपल्या मित्रांसह या स्थानांना भेट द्याल, त्यावेळी एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळेल.
मित्रांनो,
आमच्या प्राचीन व्यापारी संबंधांमध्ये वस्त्रोद्योगाची महत्वाची भूमिका आहे. आता पर्यटन या साखळीला अधिक मजबूत करीत आहे. थायलँडसहित या पूर्व अशियाई क्षेत्रातल्या शेजारी मित्र देशांसाठी भारत आता आकर्षक केंद्र बनत आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात भारताने प्रवास आणि पर्यटनाच्या वैश्विक क्रमवारीमध्ये 18 अंकांची सुधारणा घडवून आणली आहे. आगामी काळामध्ये पर्यटनामुळे हे संबंध अधिक मजबूत होणार आहेत. आम्ही आमच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वैद्यकीय पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा अधिक चांगल्या केल्या आहेत. इतकंच नाही तर पर्यटनासाठी संपर्क व्यवस्था अधिक चांगली निर्माण व्हावी यासाठी पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी खूप काम केले आहे.
मित्रांनो,
आसियान भारत आणि त्यासंबंधित जोडलेल्या मुद्यांसाठी मी इथं आलो आहे, हे तर मी आधीच स्पष्ट केलं आहे. वास्तविक आसियान देशांबरोबर आपल्या संबंधांना चांगले प्रोत्साहन देणे आमच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. म्हणून यासाठी आम्ही ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’ला विशेष महत्व दिले आहे. गेल्या वर्षी भारत-आसियान संवाद सहभागीतेचा रौप्यमहोत्सवी वर्ष होतं. त्यानिमित्त पहिल्यांदाच सर्व दहा आसियान देशांचे प्रमुख नेते एकत्रितपणे भारतात आले होते. त्यावेळी भारतामध्ये ‘कॉमेमोरेटिव्ह समिट’ झाले. त्यावेळी सर्वांनी 26 जानेवारी रोजी आमच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभाग नोंदवून आमचा सन्मान वाढवला.
बंधू आणि भगिनींनो, हा केवळ राजकीय दुतावासाचा कार्यक्रम नव्हता. आसियानबरोबर भारताच्या भागिदारीच्या संस्कृतीची एक छटा होती. प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या पथसंचलनामुळे आसियानविषयी भारताला असलेली भावना भारताच्या कानाकोपऱ्यात जावून पोहोचली.
मित्रांनो,
प्रत्यक्ष पायाभूत सुविधा असो अथवा डिजिटल सुविधा असो, आज भारतामध्ये जागतिक दर्जांचा सुविधांचा विस्तार आम्ही थायलँड आणि इतर आसियान देशांना जोडण्यासाठीही करीत आहोत. आकाश असो अथवा सागरी मार्ग किंवा रस्ते संपर्क मार्ग, भारत आणि थायलँड अतिशय वेगाने पुढे जात आहेत. आज दर आठवड्याला जवळपास 300 विमाने दोन्ही देशांमध्ये जात-येत आहेत. भारतातल्या 18 स्थानांवरून आज थेट थायलँडला जाता येते. आज स्थिती अशी आहे की, दोन्ही देशांमध्ये कोणत्याही स्थानांपासून सरासरी दर दोन ते चार तासांत प्रवासासाठी विमानसेवा उपलब्ध आहे. म्हणजेच आपण जणू भारतातल्याच दोन शहरांमध्ये प्रवास करीत आहोत, इतक्या मोठ्या प्रमाणावर हवाई सेवा उपलब्ध आहे. माझा जो लोकसभा मतदारसंघ आहे, तो जगातला सर्वात प्राचीन नगरांपैकी एक आहे. त्या काशी-बनारसवरून थेट बँकॉकला विमानसेवा या वर्षी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही हवाईसेवा खूप लोकप्रिय झाली आहे. यामुळे आमच्या प्राचीन संस्कृतीमध्ये चांगले आणि मजबूत धागे निर्माण होत आहेत. इतकंच नाही तर, खूप मोठ्या संख्येने लोकांना बुद्धिस्ट पर्यटनाची सुविधा झाली आहे. अनेकांना सारनाथला जाण्याची इच्छा असते. ते लोक काशीला येतात आणि सारनाथला जातात. आमचा भर भारताच्या ईशान्य भागाला थायलँडशी जोडण्याचा आहे. ईशान्य भारताला आम्ही दक्षिण-पूर्व अशियाचा ‘गेट वे’ म्हणून विकसित करीत आहोत. भारताचा हा भाग आमच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि थायलँडच्या अॅक्ट वेस्ट पॉलिसी या दोन्हीला ताकद प्रदान करणार आहे. या फेब्रुवारीमध्ये बँकॉकमध्ये भारताच्या बाहेर पहिल्यांदाच ईशान्य भारत महोत्सव साजरा करण्यात आला. यामागेही हिच कल्पना होती. मला सांगण्यात आलं की, आता ईशान्य भारताविषयी थायलँडमध्ये खूप मोठी जिज्ञासा निर्माण झाली आहे. तसेच ईशान्य भारताविषयी माहितीही सर्वांना खूप मिळत आहे, मिळाली आहे. आणखी एकदा भारत-म्यानमार- थायलँड असा महामार्ग म्हणजे त्रिपक्षीय महामार्ग सुरू झाला तर ईशान्य भारत आणि थायलँड यांच्यामध्ये अगदी विनाअडथळा संपर्क व्यवस्था नक्कीच होवू शकणार आहे. यामुळे या संपूर्ण क्षेत्रामध्येही व्यापार वाढेल, पर्यटन वाढेल आणि परंपरांना एक नवीन ताकद मिळेल.
