पंतप्रधान कार्यालय
सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी गुजरातमध्ये केवडिया येथे ‘एकता दिन संचलन’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
31 OCT 2019 6:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2019
सरदार पटेल असं मी म्हणतो- आपण सर्वांनी सर्व शक्तिनिशी ‘अमर रहे, अमर रहे’ असं म्हणायचं आहे.
सरदार पटेल- अमर रहे, अमर रहे!
सरदार पटेल- अमर रहे, अमर रहे!
सरदार पटेल- अमर रहे, अमर रहे!
मित्रांनो, आत्ताच आपण सर्वांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार ऐकले. त्यांचा आवाज आपल्या कानांमध्ये गुंजतोय. त्यांच्या विचारांचे वर्तमान काळात असलेले महत्व, प्रत्येक क्षणाला देशाची एकता आणि अखंडता यासाठीच केलेला विचार- हे सर्व काही आज त्यांच्या एका-एका शब्दांमधून, त्यांच्या वाणीतून आपण अनुभवत आहोत. त्यांच्या वाणीमध्ये जी शक्ती होती, त्यांच्या विचारांमध्ये जी प्रेरणा होती, ती भावना प्रत्येक हिंदुस्तानीला जाणवू शकते. आणि आज आणखी एक विशेष म्हणजे, सरदार साहेबांचा आवाज आपण त्यांचीच उंच प्रतिमा असलेल्या ठिकाणावरून ऐकत होतो.
मित्रांनो, ज्याप्रमाणे एखाद्या श्रद्धास्थानी गेल्यानंतर आपल्याला असीमित शांतीचा अनुभव येतो, नवीन ऊर्जा मिळते, अगदी तसाच अनुभव मला इथं सरदार साहेबांच्या स्मारक स्थानी आला आहे. त्यांच्या या प्रचंड, उंच, भव्यदिव्य पुतळ्यामध्येही त्यांचे एक व्यक्तित्व आहे, सामर्थ्य सामर्थ्य आहे, संदेश आहे, त्यांच्या इतक्याच विशाल, त्यांच्या इतक्याच दूरदर्शी आणि पवित्र देशाच्या विविध काना कोप-यातल्या, शेतकरी बांधवांच्या एकत्रित केलेल्या लोखंडांन, देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या मातीने या भव्य पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. एक मजबूत आधारही अशा विविधतेतून बनला आहे. त्यामुळेच ही प्रतिमा म्हणजे आमच्या विविधतेमधल्या एकतेचे जीवंत प्रतीक आहे. हा एक जीता-जागता संदेश आहे.
मित्रांनो, बरोबर एक वर्षापूर्वी संपूर्ण दुनियेतल्या सर्वात उंच प्रतिमेला देशाला समर्पित करण्यात आलं होतं. आज ही प्रतिमा फक्त भारतवासियांनाच नाही तर संपूर्ण विश्वाला आकर्षित करत आहे. प्रेरणा देत आहे. आज या प्रेरणास्थानी सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धासुमन अर्पण करताना संपूर्ण राष्ट्राचा गौरव होत असल्याचा अनुभव मिळत आहे.
अगदी काही वेळापूर्वीच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी, एकतेचा मंत्र जगण्यासाठी, एकतेचा भाव आपल्या जीवनाचा हिस्सा बनावा यासाठी, एकता- आमचा संस्कार आहे, ही आमची संस्कार सरिता आहे, एकता- आमच्या भावी स्वप्नांना खूप मोठे बळ देणारी ताकद आहे, आणि या सर्व गोष्टी लक्षात घेवून ‘रन फॉर युनिटी’ - ‘राष्ट्रीय एकता दौड’ हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोप-यामध्ये काढण्यात आली. देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, देशातल्या नागरिकांनी, अबाल वृद्धांनी, सर्व स्त्री-पुरुषांनी या दौडीमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. आज इथंही राष्ट्रीय एकता संचलनाचे आयोजन केले गेले. या भव्य आयोजनामध्ये सहभाग नोंदवणा-या प्रत्येक देशवासियाचे मी अभिनंदन करतो.
मित्रांनो, संपूर्ण दुनियेमध्ये वेगवेगळे देश, वेगवेगळे पंथ, वेगवेगळी विचारधारा, भिन्नभिन्न भाषा, विविध प्रकारचे रंग-रूप, दुनियेमध्ये प्रत्येक देश बनताना असेच लोक जोडले गेले आहेत, समूह असाच बनत गेला आहे. परंतु आपण काही गोष्टी कधीच विसरून चालणार नाही. आपल्याला काही काही वेळेस त्या देशांच्या एकरूपतेचे दर्शन होते. त्या देशांची ती वैशिष्ठे असतात,तीच ओळख असते. अशी ओळख निर्माण करण्यासाठी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने प्रयत्न केले गेलेले असतात. चांगले असो, वाईट असो, बरोबर असो, चुकीचे असो, प्रत्येक काळाचे मूल्यांकन करण्याचे काम इतिहास करतच असतो. आत्तापर्यंत यासाठी खूप प्रयत्नही करावे लागले आहेत.
