पंतप्रधान कार्यालय

न्यूयॉर्क इथे ब्लूमबर्ग बिझनेस फोरम इथे पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 25 SEP 2019 7:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2019

 

मित्रहो,

जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे महत्वाचे केंद्र असलेल्या न्यूयॉर्कमधे आपणा सर्व दिग्गजांसमवेत उपस्थित राहणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरमने, भारताच्या भावना, आशा-आकांक्षा, अपेक्षा, भारताची यशोगाथा, भारताच्या भविष्याबाबत माझे विचार मांडण्याची संधी दिली यासाठी मी त्यांचा खूप-खूप आभारी आहे.

मित्रहो,

पाच वर्षातले आपले काम घेऊन जनतेसमोर जाऊन, पहिल्यापेक्षा जास्त संख्येने निवडून आलेले सरकार आपण भारतात पाहत आहात. आपण सर्व व्यापारविषयक भावनांविषयी अनेकदा बोलत असता. या निवडणुकीत 130 कोटी भारतीयांनी आपल्या भावना दर्शवल्याच आणि त्याचबरोबर निर्णयही दिला की विकासालाच आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. इथे उपस्थित व्यापार विश्वातले नेते जाणतात की, विकासाच्या बाजूने जनतेने दिलेला भक्कम कौल म्हणजे भारतातल्या नव्या संधींची घोषणाच आहे.

जे सरकार, व्यापारासाठी वातावरण अधिक पोषक करण्यासाठी, मोठ-मोठे निर्णय घ्यायला जराही कचरत नाही अशा या सरकारच्या समवेत आज भारतातली जनता उभी  आहे. आज भारतात असे सरकार आहे, जे व्यापार जगताचा आणि संपत्ती निर्मितीचा सन्मान करते.

मित्रहो,

आपल्याला माहित असेल की काही दिवसांपूर्वीच आम्ही कॉर्पोरेट कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने हे क्रांतिकारक पाऊल आहे, या निर्णयानंतर व्यापार जगतातल्या ज्या लोकांशी संवाद झाला ते सर्व जण हे पाऊल ऐतिहासिक असल्याचे मानतात. गुंतवणूक वाढवण्यासाठी एकापाठोपाठ एक निर्णय सरकारने घेतले आहेत. विकासात अडथळा ठरणारे 50 पेक्षा जास्त जुने कायदे आम्ही रद्दबातल केले.

मी आपणा सर्वांना स्मरण करून देतो की आमचे नवे सरकार सत्तेवर येऊन तीन-चार महिनेच होत आहेत. ही तर केवळ सुरवात आहे असे मी या मंचावरून आपणा सर्वाना सांगू इच्छितो. यापेक्षा अधिक काम करण्यासाठी अजून पुढे बराच काळ बाकी आहे. या वाटचालीत भारतासमवेत भागीदारी करण्यासाठी संपूर्ण जगातल्या व्यापार विश्वासाठी ही सुवर्ण संधी आहे.

मित्रहो,

आज भारत अशा आगळ्या स्थानावर आहे जिथे, जलद विकासामुळे विविधांगी मागण्या पूर्ण करण्यासाठी भारत सक्षम आहे.आमची जनता झपाट्याने दारिद्रय निर्मुलन करत असून आर्थिक उत्कर्षाकडे वाटचाल करत आहे. म्हणूनच आपल्याला व्यापक बाजारपेठेत गुंतवणूक करायची असेल तर भारतात अवश्य या. आकांक्षा बाळगणारा आणि जागतिक दृष्टीकोन असणारा आमचा मध्यमवर्ग विस्तीर्ण आहे. नवनव्या बाबी आणि आधुनिक कल यांची जिथे प्रशंसा केली जाते अशा  बाजारपेठेत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर भारतात या. आमचा युवक हा ऐप इकोनॉमीचा मोठा वापर करणारा आहे. खाद्यान्न ते वाहतूक, चित्रपट अशा सर्वच बाबीत  स्टार्ट अपनी जोर धरला आहे. स्टार्ट अपसह असलेल्या मोठ्या  बाजारपेठेत गुंतवणूक करायची असेल तर भारतात या. आमची पायाभूत संरचना निर्मिती अभूतपूर्व वेगाने विस्तारत आहे. महामार्ग ते मेट्रो, रेल्वे ते बंदरे, विमानतळ ते लॉंजिस्टिक, प्रत्येक क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि प्रचंड क्षमता पाहायला मिळत आहे. आपल्याला जगातल्या सर्वात मोठ्या पायाभूत परिसंस्थेत गुंतवणूक करायची असेल तर भारतात या. आम्ही आमच्या शहरांचे  झपाट्याने आधुनिकीकरण करत आहोत, अद्ययावत तंत्रज्ञानाने आणि नागरिक केन्द्री पायाभूत संरचनेने ही शहरे युक्त करत आहोत.आपल्याला नागरीकरणात गुंतवणूक करायची असेल तर भारतात या. आमचे संरक्षण क्षेत्र आम्ही गुंतवणुकीसाठी पूर्वीपेक्षा अधिक खुले केले आहे. आपल्याला मेक इन इंडियात सहभागी होऊन भारतासाठी आणि जगासाठीही निर्मिती करायची असेल तर भारतात या.

