पंतप्रधान कार्यालय

आदित्य बिर्ला ग्रुपच्या थायलंड येथील सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधानांची उपस्थिती


भारतात येण्याचा हा सर्वोत्तम काळ :पंतप्रधान

थायलंड 4.0 भारताच्या प्राधान्यक्रमांना पूरक-भागीदारीच्या महत्वपूर्ण संधी उपलब्ध-पंतप्रधान

व्यापार आणि संस्कृती जगाला जोडणारी शक्ती: पंतप्रधान

Posted On: 03 NOV 2019 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2019

थायलंडमधल्या आदित्य बिर्ला ग्रुपच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.

यावेळी पंतप्रधानानी उपस्थित असलेले सरकारी अधिकारी आणि उद्योजकांसमोर भाषण केले. आदित्य बिर्ला ग्रुपने उद्योगक्षेत्रात केलेल्या कामामुळे अनेकांच्या आयुष्यात समृद्धी आणि रोजगाराच्या संधी आल्या आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी या उद्योगसमूहाचे कौतुक केले. भारत आणि थायलंड यांच्यात दृढ सांस्कृतिक संबंध आहे असे सांगत, व्यापार आणि संस्कृती यांच्यात संपूर्ण जगाला एकत्र  आणण्याची क्षमता असते, असेही पंतप्रधान म्हणाले.   

भारतातील परिवर्तनशील बदल:

भारत सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या सर्व कामांची माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली.वेगळ्या पद्धतीने काम करुन मिशन मोड वर प्रकल्प राबवल्यामुळेच भारतात आमूलाग्र परिवर्तन शक्य होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आधी ज्या गोष्टी भारतात अशक्य समजल्या जात असत ती कामे आता प्रत्यक्षात होत आहेत त्यामुळे आज भारतात गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम काळ आहे, असे मोदी म्हणाले.  

गेल्या पाच वर्षात भारताने 'इज ऑफ डुईंग बिझनेस' च्या जागतिक क्रमवारीत 79 स्थानांची झेप घेतली आहे. 2014 साली 142 व्या स्थानावर असलेला भारत आज 2019 मध्ये 63 व्या स्थानावर आहे. यातूनच भारतात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याविषयी भारताची कटिबद्धता स्पष्ट होते, असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक आर्थिक मंचाच्या प्रवास आणि पर्यटनाच्या क्रमवारीतही भारताचे स्थान गेल्या काही वर्षात 65 वरून 34 व्या क्रमांकावर पोचले आहे. उत्तम रस्ते, दळणवळणाच्या सुविधा, स्वच्छता आणि चांगली कायदा आणि सुव्यवस्था यांच्या मदतीने परदेशी पर्यटकांना अधिकाधिक सुविधा, आराम आणि सुरक्षितता देण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे, त्यामुळे भारतात परदेशी पर्यटकांची संख्या 50 टक्क्यांनी वाढली आहे.

पैशांची बचत म्हणजे पैसे कमावणे आणि ऊर्जा बचत म्हणजे ऊर्जा निर्मिती असं सांगत, पंतप्रधानांनी थेट हस्तांतरण योजनेतून झालेल्या बचतीचा उल्लेख केला. या योजनेमुळे सरकारी पैशाची 20 अब्ज डॉलर्सची बचत झाली आहे, असे ते म्हणाले. एलईडी दिव्यांच्या वाटपामुळे झालेल्या उर्जा बचतीची त्यांनी माहिती दिली.

भारत: गुंतवणूकीचे आकर्षण केंद्र

भारत हे गुंतवणूकीचे केंद्र असल्याचे सांगत करसुधारणेच्या क्षेत्रात सरकारने केलेल्या सुधारणांचा त्यांनी उल्लेख केला. जीएसटीमुळे आर्थिक एकात्मतेचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे, असे सांगत, जीएसटी कररचना अधिक सुलभ करण्यासाठी सरकार काम करत आहे, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. या सर्व पावलांमुळे भारत आज जगात गुंतवणूकीच्या आकर्षणाचे केंद्र बनले असून UNCTAD च्या क्रमवारीत थेट परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारत पहिल्या दहा देशांमध्ये आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

थायलंड 4.0 शी भारताचे धोरण पूरक

भारताला 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या स्वप्नाचा मोदी यांनी उल्लेख केला. 2014 साली 2 ट्रिलीयन डॉलर्स असलेली भारताची अर्थव्यवस्था 2019 मध्ये 3 ट्रिलीयन डॉलर्स पर्यत पोचली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

थायलंडची अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलत तिथे चौथी क्रांती घडवून आणण्याचे थायलंडचे उद्दिष्ट भारताच्या उद्दिष्टासाठी पूरकच आहे, असे ते म्हणाले. भारताच्या डिजिटल इंडिया, कुशल भारत, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटीज अशा प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला. दोन्ही देशांनी आपल्या भू-राजकीय जवळीकीचा, समान संस्कृतीचा आणि समान हितसंबंधांचा लाभ एकमेकांना द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

थायलंड येथील आदित्य बिर्ला ग्रुप

22 वर्षांपूर्वी जेव्हा भारतात पहिल्यांदा मुक्त अर्थव्यवस्था आणली गेली, तेव्हा आदित्य बिर्ला यांनी थायलंड येथे वस्त्रोद्योग सुरु केला. आज आदित्य बिर्ला ग्रुप थायलंडमधल्या आघाडीच्या उद्योगसमूहांपैकी एक आहे.

 

 

 

B.Gokhale/ R.Aghor/ D.Rane

 


(Release ID: 1590167) Visitor Counter : 96


Read this release in: English