परंतु भारताची ओळख वेगळी आहे. भारताचे वैशिष्ट्य म्हणजे भारताची असलेली विविधतेमधली एकता! आपण विविधतेने नटले, भरलेले आहोत. विविधतेमधली एकता आमच्यासाठी गर्व, अभिमान आहे, आमचा गौरव आहे, आमच्याभोवती विविधेतची आभा आहे, हीच आमची खरी ओळख आहे. आमच्याकडे विविधतेला ‘साजरं’ केलं जातं. अनेक पिढ्यांना पिढ्या ही विविधता आहे त्यामुळे आम्हाला या विविधतेमध्ये कधीही, विरोधाभास असल्याचे दिसून येत नाही. परंतु याउलट आम्हाला या विविधतेच्या अंतर्निहित असलेल्या एकतेचे सामर्थ्य दिसून येते.
विविधतेचे साजरीकरण, विविधतेचा उत्सव यांच्या आतमध्ये लपलेल्या एकतेचा स्पर्श आम्हाला आनंद देतो. ही आतमधली एकता बाहेर आणणे म्हणजे प्रेरणा देण्याचे काम करण्यासारखे आहे. एकमेकांना जोडण्याची भावना खूप महत्वाची आहे. आपआपले उद्दिष्ट साध्य करताना आपण जी वाटचाल करत असतो ती एकमेकांच्या साथीनं, सर्वांना बरोबर घेवून केली तर जास्त चांगल्या प्रकारे होणार आहे आणि आपण शिखरही गाठू शकणार आहे.
ज्यावेळी आपण देशातल्या वेगवेगळ्या भाषा आणि शेकडो बोलीभाषा यांच्याविषयी गर्वाने बोलतो, त्यावेळी बोलीभाषा वेगवेगळ्या असतानाही भावनांचे बंध आपोआपच जुळून येतात. ज्यावेळी आपण वेगवेगळ्या खाद्यपदार्थांना, वेशभूषांना आपला समृद्ध वारसा, आपली समृद्ध परंपरा मानतो त्यावेळी त्यामध्ये एक आपलेपणाचा गोडवा येत असतो. ज्यावेळी आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये साजरे केले जाणारे सण एकत्रितपणे साजरे करतो, आपणही वेगळ्या क्षेत्रांच्या सणांमध्ये सहभागी होतो, त्यावेळी त्या क्षेत्रांतल्या लोकांच्या आनंदामध्ये भर पडते. इतकेच नाही तर त्या उत्सवाच्या, सणामध्ये एक प्रकारे नवीन रंग भरले जातात. एक वेगळाच स्वाद यायला लागतो.
ज्यावेळी आपण वेगवेगळ्या राज्यांच्या परंपरा, वैशिष्ट्ये, संस्कृती यांच्यातल्या विविधतेचा आनंद घेतो, त्यावेळी भारतीयत्वाचा गौरव, भारतीयत्वाचे भाव चोहों दिशांना पसरतात. हे भाव अधिक फुलतात, इतकंच नाही तर भारतीयत्वाचा गौरव वाढत जातो. ज्यावेळी आपण विविध पंथ, संप्रदाय, त्यांच्या परंपरा, आस्था, विश्वास यांचा समानतेनं सन्मान करतो, त्यावेळी सद्भाव, स्नेहभाव यांच्यामध्ये कितीतरी पट वृद्धी होत जाते. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक क्षणी विविधतेच्या प्रत्येक संधीला साजरं करण्याची आवश्यकता आहे. उत्सवाच्या रूपानं ही विविधता साजरी केली पाहिजे. एकमेकांशी जोडले जाणे म्हणजेच तर ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ आहे. यालाच तर राष्ट्र निर्माण असं म्हणतात.
