पंतप्रधान कार्यालय

स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांचा ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मान

Posted On: 25 SEP 2019 1:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2019

 

अमेरिकेतल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान काल पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

स्वच्छ भारत अभियान जनचळवळ म्हणून यशस्वी करणाऱ्या भारतीय जनतेला पंतप्रधानांनी हा पुरस्कार समर्पित केला.

स्वच्छ भारत अभियानाचे यश हे भारतीय जनतेचे यश आहे. ही चळवळ त्यांनी जनचळवळ बनवली आणि ती यशस्वी होईल यासाठी प्रयत्न केले, असे पंतप्रधानांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.

महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीवर्षात हा पुरस्कार मिळणे, हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 130 कोटी भारतीयांनी प्रतिज्ञा केली तर कुठलेही आव्हान पेलले जाऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वच्छ भारत अभियान आहे, असे पंतप्रधान म्हणाले. महात्मा गांधी यांच्या स्वच्छ भारत या स्वप्नपूर्तीसाठी भारत लक्षणीय प्रगती करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या 5 वर्षात भारतात 11 कोटींपेक्षा अधिक शौचालये बांधली गेली. या अभियानाचा लाभ गरीब आणि महिलांना झाला, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या अभियानामुळे सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य यात केवळ सुधारणा झाली नाही, तर गावांमधल्या अर्थकारणालाही चालना मिळाली, असे ते म्हणाले.

जागतिक पातळीवर सार्वजनिक स्वच्छतेच्या संदर्भात सुधारणा करायच्या असतील, तर भारत आपले अनुभव आणि कौशल्य यांचे सहकार्य करायला कायम तत्पर असेल, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक स्वच्छतेच्या दिशेने एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

फिट इंडिया मुव्हमेंट आणि जलजीवन मिशन या दोन मोहिमांच्या माध्यमातून भारत प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा क्षेत्रात काम करत आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 


(Release ID: 1586115) Visitor Counter : 272


Read this release in: English