मित्रहो,

पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी आमच्या सरकारने जितकी गुंतवणूक केली तेव्हढी  या पूर्वी कधी झाली नव्हती. येत्या काळात आम्ही 100 लाख कोटी रुपये म्हणजे सुमारे 1.3 ट्रीलीयन डॉलर्स आधुनिक पायाभूत संरचनेवर खर्च करणार आहोत. याशिवाय भारतात  सामाजिक पायाभूत संरचनेवरही लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. भारताच्या यशोगाथेत, प्रमाण आणि दर्जात्मक झेप घेण्याचा आराखडा वास्तवात उतरला आहे. भारताने आता एक मोठे लक्ष्य ठेवले आहे, देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रीलीयन डॉलर्स करण्याचे.

मित्रहो,

2014 मधे आम्ही सरकार स्थापन केले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था सुमारे 2  ट्रीलीयन डॉलर्स होती. गेल्या पाच वर्षात आम्ही  यात साधारणतः एक ट्रीलीयन डॉलर्स ची भर घातली. आता आम्ही 5 ट्रीलीयन डॉलर्सचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सिद्ध झालो आहोत.

मित्रहो,

हे मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमच्याकडे क्षमताही आहे, धैर्यही आहे आणि परिस्थितीही अनुकूल आहे. भारताच्या यशोगाथेत चार बाबी महत्वाच्या आहेत, जगात त्या एकत्र एकवटलेल्या पाहायला मिळणे कठीणच आहे. या चार गोष्टी आहेत, लोकशाही, लोकसंख्या, मागणी आणि निर्णयक्षमता. पहिल्या गोष्टीविषयी बोलायचे झाल्यास भारतात असे राजकीय स्थैर्य, अशी संधी अनेक दशकानंतर आली आहे. जेव्हा लोकशाही, राजकीय स्थैर्य, धोरणांचा अंदाज बांधणे आणि स्वतंत्र न्याय यंत्रणा अस्तित्वात असते तेव्हा गुंतवणुकीची सुरक्षितता आणि वृद्धी यांचा विश्वास आपोआप प्राप्त होतो. 

मित्रहो,

या वृद्धीला बळ मिळते ते भारताकडे असलेल्या लोकसंख्येचे आणि उत्साही, प्रतिभावान युवाशक्तीचे. आज अभियांत्रिकी शिक्षणाचा जगातला सर्वात मोठा पाया असलेल्या आणि संशोधन आणि विकास सुविधा सर्वात मजबूत असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. नाविन्यता आणि कल्पकता यासाठी भारतीय युवकांना जे प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे अमेरिका आणि चीन नंतर भारताने स्थान पटकावले आहे.

मित्रहो,

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मागणी. भारताची मोठी लोकसंख्या जस-जशी आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहे, तस-तशी त्यांची क्रय शक्ती वाढत आहे  आणि मागणीही वाढत आहे. उदाहरणार्थ, गेल्या काही वर्षात हवाई प्रवासी वाहतूक वृद्धी दोन आकडी आहे. ज्यामुळे, आज भारत जगातली हवाई क्षेत्रातली तिसरी बाजारपेठ ठरली आहे.

मित्रहो,

लोकशाही, लोकसंख्या आणि मागणी यांच्या बरोबर भारताला विशेष ठरवणारी एक बाब आहे ती म्हणजे निर्णय क्षमता. वैविध्य आणि संघराज्य असलेली संघीय लोकशाही व्यवस्था असून गेल्या पाच वर्षात भारतासाठी एकसंध, समावेशक आणि पारदर्शक व्यवस्था  निर्माण करण्यावर  भर देण्यात आला.

 जिथे करांचे जाळे होते तिथे आता वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने अप्रत्यक्ष कर धोरण, देशाच्या संपूर्ण व्यापार संस्कृतीचा भाग बनले आहे.

आयपीआर, नाम मुद्रा धोरण मजबूत करण्यासाठीही आम्ही मोठे काम केले. याचप्रमाणे, दिवाळखोरी आणि नादारी संदर्भात आम्ही कायदा केला.

कर विषयक कायदे आणि इक्विटी गुंतवणुकीवरचा  कर, जागतिक कर धोरणाशी सुसंगत राखण्यासाठी आम्ही अखंड सुधारणा करत राहू.