मित्रांनो, आपली ही ताकद संपूर्ण दुनियेमध्ये इतर कोणत्याही देशाच्या भाग्यामध्ये नाही. इथं दक्षिणेतून निघालेले आदि शंकराचार्य उत्तरेमध्ये जावून हिमालयाच्या कुशीत जावून तिथं मठांची स्थापना करतात. इथं बंगालमधून निघालेल्या स्वामी विवेकानंद यांना देशाच्या दक्षिणी टोकावरच्या खडकावर -कन्याकुमारीमध्ये नवीन ज्ञानप्राप्ती होते. इथं पाटण्यात अवतरलेले जन्म धारण करणारे गुरू गोविंद सिंह जी पंजाबमध्ये जावून देशाच्या रक्षणासाठी खालसा पंथाची स्थापना करतात. इथं रामेश्वरममध्ये जन्मलेले एपीजे अब्दुल कलाम दिल्लीमध्ये देशाच्या सर्वोच्च पदावर आसनस्थ होतात, गुजरातच्या पोरबंदरच्या भूमीमध्ये जन्माला आलेले मोहनदास करमचंद गांधी चंपारणमध्ये, बिहारमध्ये जावून देशाला जागं करण्याचा संकल्प करतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की, आपल्या एकतेमध्ये असलेल्या अगाध ताकदीचे पर्व निरंतर असल्याची खूणगाठ आपण बांधण्याची नितांत गरजेचे आहे.
एकतेची ही ताकद म्हणजे भारतीयत्वाचा प्रवाह आहे, गती आहे. एकतेची ही ताकद म्हणजे ख-या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या आपल्या घटनेची प्रेरणाही आहे. ‘‘वुई द पीपल ऑफ इंडिया’’- ‘‘आम्ही सारे भारतीय’’ हे तीन-चार केवळ शब्द नाहीत. ही काही आपल्या घटनेची सुरूवात नाही. तर हजारों वर्षांपासून इथं सर्वांच्या मनात असलेला एकतेचा भाव या शब्दांमधून मांडला आहे. आपला चिर-पुरातन सांस्कृतिक इतिहास आहे, आपली परंपरा आहे आपला विश्वास आहे, आपले ते प्रतिबिंब आहे.
मित्रांनो, मी आपल्याला क्रीडा जगतामधलं एक उदाहरण देणार आहे. आम्ही सर्वजण जाणून आहात की, ज्यावेळी गावांमध्ये खेळांच्य स्पर्धा होतात त्यावेळी त्या गावातले दोन संघ जिंकण्यासाठी आपले सगळी शक्ती पणाला लावतात. या खेळात एक संघ जिंकतो आणि दुसरा हरतो. जिंकणारा संघ तहसीलमध्ये स्पर्धेसाठी जातो. ज्यावेळी दोन तहसीलमध्ये खेळ सुरू होतो, त्यावेळी याच खेळात हरणारा गावातल्या संघासहीत सर्व गावकरी आणि त्या तहसीलातले सर्व लोक आपल्या संघाच्या विजयासाठी एकदिलानं त्या संघाच्या पाठीशी उभे राहतात. परंतु ज्यावेळी तहसिलमध्ये स्पर्धा होवून जिंकलेला संघ जिल्हा पातळीवर खेळायला जातो, त्यावेळी त्या जिल्ह्यातले सगळे लोक त्या संघाच्या पाठीशी उभे राहतात. यामध्ये हरलेल्या तहसिलाचे लोक आणि खेळाडूही असतात. दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या स्पर्धेत जिंकणारा संघ आता राज्यात खेळायला जातो. ही स्पर्धाही होते, देशांतर्गत स्पर्धेत संपूर्ण राज्य त्या संघाच्या पाठीशी असतं. राज्याच्या विजयासाठी सगळे एक होतात. इथं जय-पराजय याला काहीच महत्व नाही. सगळेजण एक झाले आहेत, हे महत्वाचं आहे.
एकतेचा हाच भाव ज्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन देशांतल्या स्पर्धेत दिसून येतो. संपूर्ण देश त्या संघाच्या पाठीशी उभा असतो. अशावेळी ही टीम कुठली आहे, खेळाडू कोणत्या गावाचा आहे, त्याची भाषा कोणती होती? त्यानं मला हरवलं होतं की नव्हतं, या सर्व गोष्टी सगळेजण विसरून जातात. सर्वांना फक्त हिंदुस्तानचा तिरंगा आपल्या खांद्यावर घेवून विजयाची दौड करणारा भारतीय संघ, भारतीय खेळाडू दिसतो. संपूर्ण हिंदुस्तान त्या विजयाच्या आनंदात आपणच जिंकलो असं गर्वानं मानून दौडत असतो. अशावेळी एकसाथ भारत मातेचा जयजयकार केला जातो. हीच तर एकतेची ताकद आहे. या प्रचंड ताकदीचा आपण अनुभव करतो.
