पंतप्रधान कार्यालय

सौदी अरेबियाबरोबर रणनीतिक भागीदारी परिषद सामंजस्य व्दिपक्षीय संबंधांना अधिक बळकट करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी


सौदी अरेबियाबरोबर अशा पद्धतीचे सामंजस्य करार करणारा भारत चौथा देश

प्रविष्टि तिथि: 29 OCT 2019 4:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2019

 

भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान रणनीतिक सामंजस्य परिषद सहकार्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पहिल्यापेक्षा अधिक बळकट आणि दृढ होतील, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरेबियाच्या आपल्या प्रवासामध्ये ‘अरब न्यूज’ बरोबर चर्चा करताना हे मत व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदी गेल्या तीन वर्षांमध्ये दुस-यांदा सौदी अरेबियाला भेट देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दोन्ही देश असमानता कमी करण्यासाठी आणि विकासाला सातत्याने प्रोत्साहन देण्यासाठी जी-20 अंतर्गत सहकार्याने कार्य करीत आहेत.

जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी तेलाच्या किंमती स्थिर राहण्याची आवश्यकता आहे, असे मोदी म्हणाले. भारताच्या ऊर्जा पूर्ततेसाठी सौदी अरेबिया एक विश्वासू सहकारी म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याबद्दल मोदी यांनी सौदी अरेबियाचे कौतुक केले.

सौदी अरेबियाचे राजे ‘प्रिन्स’ एचआरएच मोहम्मद बिन सलमान यांच्याबरोबर आपले उत्कृष्ट व्यक्तिगत संबंध असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, 2016 मध्ये सौदी अरेबियाच्या आपल्या पहिल्या भेटीनंतर आमच्यातील संबंध अधिकाधिक दृढ होत गेले आहेत. मी रॉयल हायनेस (एचआरएच) क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची पाचवेळा भेट घेतली आहे. त्यांच्याबरोबर झालेल्या मागील भेटीच्या प्रसन्न आठवणी माझ्या मनात घोळत आहेत. तसेच आज होत असलेल्या या भेटीमध्येही खूप काही चांगले घडेल, अशी मला आशा आहे.

शाह सलमान आणि एचआरएच क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यानचे व्दिपक्षीय संबंध आणखी चांगले मजबूत होतील, असा मला विश्वास आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘शेजारी सर्वप्रथम’’ या मार्गदर्शक धोरणाचा आम्ही अवलंब करीत आहोत. सौदी अरेबियाबरोबर भारताचे संबंध अधिक व्यापक करण्यासाठी ‘‘शेजारी प्रथम’’ धोरण उपयुक्त ठरणारे आहे. ’’

या भेटीच्या काळामध्ये रणनीती सामंजस्य परिषद होणार आहे. त्यामध्ये होत असलेल्या सहभागीता कराराचे उल्लेख करून मोदी यांनी सांगितले की, उभय देशांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य, सहयोगाचे एक नवीन युग प्रारंभ होणार आहे. व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उभय देशांतील संबंध आता केवळ बळकट झाले आहेत असे नाही तर ते अधिकाधिक दृढ झाले आहेत.

भारत आणि सौदी अरेबिया यासारख्या आशियाई शक्तींनी आपल्या शेजारी निर्माण होत असलेल्या सुरक्षा चिंतेच्या विषयाची एकत्रित चर्चा केली पाहिजे, असं मला वाटतं. या संदर्भामध्ये दहशतवादाला विरोध, सुरक्षा आणि सामरिक मुद्दे याविषयी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या चर्चा प्रगतीपथावर आहे, त्याबद्दल मला समाधान वाटते. या संदर्भात आमच्या राष्ट्रीय सल्लागारांनी केलेली रियाद यात्रा अतिशय संरचनात्मक ठरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संरक्षण सहकार्यावर भारत आणि सौदी अरेबिया यांच्या संयुक्त समितीच्या नियमित बैठका होत आहेत. दोन्ही देशांनी संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रामध्ये एकमेकांचे हीत लक्षात घेवून सहकार्य करण्यासारखी अनेक क्षेत्रांची निवडही केली आहे.