बंधू आणि भगिनींनो, मला या गोष्टीचा आनंद आहे की, आपण सर्वजण थायलँडची अर्थव्यवस्था सशक्त करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहात. आपण थायलँड आणि भारत यांच्यामध्ये मजबूत व्यापारी आणि सांस्कृतिक नातेसंबंध दृढ करण्यासाठी महत्वाचा दुवा आहात. आज भारत दुनियेमध्ये सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे. भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने विकसित होत आहे. आगामी पाच वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्यासाठी आम्ही सर्व शक्ती पणाला लावत आहोत. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे आपल्या सर्वांचीही यामध्ये महत्वपूर्ण योगदान आणि भूमिका असणार आहे.
मित्रांनो,
आज आम्ही भारतामध्ये बुद्धीमत्ता, हुशारीला, नवसंकल्पना, संशोधनाची मानसिकता यांना प्रोत्साहन देत आहोत. माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानामध्ये भारतामध्ये जे काम सुरू आहे, त्याचा लाभ थायलँडलाही मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अंतराळ तंत्रज्ञान असो जैवतंत्रज्ञान असो औषध निर्मिती असो, भारत आणि थायलँड यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले जात आहे. अलिकडेच आमच्या सरकारने भारत आणि आसियान देशांमध्ये संशोधन आणि विकास या क्षेत्रामध्ये एक मोठा निर्णय घेतला आहे. आसियान देशांमधल्या एक हजार युवकांना आयआयटीमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलोशिप देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आपल्या थाई मित्रांना, इथल्या विद्यार्थ्यांना माझा आग्रह आहे की, त्यांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा. आणि आपण सर्वांनीही याविषयी त्यांना जरूर माहिती द्यावी.
मित्रांनो,
जगभरात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांसाठी सरकार प्रत्येकवेळी उपलब्ध असावे, असा प्रयत्न गेल्या 5 वर्षांमध्ये आम्ही सातत्याने करत आलो आहेत. जगात कुठेही असणाऱ्या भारतीयाशी जोडले जाण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आणि त्यासाठी ओसीआय योजना आता अधिक लवचिक बनवण्यात आली आहे. आम्ही अलिकडेच जो निर्णय घेतला, त्यानुसार ओसीआय कार्डधारकांनाही ‘न्यू पेन्शन स्कीम’मध्ये नावनोंदणी करता येणार आहे. आमचे दुतावास आपले काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी आता अधिक तत्परतेने काम करणार आहेत. आपल्यासाठी ते 24 तास उपलब्ध असतील. दुतावासातील सेवा आणि तत्परता कायम चांगली रहावी, यासाठी आम्ही निरंतर काम करीत आहोत.
मित्रांनो,
आज भारताची संपूर्ण दुनियेत पत वाढली आहे. त्यामागे आपल्यासारख्या लोकांची भूमिका महत्वाची आहे. ही भूमिका आता आपल्याला अधिक सशक्त करायची आहे. आणि मला विश्वास आहे की, तुम्ही लोक जिथं कुठंही असाल, तुमच्याकडे जी काही साधने असतील, तुमच्याकडे जे काही सामर्थ्य असेल, त्याच्या सहायाने तुम्ही माता भारतीची सेवा करण्यासाठी संधी शोधत राहणार आहे. अशी संधी मिळताच सर्व शक्तीनिशी तुम्ही माता भारतीची सेवा करणार आहात. या विश्वासाने पुन्हा एकदा आपण सर्वांनी इतक्या मोठ्या संख्येने इथं येवून मला आशीर्वाद दिले, त्याबद्दल अगदी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.
खूप-खूप शुभेच्छा ! धन्यवाद!! .....
खोब खुन क्रुब!!
G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane
(Release ID: 1591989)