ज्यावेळी परदेश भूमीवर भारतीय खेळाडू पदक जिंकतो, त्यावेळी त्या भूमीवर तिरंगा फडकतो तेव्हा काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि महाराष्ट्रापासून ते मणिपूरपर्यंत प्रत्येक भारतीय रोमांचित होत असतो. प्रत्येकाच्या मनात देशाविषयी असलेल्या अभिमानाची भावना उफाळून येते.
मित्रांनो, ज्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी 500 पेक्षा जास्त संस्थानांच्या विलिनीकरणाचे भगिरथ कार्य करायला प्रारंभ केला होता, त्यावेळी ही चंुबकीय शक्ती होती. त्यामध्ये जवळपास सर्व राज-राजवाडे त्यांच्या भावविश्वामध्ये गुंतून पडलेले होते. त्यावेळी प्रत्येक राजवाडा आणि तिथल्या लोकांमध्ये कुठे ना कुठे अगदी आतमध्ये, मनाच्या सांदी कपारीमध्ये भारतीयत्वाची भावना भरून राहिलेली होती. शेकडों वर्षांच्या गुलामी कालखंडामध्ये राजे-राजवाड्यांमध्ये असलेला भारतीयत्वाचा हा भाव त्यांना प्रकट करण्याची संधी मिळाली असेल किंवा नसेल, कधी ते प्रकटपणे बोलले असतील किंवा कदाचित बोलूही शकले नसतील. परंतु भारतीयत्वाचा हा भाव शतकानुशतकांच्या गुलामीनंतरही अनेकानेक संकटे आली असतानाही, अनेक प्रकारची प्रलोभने दिसलेली असतानाही, ही एकतेची भावना हिंदुस्तानच्या कोणत्याही कानाकोप-यातून कधीच लुप्त झालेली नव्हती. आणि म्हणूनच सरदार पटेल यांनी ज्यावेळी एकतेचा मंत्र घेवून वाटचाल सुरू केली, त्यावेळी सर्वजण त्यांच्या छत्रछायेखाली उभे राहिले.
बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की, अनेक शतकांपूर्वी तमाम संस्थानिकांना घेवून, राजे-राजवाड्यांना बरोबर घेवून, वेेगवेगळ्या परंपरा, विविधतेच्या साथीने ‘एक भारत’ बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून राष्ट्राच्या पुनरूद्धाराचा यशस्वी प्रयत्न करणा-या एका व्यक्तीचे नाव इतिहासामध्ये घेतले जाते - ते नाव आहे आर्य चाणक्य!! अनेक शतकांपूर्वी चाणक्याने आपल्या कालखंडामध्ये देशातली शक्ती एकजूट करण्याचा प्रयत्न केला होता. चाणक्य यांच्यानंतर जर हेच काम या देशात कोण करू शकले तर ते आहेत, आमचे सरदार वल्लभभाई पटेल. नाहीतर स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचे, या भारताचे तुकडे-तुकडे अगदी शकले व्हावेत असेच तर इंग्रजांना वाटत होते. परंतु सरदार पटेल यांनी आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर देशाला एका सुत्रामध्ये बांधून देशविरोधी असलेल्या सर्व ताकदींना नामोहरम केले होते.
बंधू आणि भगिनींनो, आज वैश्विक व्यासपीठ आणि वैश्विक संस्था यांच्यावर आमचा प्रभाव वाढतो आहे. आमच्याविषयी सद्भावही वाढतो आहे. यामागचे कारण आहे, ते म्हणजे आमची एकता! विविधतेमध्ये एकता- ही आमची ओळख आहे. आज संपूर्ण जगामध्ये भारताचे म्हणणे अतिशय गंभीरतेनं ऐकलं जात आहे. त्याचे कारण म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत, अटक ते कटकपर्यंत एक राष्ट्र, श्रेष्ठ राष्ट्र, महान संस्कृती, महान परंपरा आहे. हीच तर आमची शक्ती आहे. आणि हेच आमचे एक कारण आहे.
आज भारत दुनियेतल्या मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये आपले स्थान बनवत आहे. आपल्या हक्काचं स्थान प्राप्त करून घेत आहे. कारण अर्थ जगताचे प्रकरण आले की, डॉलर, रूपये, पौंड याची भाषा येते. परंतु यामागे खरी ताकद आहे ती देशाच्या एकतेची. देशवासियांनी केलेले संकल्प आहेत. देशवासियांचा पुरूषार्थ आहे, देशवासियांचा जो संकल्प आहे, तो सिद्ध करण्यासाठी अथक परिश्रम आणि पुरूषार्थ आहे. संपूर्ण दुनियेला आमची ही विविधता म्हणजे एक नवलाची, आश्चर्याची गोष्ट वाटते. ही एक जादुगिरी वाटते. परंतु आम्हा भारतीयांसाठी तर ही अंतर्प्रवाहित जीवनधारा आहे. ही जीवनधारा आपल्या आदिकाळापासून अनवरत आमच्या संस्कार सरिता बनून आमच्या मन-मंदिरातून प्रवाहित होत राहिली आहे. हा प्रवाह आम्हाला पुलकित करत राहतो. समयानुसार यामध्ये नवनवीन अनेक गोष्टी जोडल्या जात आहेत. या जीवनधारेवर सरदार पटेल यांचा अतूट आणि अखंड विश्वास होता.
