पंतप्रधान कार्यालय

ग्लोबल गोलकीपर पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 25 SEP 2019 9:57PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2019

 

श्री आणि श्रीमती गेट्स,

मान्यवर,

मित्रहो,

आपणा सर्वांनी जो सन्मान दिला आहे त्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. हा सन्मान माझा नव्हे तर कोट्यवधी भारतीयांचा आहे ज्यांनी स्वच्छ भारत हा संकल्प साध्य करताना याला आपल्या जीवनाचा भाग केला. बिल आणि  मिलिंडा गेट फौंडेशन कडून पुरस्कार मिळवणे माझ्यासाठी दोन कारणांनी विशेष आहे. पहिले म्हणजे स्वच्छ भारत अभियानात महत्वाचा भागीदार म्हणून हे फौंडेशन भारतात दूरवर काम करत आहे.  दुसरे म्हणजे बिल आणि  मिलिंड गेट्स, वैयक्तिक जीवनात यशस्वी झाल्यानंतर ज्याप्रकारे  सामजिक जीवनात ते योगदान देत आहेत ते प्रशंसनीय आहे.

 

मित्रहो,

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षात मला हा पुरस्कार प्राप्त होणे हे माझ्यासाठी व्यक्तिगत रूपानेही महत्वाचे आहे. 130 कोटी भारतीयांची जनशक्ती एखादा संकल्प पूर्ण करण्यासाठी एकवटली तर कोणतेही आव्हान सहज पार होते याची ही प्रचीती आहे. पाच वर्षापूर्वी स्वच्छ भारत अभियानाचा  मी उच्चार केला तेव्हाच्या प्रतिक्रिया मला आठवतात. आजही अनेकदा मला उपहासात्मक प्रतिक्रिया मिळतात. मात्र एक लक्ष्य घेऊन, एक उद्दिष्ट ठेवून, पूर्ण निष्ठेने काम करताना अशा प्रतिक्रियांना महत्व राहत नाही. माझ्यासाठी महत्वाचे आहे  ते  आपला देश स्वच्छ करण्यासाठी 130 कोटी भारतीय एकजूट होण्याला. माझ्यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे 130 कोटी भारतीयांमधे स्वच्छतेसाठी एक  विचार विकसित होणे. माझ्यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे स्वच्छ भारतासाठी 130 कोटी भारतीयानी केलेला प्रत्येक प्रयत्न. म्हणूनच मी हा सन्मान भारत वासियांना समर्पित करतो, ज्यांनी स्वच्छ भारत अभियानाला एका जन चळवळीचे स्वरूप दिले, ज्यांनी वैयक्तिक जीवनात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला सुरवात केली. गावात स्वच्छतागृह  बांधण्यासाठी आपल्या बकऱ्या  विकणारी वृध्द महिला, स्वच्छतागृहे   बांधण्यासाठी आपले संपूर्ण निवृत्तीवेतन दान करणारे  निवृत्त शिक्षक, घरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी मंगळसूत्रही विकणारी  महिला या सर्वांची आठवण मला  इथे करावीशी वाटते. 

 

बंधू-भगिनींनो

सध्याच्या काळात कोणत्याही देशात असे अभियान असल्याचे ऐकिवात नाही. हे अभियान सरकारने सुरु केले असले तरी त्याचे नेतृत्व  जनतेने केले. परिणामी गेल्या पाच वर्षात विक्रमी 11 कोटी पेक्षा अधिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली. याचा परिणाम म्हणजे 2014 च्या आधी ग्रामीण स्वच्छतेची व्यापकता 40 टक्क्यापेक्षाही कमी होती ती वाढून आता  जवळ-जवळ 100 टक्के झाली आहे. विचारात घ्या, स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात

40 टक्क्यापेक्षाही कमी आणि सुमारे 5 वर्षात साधारणतः 100 टक्के. स्वच्छ भारत अभियानाचे यश हे या आकडेवारी पेक्षा अधिक आहे असे मी मानतो. या अभियानाने सर्वात जास्त लाभ कोणाला मिळाला असेल तर देशातल्या गरिबांना, देशातली महिलांना. संपन्न व्यक्तींकडे दोन-दोन, तीन-तीन स्वच्छतागृहे असणे मोठी बाब नाही. स्वच्छतागृह नसल्यामुळे काय गैरसोय होते हे तेच जाणतात जे या सुविधेपासून वंचित असतात. स्वच्छतागृह नसणे ही विशेषकरून महिलांच्या जीवनातली  तर सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक समस्या होती. त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी स्वच्छतागृह महत्वाचे होते. ही सर्व परिस्थिती जाणूनही, घरात स्वच्छतागृह बांधणे किती महत्वाचे आहे, हा विचारच नव्हता. सकाळपासून संपूर्ण दिवस महिला संध्याकाळ होण्याची वाट बघत असत. उघड्यावर शौचामुळे होणाऱ्या रोगराई बरोबरच या वाट बघण्यामुळे त्यांना आणखी आजारांना सामोरे जावे लागत असे.

