पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते ह्युस्टन इथे श्रीसिद्धी विनायक मंदिराचे उद्घाटन
शाश्वत गांधी संग्रहालयाचेही भूमीपूजन
Posted On:
22 SEP 2019 7:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2019
अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातल्या ह्युस्टन इथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीसिद्धी विनायक मंदिर आणि गुजराती समाज भवनाचे उद्घाटन झाले. टेक्सास भारतीय मंचाद्वारे तिथल्या भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते सहभागी झाले होते.

शाश्वत गांधी संग्रहालयाचे भूमीपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते आज झाले.
या उद्घाटनानंतर बोलतांना पंतप्रधानांनी हाऊडी मोदी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनतेचे आभार मानले. भारत आणि अमेरिका दरम्यानचे संबंध दृढ करुन एका उज्ज्वल भविष्याची पायाभरणी तुम्ही सर्वांनी केली आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार असे पंतप्रधान म्हणाले.
शाश्वत गांधी संग्रहालयाविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, “ह्युस्टन शहरातले हे अनमोल सांस्कृतिक पर्यटन स्थळ होईल. हे संग्रहालय उभारण्याच्या कामात मीही काही काळ सहभागी झालो होतो. या संग्रहालयामुळे महात्मा गांधींचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यास नक्कीच मदत होईल”, असे पंतप्रधान म्हणाले.
दरवर्षी किमान 5 अमेरिकन कुटुंब भारतात पर्यटनासाठी येतील, यासाठी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मोदींनी केले. भारतीयांनी आपल्या मातृभाषेशी असलेले नाते कायम ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1586203)
Visitor Counter : 93