मित्रांनो, 21 व्या शतकामध्ये भारताची हीच एकता, भारतीयांची हीच एकात्मता, भारताच्या विरोधकांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे. मी आज राष्ट्रीय एकता दिवसावर प्रत्येक देशवासीयाला देशासमोर असणा-या आव्हानांचे स्मरण करून देत आहे. अनेकजण आले, अनेकजण गेलेही. मोठ-मोठे स्वप्ने, मोठमोठे उद्देश घेवून आले होते आणि तरीही साध्य मात्र काहीच झाले नाही. ‘‘आमचं असं व्यक्तित्व संपुष्टात आणताच येणार नाही, अशी काही खास गोष्ट या भारतीयांमध्ये आहे’’.
बंधू आणि भगिनींनो, जे लोक आमच्याशी युद्धात जिंकू शकले नाहीत, तेच आमच्या या एकतेला आता आव्हान देत आहेत. आमच्या एकतेमध्ये छेद पाडण्याचा, आमच्यात फूट पाडण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. आमच्यात फुटीरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्यातल्या एकतेच्या भावनेला ते आव्हान देत आहेत. अनेक युगांपासून आमच्या मनामध्ये जतन केलेल्या एकतेच्या समर्थ भावनेला आव्हान देत पुकारण्याची चूक ते करीत आहेत. अशा दुष्ट प्रयत्नांनी कोणीही आमच्यातील एकतेला तडा पाडू शकणार नाही. आमच्या एकसंध भावनेला कोणीही हरवू शकणार नाही.
आणि म्हणूनच मित्रांनो, ज्यावेळी आमच्या विविधतेमध्ये एकतेवर बळ देणारी जी कोणती गोष्ट आहे, ती अशा एकतेच्या विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे सामर्थ्य राखून आहे. त्यामुळे एकतेच्या विरोधकांना योग्य भाषेत उत्तर दिलं जात आहे. ज्यावेळी आमच्यातील विविधता आपल्याला एकतेच्या मार्गावरून घेवून जात आहे, त्यावेळी अशा विरोधी ताकदींचा चक्काचूर होत असतो. म्हणूनच आम्ही 130 कोटी भारतीय एकजूट होवून वास्तव्य करायचे आणि विरोधी ताकदींचा कठोरतेनं सामना करायचा आहे. हीच सरदार वल्लभभाई पटेल यांना खरी श्रद्धांजली असणार आहे. आपल्याला विरोधी ताकदीच्या प्रत्येक परीक्षेत यशस्वी व्हायचे आहे.
बंधू आणि भगिनींनो, सरदार साहेबांच्या आशीर्वादाने या विरोधी ताकदींना मात देण्यासाठी देशाने काही आठवड्यांपूर्वीच एक खूप मोठा, महत्वाचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, घटनेतलं 370वं कलम! घटनेतल्या या 370 व्या कलमानं जम्मू-काश्मीरला फुटीरतावाद आणि दहशतवाद यांच्याशिवाय काहीही दिलं नाही. संपूर्ण देशामध्ये जम्मू-काश्मीर या एकमेव राज्यामध्ये कलम 370 वे लागू होते. आणि संपूर्ण देशामध्ये फक्त जम्मू -काश्मीर या एकमात्र राज्यात तीन दशकांमध्ये दहशतवादाने जवळपास 40हजार लोकांपेक्षा जास्त लोकांचे प्राण घेतले. इतक्या लोकांना यमसदनी पाठवलं. अनेक मातांनी आपले पुत्र गमावले, अनेक भगिनींनी आपले भाऊ गमावले, अनेक मुलांनी आपले माता-पिता गमावले. असंख्य मुले अनाथ झाली आहेत.
मित्रांनो, किती काळ? किती काळ निष्पाप लोकांचे होणारे मृत्यू देश पहात बसणार? मित्रांनो, अनेक दशकं लोटली, कलम- 370 म्हणजे जम्मू काश्मीर आणि उर्वरित भारत यांच्यामध्ये एक अस्थायी भिंत निर्माण करून ठेवली होती. ही भिंत काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि दहशतवाद वाढवत होती. आज सरदार साहेब यांच्या या भव्य प्रतिमेसमोर मी उभा आहे. त्यांच्यासमोर मस्तक झुकवून अगदी नम्रतेनं सरदार साहेबांना मी हिशेब देत आहे. सरदारसाहेब, तुमचं जे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, ते आता पूर्ण झालं आहे. आता ती भिंत आम्ही तोडून टाकली आहे.