स्वच्छतागृह नसल्यामुळे अनेक मुलींना आपले शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत असे. मुलीना शिक्षणाची आस तर होती मात्र स्वच्छतागृह नसल्यामुळे  त्यांना शाळा सोडून घरी बसावे लागत असे. देशातल्या गरीब महिलांना, मुलीना या स्थितीतून बाहेर काढणे ही आमच्या सरकारची जबाबदारी होती आणि आम्ही ती ताकदीने पेलली, प्रामाणिकपणे निभावली. स्वच्छ भारत अभियान आज लाखो आयुष्य वाचवण्याचे माध्यम ठरले आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे 3 लाख आयुष्ये वाचण्याची शक्यता असल्याचा जागतिक आरोग्य संस्थेचा अहवाल आहे.  त्याचप्रमाणे  गावात राहणाऱ्या  आणि घरात स्वच्छतागृह बांधणाऱ्या  कुटुंबाची कमीत कमी 50 हजार रुपयांची बचत होत असल्याचे अनुमान युनिसेफने काढले आहे. बिल आणि मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या एका अहवालातही नमूद करण्यात आले आहे की  भारतात,ग्रामीण स्वच्छतेत वाढ झाल्याने बालकांच्या हृदयरोगाचे प्रमाण घटले आहे आणि  स्त्रियांच्या बॉडी मास निर्देशांकात सुधारणा झाली आहे. स्वच्छतेचे इतके फायदे असल्यामुळेच गांधीजीनी आपण स्वच्छतेला, स्वातंत्र्यापेक्षाही जास्त महत्वाचे  मानत असल्याचे म्हटले होते. महात्मा गांधीनी स्वच्छतेचे जे स्वप्न पहिले होते ते साकारले जात असल्याचा मला आनंद आहे.एखादे गाव संपूर्णपणे स्वच्छ असेल तेव्हाच ते आदर्श गाव बनेल असे गांधीजी म्हणत असत.  आज आपण गावच नव्हे तर संपूर्ण देश स्वच्छतेत आदर्श घडवण्याच्या दिशेने पुढे जात आहोत.

 

बंधू- भगिनींनो,

संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपासूनच, लोकांचे जीवन सुकर करण्याचे  त्यांचे उद्दिष्ट  राहिले आहे. स्वच्छ भारत अभियानाने,  भारतातल्या जनतेचे जीवन अधिक सुकर करण्याबरोबरच त्यांची प्रतिष्ठा जपली आहे त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.

युनिसेफच्या आणखी एका अभ्यास अहवालाचे स्मरण मी आपणाला देऊ इच्छितो. या अहवालातून स्पष्ट झाले आहे की, गेल्या पाच वर्षात भूगर्भातल्या पाण्याची गुणवत्ता खूप सुधारली आहे, यात स्वच्छ भारत अभियानाचे मोठे योगदान आहे असे मी मानतो. स्वच्छ भारत अभियानाचा आणखी एक प्रभाव आहे ज्याची फारशी चर्चा झाली नाही. या अभियानाद्वारे 11 कोटीपेक्षा जास्त स्वच्छतागृहे बांधली गेली त्यामुळे ग्रामीण स्तरावर आर्थिक घडामोडींचे एक नवे द्वार खुले झाले. स्वच्छतागृहे बांधण्यासाठी लागणाऱ्या  कच्च्या  मालामुळे, राणी मिस्त्रीप्रमाणे महिलांना मिळणाऱ्या  कामामुळे, प्राथमिक स्तरावर गरिबांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.

