पंतप्रधान कार्यालय

देशाच्या विविधतेतल्या एकतेचा उत्सव साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

Posted On: 31 OCT 2019 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची समृद्ध विविधता आणि हजारो वर्षांच्या प्राचीन जीवनशैलीची प्रशंसा करत यामुळे राष्ट्रीय एकता कायम राहण्यासाठी मदत होत असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केवडिया येथे ते जनतेला संबोधित करत होते.

विविधतेत एकता असल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. यामुळे आमची ओळख आणि सन्मान मिळतो. विविधतेतल्या एकतेचा आम्ही उत्सव साजरा करतो. विविधतेमध्ये आम्हाला परस्पर विरोध नाही तर एकतेचे मजबूत सूत्र दिसते असे पंतप्रधान म्हणाले. वेगवेगळ्या जीवनशैली आणि परंपरांचा आम्ही सन्मान करतो तेव्हा सलोखा आणि बंधुत्व वृद्धींगत होते. म्हणूनच विविधतेतल्या एकतेचा आपण उत्सव साजरा केला पाहिजे आणि हे राष्ट्र निर्माणही आहे असे ते म्हणाले.

ही विविधता ही भारताची एक शक्ती आहे. जगात अन्यत्र कोठेही ही विविधतेतली ताकद आपल्याला सापडणार नाही. बंगालमधून आलेल्या स्वामी विवेकानंद यांना दक्षिणेतल्या कन्याकुमारी येथे ज्ञानप्राप्ती झाली. पाटणा येथे जन्म झालेले गुरु गोविंदसिंह यांनी पंजाबमध्ये खालसा पंथ स्थापन केला.

भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत ‘वुई द पिपल ऑफ इंडिया’ ही संज्ञा केवळ संज्ञा नव्हे तर भारताच्या हजारो वर्षांच्या प्राचीन संरचनेचे दर्शन आहे असे पंतप्रधान म्हणाले.

भारताचा प्रभाव जगभरात वाढत आहे. त्याचे कारणही आपली एकताच आहे. संपूर्ण जग भारताकडे आशास्थान म्हणून पाहत आहे. त्यामागेही आपली राष्ट्रीय एकताच आहे. आज भारत जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामागचे कारणही आपली राष्ट्रीय एकताच आहे असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या विरुद्ध जे युद्ध जिंकू शकले नाहीत ते आपल्या एकतेला आव्हान देत आहेत. मात्र आमच्यातली एकतेची भावना कोणीही नष्ट करु शकले नाहीत याचा त्यांना विसर पडला आहे.

काही आठवड्यांपूर्वीच कलम 370 हटवण्याचा निर्णय देशाने घेतला. या कलमामुळे जम्मू काश्मीरला फुटीरतावाद आणि दहशतवादाची झळ सोसावी लागली. या कलमामुळे देशातल्या जनतेत कृत्रिम भिंत निर्माण झाली असे पंतप्रधान म्हणाले. ही भिंत आता नष्ट झाली आहे. संपूर्ण देशात जम्मू काश्मीर हे एकच स्थान होते जिथे कलम 370 लागू होते. गेल्या तीन दशकात दहशतवादी कारवायांमुळे 40,000 हून जास्त जणांना प्राण गमवावे लागले. अनेक माता आपला मुलगा, बहिणींना  आपला भाऊ तर मुलांना आपले पालक गमवावे लागले.

जम्मू काश्मीरचा मुद्दा माझ्याकडे सोपवला असता तर त्याचे निराकरण करण्यासाठी इतका वेळ लागला नसता असे सरदार पटेल यांनी म्हटले होते असे सांगून कलम 370 हटवण्याचा निर्णय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी त्यांना समर्पित करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीर, लडाख विकासाच्या मार्गावर उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करतील असे ते म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या ब्लॉक डेव्हलपमेंट कॉउन्सिल निवडणुकीत 98 टक्क्याहून अधिक मतदान झाले. मतदार असणारे पंच आणि सरपंचांनी मोठ्या संख्येने  मतदान केले आणि एक मोठा संदेश दिला. आता जम्मू काश्मीरमध्ये राजकीय स्थैर्याचा नवा अध्याय सुरु होईल. वैयक्तिक स्वार्थासाठी सरकार स्थापनेच्या खेळाला पूर्णविराम मिळेल.

ईशान्येकडच्या राज्यांच्या विकासाबाबत बोलताना या भागात फुटीरतावादी वृत्तीचे रुपांतर विकासात होत असल्याचे ते म्हणाले. दशकांपासून सुरु असलेल्या समस्यांवर आता तोडगा काढण्यात येत आहे. दशकांपासून सुरु असलेल्या हिंसाचारातून संपूर्ण ईशान्येकडची राज्ये आता मुक्त होत आहेत.

सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशात पूर्ण आर्थिक, संविधानिक एकात्मतेवर भर देण्यात येत आहे. देशात स्थैर्य कायम राखण्यासाठी उद्देश, प्रयत्न आणि लक्ष्य यामध्ये एकता आवश्यक आहे.

राष्ट्रीय एकतेच्या या मार्गावरुन आपण पुढे वाटचाल करत राहू तेंव्हाच ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हे उदिृष्ट आपल्याला साध्य करता येईल असे पंतप्रधानांनी सांगितले.  

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1589838) अभ्यागत कक्ष : 127
Read this releasein: English