सुरक्षा सहकार्य, संरक्षण उद्योग यामध्ये सहयोगाविषयीही सामंजस्य करार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही देशांमध्ये एक व्यापक सुरक्षा संवाद तंत्र कायम ठेवण्यासाठी सहमती झाली आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पश्चिम आशियातल्या अनेक क्षेत्रांमध्ये होत असलेल्या गडबडींबाबत पंतप्रधानांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला जावू नये, या सिद्धांताचा सन्मान करून या संघर्षांकडे संतुलित दृष्टिकोनाच्या माध्यमातून पाहिले पाहिजे आणि हे प्रश्न सोडवले पाहिजेत.

याबाबतीत भारताने या क्षेत्रातल्या सर्व देशांबरोबर उत्कृष्ट व्दिपक्षीय संबंध प्रस्थापित केले आहेत आणि या भागात 8 कोटीपेक्षा अधिक भारतीय वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये शांती आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाइी सर्व हितधारकांमध्ये भागीदारीबरोबरच एक महत्वपूर्ण संवाद साधण्याला प्रोत्साहन देण्याची प्रक्रिया आवश्यक आहे, असं आपल्याला वाटत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं.

वर्तमान वैश्विक अर्थव्यवस्थेवर आपले विचार मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या विकसनशील देशाने स्वीकारलेल्या मार्गावर वैश्विक आर्थिक दृष्टिकोन निर्भर आहे. ज्याप्रमाणे मी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या भाषणात उल्लेख केला होता की, आम्ही याविषयाला अतिशय गांभीर्याने घेत आहोत आणि सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

ते म्हणाले की, आर्थिक अनिश्चितता म्हणजे असंतुलित बहुपक्षीय व्यापार प्रणालीचा परिणाम आहे. जी -20 च्या अंतर्गत, भारत आणि सौदी अरेबिया असमानता कमी करण्यासाठी आणि निरंतर विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्तपणे कार्य करीत आहे. सौदी अरेबिया पुढच्या वर्षी जी-20 शिखर परिषदेच्या आयोजनाचे यजमानपद स्वीकारत आहे, हे जाणून मला आनंद झाला. भारत 2022 मध्ये आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन साजरा करणार आहे, त्याचवर्षी भारत जी-20 परिषदेचे यजमानपद भूषविल.

पश्चिमेकडील देशांच्या अर्थव्यवस्थेत वर्तमान काळात मंदी आली आहे आता अशा परिस्थितीमध्ये भारत आणि सौदी अरेबियाची भूमिका काय असावी, या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने व्यापाराला अनुकूल असे वातावरण निर्माण केले आहे. वैश्विक विकास आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वपूर्ण संचालक बनण्याच्या दिशेने अनेक सुधारणा केल्या आहेत. व्यापारसुलभता आणि गुंतवणुकदारांना अनुकूल असे वातावरण भारतात तयार करण्यात आले आहे. या दिशेने आम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे जागतिक बँकेच्या ‘ईज ऑफ डुइंग बिजनेस’च्या यादीमध्ये भारताच्या क्रमवारीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. 2014 मध्ये आमचा क्रमांक 142 होता तो आता 2019 मध्ये 63 झाला आहे.

मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटीज आणि स्टार्टअप इंडिया यासारख्या अनेक कार्यक्रमांमुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. सौदी अरेबियानेही आपल्या व्हिजन 2030 कार्यक्रमाअंतर्गत एक सुधारणा कार्यक्रमाचा प्रारंभ केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

भारताच्या दृष्टीने सर्वात मोठा तेलपुरवठादार देश म्हणजे सौदी अरेबिया आहे. या देशाबरोबर भारताचे दीर्घकाळापासून असलेले सौहार्दाचे ऊर्जा संबंध या विषयावर विचार व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, ‘‘भारत आपल्या कच्च्या तेलापैकी जवळपास 18 टक्के भाग सौदी अरेबियातून आयात करतो. हा आमच्यासाठी कच्च्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा स्त्रोत आहे. खरेदीदार आणि विक्रेता असे सच्चे नाते उभय देशांमध्ये आहे. आता आमच्यामध्ये चांगले ऋणानुबंध निर्माण झाल्यामुळे रणनीतीमध्ये सहभागीता करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे वाटचाल करीत आहोत. यामध्ये डाउनस्ट्रीम तेल आणि गॅस योजनांमध्ये सौदी अरेबियामध्ये गुंतवणुकही करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही आपल्या ऊर्जा आवश्यकतांना एक महत्वपूर्ण आणि विश्वसनीय स्त्रोत म्हणून सौदी अरेबियाच्या महत्वपूर्ण भूमिका विशेष मानतो. आमच्या दृष्टीने वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये विकास साधण्यासाठी विकसनशील देशांना तेलाच्या किंमती स्थिर राहणे विशेषत्वाने महत्वाचे आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एक मोठा तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल योजना तयार करण्यात येत आहे, त्यामध्ये सौदी अरॅमकोची भागीदारी असणार आहे. आम्ही भारताच्या सामरिक पेट्रोलियम भंडारमध्येही अरॅमको भागीदार बनेल अशी आशा आहे.

भारत सरकारने घोषित केलेल्या व्यापक स्मार्ट सिटी योजनेमध्ये सौदी अरेबियाच्या भागीदारीविषयी विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान सहयोगाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये आमच्याकडील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक समाविष्ट आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये आपल्या भारत भेटीच्या काळात क्राउन प्रिन्स यांनी भारतामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये 100 बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

ते म्हणाले की, आम्ही आपल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अधिकाधिक सौदी गुंतवणुकीचे स्वागत करतो. यामध्ये स्मार्ट सिटी कार्यक्रमाचाही समावेश आहे. आम्ही राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा कोषामध्ये गुंतवणूक करण्याची जी सौदीची इच्छा आहे, त्याचेही स्वागत करतो.

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये ऊर्जाव्यतिरिक्त सहयोगासाठी इतर विविध क्षेत्रे आहेत, त्यांचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी या भेटीमध्ये आपण भारत आणि सौदी अरेबियाने विविध क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार करण्याची योजना आहे, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. यामध्ये संरक्षण, सुरक्षा, नवीकरणीय ऊर्जा यासारख्या विविध योजनांचा सहभाग आहे.

पंतप्रधान म्हणाले कर, अन्य प्रमुख गोष्टींबरोबरच सौदी अरेबियामध्ये आता रूपे कार्डचा प्रारंभ करण्यात येणार आहे. यामुळे इथं वास्तव्य करीत असलेल्या भारतीय समुदायाला बिलं देताना सोईचं ठरेल. त्याबरोबरच ई-मायग्रेट आणि ई-तौतिक पोर्टल्स यांचे एकीकरण होणार आहे. यामुळे सौदी अरेबियामधल्या भारतीय कामगारांना प्रवास करणे आता अधिक सोईचे ठरणार आहे. आमच्या अकादमींमध्ये राजनैतिक अधिकारी वर्गाच्या प्रशिक्षणाविषयीसुद्धा एक सामंजस्य करार प्रस्तावित आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, विश्वस्तरीय क्षमता निर्माण केंद्र म्हणून भारताची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. आणि सौदी अरेबियाच्या युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण प्रदान करण्याचे काम भारताने खूप आधीपासूनच सुरू केले आहे. आम्ही अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एकमेकांना सहाकार्य करण्यासाठी विचार-विनिमय करणार आहोत.