 

मित्रहो,

लोकशाहीचा साधा अर्थ आहे की व्यवस्था आणि  योजनांच्या केंद्रस्थानी जनता म्हणजे लोक असले पाहिजेत. जनतेच्या आवश्यकता केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखली जातात तीच दृढ लोकशाही असते. जनतेच्या अपेक्षा आणि आवश्यकता, सरकारची धोरणे आणि निर्णय एकाच स्तरावर असतात तेव्हा जनता स्वतःच योजना यशस्वी करते. स्वच्छ भारत अभियानात लोकशाहीच्या या शक्तीची झलक आहे. स्वच्छ भारत अभियानाची यशस्वीता म्हणजे  संविधानाची एक व्यवस्था  जागृत राखण्याचे उदाहरण आहे. 

 

मित्रहो,

भारताने दशकांपासून केवळ संविधानात्मक संघीयवाद पाहिला. आमच्या सरकारने त्याचे  सहकार्यात्मक संघीयवाद असे स्वरूप  करण्याचा प्रयत्न केला आणि काळाबरोबर आम्ही आता स्पर्धात्मक  सहकार्यात्मक संघीयवादाच्या मार्गावर चाललो आहोत. या अभियानात भारताच्या  वेगवेगळ्या राज्यांनी ज्या हिरीरीने भाग घेतला, लोकांना जागरूक केले, स्वच्छतागृह निर्मितीसाठी काम केले ते प्रशंसनीय आहे. या अभियानादरम्यान केंद्र सरकारने स्वच्छताविषयक प्रत्येक बाबतीत, राज्य सरकारांना भागीदार केले. प्रशिक्षणापासून ते आर्थिक पाठबळापर्यंत कोणत्याच बाबतीत उणीव ठेवली नाही. राज्यांनी आपल्या पद्धतीने राज्य स्तरावर स्वच्छ भारत अभियानाला गती द्यावी, त्याच्याशी  संबंधित संकल्प पूर्ण करावेत यासाठी राज्यांना सर्वतोपरी  सहाय्य करण्यात आले. स्वच्छता सर्वेक्षणाच्या माध्यमातून, राज्य स्वच्छता क्रमवारीत सर्वोच्च स्थान कोण मिळवते यासाठी राज्या-राज्यात चढाओढ सुरु आहे याचा मला आनंद आहे.

 

मित्रहो आणि मान्यवर,

जगासाठी भारताच्या या योगदानाचा मला यासाठीही आनंद आहे कारण आम्ही हे विश्व म्हणजे एक कुटुंबच मानतो.  हजारो वर्षापासुन आम्हाला शिकवण देण्यात आली आहे की  ‘उदार चरितानाम तु वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजे महान विचार आणि विशाल अंतकरण असलेल्यांसाठी संपूर्ण  पृथ्वी म्हणजे एक कुटुंब आहे. स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्यात भारत दृढ भूमिका निभावू इच्छितो. आमचा अनुभव,नैपुण्य आम्ही दुसऱ्या देशांना देऊ इच्छितो. भारत, स्वच्छतेच्या बाबतीतले आपले लक्ष्य साध्य करण्याच्या जवळ पोहोचला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या मोठ्या अभियानावरही भारत  वेगाने काम करत आहे. फिट इंडिया अभियानाच्या  माध्यमातून तंदुरुस्त आणि प्रतिबंधात्मक आरोग्य पद्धतीला प्रोत्साहन  देण्याचे अभियान सुरु  आहे. 2025 पर्यंत भारतातून क्षयाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. सार्वत्रिक लसीकरणाच्या दिशेनेही आम्ही झपाट्याने वाटचाल करत आहोत. राष्ट्रीय पोषण अभियानाच्या माध्यमातून अनिमिया सारख्या समस्यांवर भारत लवकरच मात करेल. जल जीवन अभियानाद्वारे जल संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे यामुळे प्रत्येक भारतीयाला आवश्यक आणि स्वच्छ पाणी मिळेल.

एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिक पासून 2022 पर्यंत मुक्त  होण्यासाठी भारताने अभियान हाती घेतले आहे. आज आपल्याशी संवाद साधताना भारताच्या अनेक भागात हे प्लास्टिक गोळा करण्याचे काम सुरु आहे. अशा अनेक लोक चळवळी भारतात सुरु आहेत. 1.3 अब्ज भारतीयांच्या सामर्थ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे इतर अभियानेही यशस्वी ठरतील याचा मला विश्वास आहे. या अपेक्षेसह बिल आणि मिलिंडा गेट्स  फाउंडेशनचे सर्व सहकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित मित्र,या  सर्वाना पुन्हा धन्यवाद देऊन विराम घेतो.

खूप-खूप धन्यवाद!

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1587060) Visitor Counter : 99


Read this release in: English