बंधू आणि भगिनींनो, सरदार पटेल यांनी एकदा म्हटलं होतं की, जर कश्मीर प्रश्न त्यांच्याकडे असता, तर तो सुटण्यासाठी इतका वेळ लागला नसता. त्यांनी देशाला आधीच इशारा दिला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी जम्मू-काश्मीरचे भारतामध्ये पूर्णपणे एकीकरण करणे हाच एकमात्र उपाय आहे, असे सरदारजींनी आधीच स्पष्ट केलं होतं. आज त्यांच्या जयंतीदिनी घटनेतलं कलम -370 रद्द करण्याचा घेतलेला निर्णय किती रास्त आहे, हे देशाला पटणार आहे. हे कलम हटवण्याचा निर्णय या संसदेमध्ये दि. 5 ऑगस्ट रोजी मोठ्या बहुमतानं, पूर्ण एकतेनं घेण्यात आला. देशाच्या एकतेसाठी घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय मी आज सरदारजींच्या भव्य प्रतिमेसमोर उभं राहून त्यांना समर्पित करतो. आज इथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे सद्भाग्य म्हणजे आपल्याला सरदार पटेल साहेबांचे अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. जम्मू -काश्मीर आणि लडाख यांची आता एका नवीन भविष्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, याचा आम्हा सर्वांना अतिशय आनंद आहे. एकतेचे पुजारी सरदार साहेबांच्या जयंतीदिनीच लडाख , जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले नायब राज्यपाल पदग्रहण करीत आहेत, हा यागोयोग म्हणजे ‘सोने पे सुहागा’ मानला पाहिजे. ही राज्ये आता उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मजबूत पावले टाकतील, असा मला विश्वास आहे.
माझ्या बंधू आणि भगिनींनो, अलिकडेच काही सप्ताहांपूर्वी या राज्यांमध्ये ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या निवडणुका झाल्या आहेत. आणि तुम्हाला जाणून नवल वाटेल. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे झाली तिथं लोकशाहीविषयी फक्त चर्चा होत आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना लोकशाहीत असलेला महत्वाचा अधिकार आत्तापर्यंत दिला गेला नाही. तिथं 370 व्या कलमाच कारण सांगून बीडीसीची निवडणूक कधीच घेतली गेली नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या राज्यात बीडीसीची निवडणूक झाली. आणि पंच-सरपंच होते. गेल्या सप्ताहामध्ये झालेल्या या निवडणुकीत 98 टक्के पंच-सरपंचांनी मतदान केले. मतदानातल्या सहभागीतेने आपोआपच एकतेचा एक महत्वपूर्ण संदेश दिला गेला आहे. हे एक प्रकारे सरदार साहेबांचे पुण्यस्मरणच आहे.
आता जम्मू-काश्मीरमध्ये एक राजनीतिक स्थिरता येवू शकणार आहे. आता कोणाही व्यक्तीला खाजगी स्वार्थासाठी सरकार बनवण्याचा आणि सरकार पाडण्याचा खेळ करता येणार नाही. असे खेळ आता बंद होतील. क्षेत्रीय आधारावर भेदभाव करून तक्रारी, हेवेदावे करणे, हे सगळे प्रकार आता बंद होतील. आता सहकार्य संघटनेचे खरे भागीदार- विकासयात्रेत सहभागी होतील आणि खांद्याला खांदा लावून काम करतील, यामुळे जम्मू- काश्मीरात नवीन युगाचा प्रारंभ होईल. नवीन महामार्ग, नवीन लोहमार्ग, नवीन शाळा, नवीन महाविद्यालये, नवीन रूग्णालये, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना विकासाच्या नवीन उंचीवर नेतील.
मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्राला ‘संबोधन’ करताना मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना आणखी एक वचन दिलं होतं. मी म्हणालो होती की, राज्यातल्या कर्मचारीवर्गाला, जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना इतर केंद्रशासित प्रदेशांच्या कर्मचारीवर्गा इतक्याच, पुन्हा सांगतो- इतर केंद्रशासित प्रदेशातल्या कर्मचारीवर्गां इतक्याच सुविधा दिल्या जातील. आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या सर्व कर्मचारी वर्गाला सातव्या वेतन आयोगाने स्वीकृत केलेल्या भत्त्यांचाही लाभ मिळू शकणार आहे, हे सांगताना, मला खूप आनंद होत आहे.
