पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सार्वत्रिक आरोग्य सुविधांविषयी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2019 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2019
नमस्कार, अध्यक्ष महोदय,
जनतेच्या कल्याणापासून जगाच्या कल्याणाची सुरुवात होते आणि यामध्ये आरोग्य हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच भारतासाठी हा अतिशय प्राधान्यक्रमाचा विषय आहे. आम्ही यासाठी चार स्तंभांच्या माध्यमातून एका समग्र दृष्टीकोनासह काम करत आहोत. यापैकी पहिला स्तंभ आहे आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय. आम्ही योगसाधना, आयुर्वेद आणि तंदुरुस्ती यांवर विशेष भर दिला आहे. आम्ही 1.25 लाखांहून जास्त आरोग्य केंद्रांची उभारणी करत आहोत. यामुळे मधुमेह, रक्तदाब, वैफल्य यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण मिळवण्यामध्ये मदत मिळत आहे. ई-सिगारेटची वाढत चाललेली लोकप्रियता चिंतेची बाब आहे. या अतिशय गंभीर धोक्यापासून तरुण पिढीचा बचाव करण्यासाठी भारताने ई- सिगारेटवर बंदी घातली आहे. आमच्या स्वच्छ भारत मोहिमेने लक्षावधी जीव वाचवण्यात योगदान दिले आहे. लसीकरणावर देखील आम्ही विशेष भर दिला आहे. नव्या लसींचा समावेश करून आम्ही दुर्गम भागात आणखी चांगल्या पद्धतीने या लसींची उपलब्धता वाढवली आहे.
दुसरा स्तंभ आहे परवडण्याजोग्या आरोग्य सुविधा. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना सुरू झाली असून, या योजनेंतर्गत 50 कोटी गरिबांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जात आहे. गेल्या वर्षी सुमारे साडेचार कोटी लोकांना याचा लाभ झाला आहे. आम्ही 800 अत्यावश्यक औषधे उपलब्ध असलेली विशेष औषध दुकाने सुरू केली आहेत. या ठिकाणी ही औषधे परवडण्याजोग्या दरात दिली जातात. हृदयरोगाच्या शस्त्रक्रियांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टेंटच्या किंमती आम्ही 80 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. तसेच गुडघ्याच्या प्रत्यारोपणाच्या खर्चातही 50 ते 70 टक्के कपात केली आहे. मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या लक्षावधी लोकांना मोफत डायलिसीस सुविधा दिली जात आहे.
तिसरा स्तंभ म्हणजे पुरवठ्यात सुधारणा असून त्यासाठी आम्ही भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी ऐतिहासिक पावले उचलली आहेत. आम्ही या क्षेत्रात आमूलाग्र बदल केले आहेत.
एका मोहिमेच्या स्वरुपात हस्तक्षेप हा चौथा स्तंभ आहे. जर माता आणि बालक निरोगी असले तर एका पूर्णपणे निरोगी समाजाचा पाया घालता येईल आणि म्हणूनच आम्ही राष्ट्रीय पोषण मोहिमेसारखे उपक्रम एखाद्या मोहिमेच्या स्वरुपात सुरू केले आहेत. 2030 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आहे. 2025 पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि आम्ही हे देखील उद्दिष्ट साध्य करू असा मला ठाम विश्वास आहे.
वायू प्रदूषणामुळे आणि प्राण्यांकडून मानवामध्ये संक्रमित होणाऱ्या आजारांविरोधातही आम्ही एक मोहीम सुरू केली आहे.
महोदय,
आजारापासून मुक्ती यापुरतेच आरोग्य मर्यादित नसून, निरोगी आयुष्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न करणे ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे.
भारताचे हे प्रयत्न केवळ भारताच्या सीमांपुरते मर्यादित नाहीत. आम्ही टेलि मेडिसीनच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये विशेषतः आफ्रिकेतील देशांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य देत आहोत आणि आमचे हे प्रयत्न सुरूच राहतील. सर्व विकसनशील देशांमध्ये आम्ही आमचा अनुभव आणि आमच्या क्षमता उपलब्ध करून देत आहोत.
महोदय, ‘सर्वे भवंतु सुखिना. सर्वे संतु निरामया’ म्हणजेच सर्वांसाठी आनंदी आणि निरोगी आयुष्याची कामना करत मी माझ्या भाषणाचा समारोप करतो.
धन्यवाद!!
B.Gokhale/S.Patil/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1586686)
आगंतुक पटल : 102
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English