 कर सुधारणे व्यतिरिक्त, जगातले सर्वात मोठे वित्तीय समावेशन भारतात अतिशय कमी वेळेत झाले आहे. सुमारे 370 दशलक्ष लोकांना, गेल्या 4-5 वर्षात प्रथमच बँकिंग क्षेत्राशी जोडण्यात  आले आहे. आज भारतात, जवळ-जवळ, प्रत्येक नागरिकाकडे, युनिक आय डी अर्थात विशेष ओळखपत्र आहे आणि बँक खातेही आहे. यामुळे नियोजित सेवा प्रदान करण्यात गती आली आहे, गळती बंद झाली असून  पारदर्शकता अनेक पटीने वाढली आहे.

मित्रहो,

नव भारतात आम्ही नियमन आणि परवाना विकेंद्रीकरण तसेच अडथळे दूर करण्याची मोहीम सुरु केली आहे. अशा सुधारणांमुळे जागतिक प्रत्येक क्रमवारीत भारताची कामगिरी उंचावली आहे. लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकात दहा स्थानाची झेप, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात 13 स्थानांनी सुधारणा, जागतिक नाविन्यता निर्देशांकात 24 स्थानाची सुधारणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशांकात 65  स्थानाची घेतलेली भरारी, अभूतपूर्व आहे, असामान्य आहे. काही काम केल्यावाचून, सुधारणा केल्यावाचून ही क्रमवारी सुधारत नाही हे आपण सर्वजण जाणताच. आम्ही तळापर्यंत जाऊन व्यवस्था सुधारण्यासाठी काम केले, नियम सुलभ केले. आपल्याला एक उदाहरण देतो, पूर्वी उद्योगांना वीज जोडणी घ्यायची असेल तर अनेक वर्षे लागत, आता काही दिवसातच वीज जोडणी मिळते. याच प्रमाणे कंपनी नोदणी करण्यासाठी, पूर्वी अनेक आठवडे लागत आता काही तासातच कंपनीची नोंदणी होते. गेल्या पाच वर्षात काय परिवर्तन झाले याचे उदाहरण मी  देतो. गेल्या पाच वर्षात भारतात, 286 अब्ज थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. ही रक्कम, गेल्या 20 वर्षात भारतात झालेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या निम्मी आहे.

अमेरिकेने गेल्या दशकांत भारतात जितकी थेट परकीय गुंतवणूक केली आहे त्याच्या 50 टक्के थेट परकीय गुंतवणूक केवळ गेल्या 4 वर्षात केली आहे. संपूर्ण जगात थेट परकीय गुंतवणूकीचा स्तर कमी होत आहे अशा काळातली ही आकडेवारी आहे. यामध्येही एक महत्वाची बाब आहे, सुमारे 90 टक्के थेट परकीय गुंतवणूक ऑटोमेटिक रूट द्वारे झाली आहे  तर 40 टक्के ग्रीनफिल्ड गुंतवणूक आहे.  म्हणजेच गुंतवणुकदारांचा भारतावरचा विश्वास वाढला आहे आणि तो दीर्घकाळासाठी आहे.

मित्रहो,

ब्लूमबर्गचा अहवाल, भारतात होत असलेल्या बदलांची प्रचीती देत आहे. ब्लूमबर्गच्या नेशन ब्रान्ड ट्राकर 2018 च्या सर्वेक्षणात, गुंतवणुकीच्या दृष्टीने, भारताला, आशियात प्रथम स्थान देण्यात आले आहे. 10 पैकी 7 मानकात- राजकीय स्थैर्य, चलन स्थैर्य, उच्च दर्जाचे उत्पादन, भ्रष्टाचार विरोधी, कमी उत्पादन खर्च, मोक्याचे स्थान, आयपीआरचा आदर यामध्ये भारत सर्वोच्च स्थानावर आहे. इतर मानकातही भारत वरच्या स्थानावर आहे.

मित्रहो,

तुमच्या इच्छा-आकांक्षा आणि आमची स्वप्ने परस्परांशी मिळतीजुळती आहेत. तुमचे तंत्रज्ञान आणि आमची प्रतिभा यांचा संगम, जगात बदल घडवू शकतो, तुमची व्याप्ती आणि आमचे कौशल्य, जागतिक आर्थिक विकासाला गती  देऊ शकते. विवेकपूर्ण पद्धती आणि  व्यावहारिक मन  यामुळे व्यवस्थापनाचा नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो. तुमचा तर्कसंगत मार्ग आणि आमची मानवी मुल्ये यामुळे जग ज्याच्या शोधात  आहे तो मार्ग जगाला दाखवता येऊ शकतो. यात काही अंतर राहले तर मी व्यक्तीशः एखाद्या पुलाप्रमाणे काम करेन. 

धन्यवाद.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 


(Release ID: 1586599) Visitor Counter : 74


Read this release in: English