सौदी अरेबियामध्ये भारतीय नागरिकांना संदेश देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जवळपास 2.6 मिलियन भारतीयांनी सौदी अरेबियाला आपले दुसरे निवासस्थान बनवले आहे. त्याच्याजोडीलाच देशाच्या वृद्धीमध्ये आणि विकासामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. अनेक भारतीय दरवर्षी हज आणि उमरा तीर्थयात्रा तसेच व्यापारी उद्देशाने सौदी अरेबियाचा दौरा करतात.

सौदी अरेबियातल्या भारतीय नागरिकांना संदेश देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही लोकांनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि कटिबद्धतेने समग्र व्दिपक्षीय संबंधांचा महत्वपूर्ण मार्ग प्रशस्त करण्यासाठी मदत केली आहे, याचा भारताला अभिमान वाटतो.

सौदी अरेबियाबरोबरचे आमचे संबंध एक मजबूत शक्तीच्या रूपानं समोर येतील, असा मला विश्वास आहे. दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक संबंधांना अधिक दृढ बनवण्यासाठी अनेक दशकांपासून लोकांचा थेट लोकांशी झालेला संपर्क आणि सर्वांचे योगदान कारणीभूत आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शाह सलमान यांच्याबरोबर व्दिपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच क्राउन प्रिन्सबरोबर प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान तिस-या ‘फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह’ (एफआयआय)च्या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. मध्य पूर्वेकडील हे सर्वात व्यापक आणि महत्वपूर्ण आर्थिक व्यासपीठ मानले जाते.

पंतप्रधान मोदी या भेटीमध्ये दोन्ही देशांच्या दरम्यान सुरक्षा आणि रणनीतिक सहकार्य, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, नवीकरणीय ऊर्जा, गुंतवणूक, व्यापार आणि वाणिज्य, लघू आणि मध्यम उद्योग, कृषी, नागरी उड्डाण, पायाभूत सुविधा, घरकूल, वित्तीय सेवा, प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण, संस्कृती तसेच लोकांचा लोकांशी थेट संपर्क यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्दिपक्षीय संबंध अधिक मजबूत तसेच व्यापक करतील अशी आशा आहे. दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रांशी संबंधित डझनभर सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्या जाण्याची शक्यता आहे.

मोदी यांच्या या भेटीचा सर्वात महत्वपूर्ण प्रभावामध्ये एक म्हणजे दोन्ही देशांमध्ये रणनीतिक सामंजस्य परिषद (एसपीसी) स्थापन होईल अशी अपेक्षा आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि चीन यांच्यानंतर आता सौदी अरेबियाबरोबर रणनीतिक सामंजस्य परिषद (एसपीसी)स्थापन करणारा भारत चौथा देश असेल.

एसपीसीमध्ये दोन समानांतर माध्यमांव्दारे दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राजनीतिक, सुरक्षा, संस्कृती आणि समाज तसेच अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक यावर भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुढची वाटचाल करण्यात येईल.

सौदी अरेबियाबरोबर भारताच्या संबंधांमध्ये ऊर्जा सुरक्षा हे सर्वात प्रमुख क्षेत्रांपैकी एक आहे. भारत आपल्या दीर्घकालीन ऊर्जा पूर्तीसाठी एक विश्वसनीय स्त्रोत म्हणून सौदी अरेबियाच्या महत्वपूर्ण भूमिकेचे कौतुक करत आहे. भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सौदी अरेबियाकडून 18 टक्के तेलाची गरज भागवली जाते, आणि द्रवरूप पेट्रोलियम गॅसच्या गरजेपैकी 30 टक्के गरज सौदी अरेबियाकडून पूर्ण होते. दोन्ही देश या क्षेत्रामध्ये खरेदीदार- विक्रेता म्हणून परस्परांना पूरक आणि परस्परांवर निर्भर असल्यामुळे उभय देशांमध्ये व्यापक रणनीतिक सामंजस्य करण्यासाठी इच्छुक आहेत.

 

S.Thakur/S.Bedekar/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1589574) आगंतुक पटल : 364
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English