पंतप्रधान कार्यालय

संसदेत सर्व मुद्यांवर खुलेपणाने चर्चा करण्याची सरकारची तयारी – पंतप्रधान


हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माध्यमांशी साधला संवाद

चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे सर्व खासदारांना आवाहन

Posted On: 18 NOV 2019 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2019

 

राज्यसभेचे 250वे अधिवेशन आणि भारतीय राज्यघटनेचे 70वे वर्ष यामुळे संसदेचे चालू अधिवेशन अत्यंत महत्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

भारताला प्रगतिपथावर ठेवण्यात राज्यसभा बजावत असलेल्या महत्वाच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.

मित्रांनो, वर्ष 2019 मधले संसदेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. भारताच्या विकासात आणि प्रगतीत राज्यसभेने महत्वाची भूमिका बजावली असून, राज्यसभेचे हे 250 वे अधिवेशन असल्यामुळे हे अधिवेशन महत्वाचे आहे.

26 नोव्हेंबर रोजी भारत 70वा संविधान दिवस साजरा करणार आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. या घटनेला यंदा 70 वर्ष पूर्ण होत आहेत.

भारताचे वैविध्य, एकता आणि अखंडता शिरोधार्थ मानणारी राज्यघटनेची तत्वप्रणाली वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

26 नोव्हेंबरला आपण 70वा संविधान दिवस साजरा करत आहोत. राज्यघटना स्वीकृतीला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. देशाची एकता, देशाची अखंडता, भारताचे वैविध्य राज्यघटना शिरोधार्थ मानते. भारताचे सौंदर्य राज्यघटनेच्या अंगीभूत आहे आणि देशासाठी ती प्रेरक शक्ती आहे. संसदेचे हे अधिवेशन, राज्यघटनेच्या 70 वर्षांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणारा स्रोत ठरो.

आधीच्या अधिवेशनाप्रमाणे या अधिवेशनातल्या विविध चर्चांमध्येही सक्रिय आणि सकारात्मक सहभाग घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सर्व खासदारांना केले. चर्चांमधून सर्वोत्तम सार मिळण्यास देशाला साहाय्य मिळेल आणि देशाचे कल्याण व प्रगतीसाठी ते उपयुक्त ठरु शकेल.

गेल्या काही दिवसात जवळपास सर्वच पक्षांच्या विविध नेत्यांना भेटण्याची संधी आम्हाला मिळाली. या आधीचे अधिवेशन नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच झाले होते. आधीच्या अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशन सर्व खासदारांच्या सक्रिय आणि सकारात्मक सहभागाचे झाले पाहिजे. गेल्या वेळचे अधिवेशन अत्यंत सफल ठरले होते. हे यश सरकारचे किंवा मंत्रिवर्गाचे नसून संपूर्ण संसदेचे आहेत; सर्व सदस्य या यशाचे हक्कदार असल्याचे मला सार्वजनिकरित्या मान्य करावे लागले होते. सर्व खासदारांच्या सक्रिय सहभागाबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि आगामी अधिवेशनही देशाच्या प्रगतीसाठी कार्यकुशलतेचे ठरेल, अशी आशा व्यक्त करतो.

सर्व मुद्यांवर आम्हाला चर्चा हवी आहे. मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगली चर्चा होणे आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षांच्या देशाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी उपयोग होणे, अत्यंत गरजेचे आहे. सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देतो.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane



(Release ID: 1591954) Visitor Counter : 120


Read this release in: English