मित्रांनो, जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये नवीन व्यवस्था म्हणजे काही जमिनीवर एखादी रेष मारण्यासारखी नाही. ही गोष्ट मी अतिशय जबाबदारीने सांगतोय. हा आमचा निर्णय काही जमिनीवर फक्त रेघ ओढणारा नाही. तर विश्वासाची एक कडी अधिक मजबूत करण्यासाठी आहे. हा विश्वास बळकट करण्यासाठी सार्थक प्रारंभ आहे. अशाच विश्वासाची कामना सरदार वल्लभभाई पटेल यांनीही जम्मू आणि काश्मीर, लडाख यांच्यासाठी स्वप्न पाहताना केली होती. आणि आता मी पुन्हा एकदा सांगतो की, देशाच्या एकतेवर, या देशाच्या एकतेवर केला जाणारा हल्ला आम्ही सडेतोड उत्तर देवून परतवून लावू. देशाच्या एकतेला जर कोणी सुरूंग लावण्याचा साधा प्रयत्न जरी केला तरी तो क्षणभरही टिकणार नाही. आमच्या एकतेची, लोकशाहीची इतकी मोठी ताकद आहे, आमची जनभावना इतकी मजबूत आहे की, आम्हाला धक्का लावणारे इथं कधीच टिकू शकणार नाहीत.
मित्रांनो, सरदार साहेबांच्या प्रेरणेने आम्ही संपूर्ण भारताच्या ‘इमोशनल इकोनॉमिक’ आणि घटनात्मक एकात्मतेवर भर देण्याची परंपरा अशीच पुढे नेत आहोत. या प्रयत्नांशिवाय 21 व्या शतकामध्ये विश्वामध्ये भारताच्या मजबुतीची कल्पना आम्ही करू शकत नाही.
बंधू आणि भगिनींनो, एकेकाळी ईशान्येकडील राज्ये आणि शेष भारत यांच्या दरम्यान अविश्वासाची खोल दरी निर्माण करण्यात आली होती, तो काळ तुम्ही आठवा. तिथल्या लोकांशी थेट संपर्क यंत्रणा आणि भावनिक संपर्क यांच्याबाबतीत अतिशय गंभीर प्रश्न वारंवार उभे केले जात होते. परंतु आता सर्व स्थिती बदलली आहे. आज ईशान्येकडील राज्यांविषयी सर्वांनाच प्रेम वाटते. दशकांपासून असलेली ही समस्या आता सुटत आहे. हिंसा आणि दीर्घकाळ बंद यापासून संपूर्ण ईशान्य भारत आता मुक्त झाला आहे. विशेष म्हणजे यासाठी आम्हाला काही काठीचा धाक दाखवावा लागला नाही. तर त्यांच्याबरोबर भावनात्मक नाते जोडल्यामुळे हा चमत्कार घडून आला आहे. देशामध्ये एकात्मतेसाठी इतर प्रयत्नही करता येतात, आमची ही प्रक्रिया अविरत चालू आहे. आमची ही निरंतर जबाबदारी आहे. अर्थात ही सर्व देशवासियांचीही जबाबदारी आहे.
आणि म्हणूनच बंधू-भगिनींनो, आमचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे तुम्हीही पहात आहात. आता आधारविषयी चर्चा सुरू आहे. आधार म्हणजेच ‘वन नेशन वन आयडेंटीटी’ जीएसटी म्हणजे ‘वन नेशन वन टॅक्स’ असेल किंवा ‘वन नेशन वन मोबिलिटी कार्ड’ असेल. ‘वन नेशन वन ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ असेल किंवा ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ असेल. या सर्व गोष्टी ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’हा दृष्टिकोन अधिक मजबूत करण्याचं काम करत आहे.
बंधू आणि भगिनींनो, सरदार साहेब म्हणत होते, भारतामध्ये स्थायित्वासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत, त्या म्हणजे, ‘युनिटी ऑफ परपज, युनिटी ऑफ एम्स आणि युनिटी ऑफ एनड्यूव्हर’ आमच्या उद्देशांमध्ये, आमच्या लक्ष्यांमध्ये आणि आमच्या प्रयत्नांमध्ये समानता असण्याची गरज आहे.
बंधू आणि भगिनींनो, गेल्या वर्षांमध्ये आम्ही नवीन भारताचे समान उद्देशांच्या जोडीला भारतातल्या सामूहिकतेला, आमच्यातल्या ख-या ताकदीला आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सरकारी हस्तक्षेप कमी करून भारताच्या भविष्याचा भागीदार बनवलं आहे. आज तो भारतीय आपल्या अधिकारांविषयी जागरूक तर आहेच आहे. त्याचबरोबर आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यासाठी हिंदुस्तानचा प्रत्येक नागरिक सक्रिय आणि सचेत आहे. स्वच्छतेविषयी तो राष्ट्राच्याबाबतीत आपले दायित्व निभावतो. हिंदुस्तानचा प्रत्येक नागरिक स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावला. सर्वांनी हे आपलंच काम आहे, असं मानून ते पार पाडू लागला. ज्यावेळी मी ‘फिट इंडिया’ या विषयावर बोलतो, त्यावेळी संपूर्ण देशानेही आपले यामध्ये योगदान असावे असा विचार केला. पाणी बचतीला सर्वजण आता आपले राष्ट्रीय कर्तव्य मानायला लागले आहेत. नियम-कायदे यांचे पालन करणे कधीकाळी बरेचजण नाइलाज मानत होते. आता सगळेजण आपली ही जबाबदारी मानू लागले आहेत. आणि नियम पाळू लागले आहेत. आता सगळेजण घरातून बाहेर पडतानाच बरोबर कापडाची एक पिशवी घेवून निघतात. प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल, याचा सगळेजण विचार करीत आहेत.
मित्रांनो, आज मी संपूर्ण देशाला आवाहन करतो की, चला तर या - आपण सर्वांनी त्या पुरातन उद्घोषणेचे स्मरण करीत पुढे जावू या. या उद्घोषणेने आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा दिली आहे. अनेकवेळा आपण ऐकलं असेल, अनेकदा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु देश जसजसा पुढे जात आहे, तसतसे प्रत्येक हिंदुस्तानीने त्या मंत्राचा जप करून देशाला पुढे न्यायचे आहे. आणि हा मंत्र आहे -
सं गच्छ-ध्वं, सं वद ध्वं, सं वो मनांसि जानताम् !!
याचा अर्थ असा आहे की, आपण सर्वजण मिळून एका साथीनं पुढं जावूया, आपण एका स्वरात बोलूया, एक मनाने सर्वजण मिळून पुढे जावूया.
मित्रांनो, एकता हा एकच मार्ग- आहे, ज्यावरून वाटचाल करताना ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हा संकल्प पूर्ण होवू शकणार आहे. नवीन भारताचे निर्माणही या एकतेच्या मार्गावरून जातानाच होवू शकणार आहे.
अखेरीस, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, संपूर्ण देशाला राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा देतो. सरदार साहेबांची ही भव्य प्रतिमा म्हणजे काही फक्त प्रवास नाही तर हे एक प्रेरणा स्थान आहे, असा अनुभव आज मला येत आहे. माझी श्रद्धा आहे की, आज सरदार साहेबांचा आत्मा जिथं कुठं असेल, तिथून हे चित्र पहात असेल. त्यांनी लावलेले एकतेचे हे बीज आज हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोप-यापर्यंत पोहोचले आहे. एकतेच्या या रोपांचा वटवृक्ष सगळीकडे मोठ्या प्रमाणात फळतोय-फुलतोय, पसरतोय. त्याच्या छायेमध्ये आज 130 कोटी भारतीयांची स्वप्ने आकार घेत आहेत. ज्यांच्या सामर्थ्यामुळे विश्व आश्वस्त होवून मार्गक्रमण करत आहे. विश्वामध्ये नवीन विश्वास निर्माण होतो आहे. आणि म्हणूनच सरदार साहेबांनी जे बीज रोवले आहे, त्या बियाणाला आपल्या परिश्रमाने, आपल्या स्वप्नांनी, आपल्या संकल्पांनी, आपल्याला अधिकाधिक समृद्ध करायचे आहे. हे बियाणे, त्याचा वृक्ष अधिक सामर्थ्यवान करायचे आहे. आणि जन-कल्याणापासून ते जग-कल्याणापर्यंतचा मार्ग आपल्याला तयार करून पुढे जायचे आहे.
माझ्यावतीने, आज मी पुन्हा एकदा देशवासियांच्यावतीने, भारत सरकारच्या वतीने, व्यक्तिगत रूपाने मी सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना मस्तक झुकवून आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्हा सगळ्यांना खूप-खूप धन्यवाद! आता पूर्ण ताकदीनिशी, दोन्ही मुठी बंद करून माझ्याबरोबर जयघोष करावा -
भारत माता की - जय !
भारत माता की - जय !
भारत माता की - जय !
खूप -खूप धन्यवाद !!
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
(Release ID: 1590117)
अभ्यागत कक्ष : 244