पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’- भारतीय समुदायातील कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण
Posted On:
22 SEP 2019 2:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2019
धन्यवाद, धन्यवाद राष्ट्राध्यक्ष ट्रम्प.
खूप खूप आभार. हाउडी माझ्या मित्रांनो. हे जे दृश्य आहे, हे जे वातावरण आहे ते अनाकलनीय आहे आणि जेव्हा टेक्सासचा विषय निघतो तेव्हा सर्व गोष्टी भव्य, विशाल असणार हे तर अगदी स्वाभाविक आहे. आज टेक्सास चा उत्साह येथे देखील ओसंडून वाहत आहे. या अपार जनसमुहाची उपस्थिती केवळ आकड्या पर्यंत मर्यादित नाही. आपण आज येथे एक नवीन इतिहास निर्माण होताना बघत आहोत आणि एक नवीन ताळमेळ सुद्धा.
एनआरजीची ऊर्जा, भारत आणि अमेरिके दरम्यानची वाढती सहक्रीयता याची साक्षीदार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे येथे येणे, अमेरिकेच्या महान लोकशाहीतील विविध प्रतिनिधी मग ते रिपब्लिकन असोत किंवा डेमोक्रेट त्यांची येथील उपस्थिती आणि भारताची, माझी स्तुती करणे, मला शुभेच्छा देणे, स्टेनी एच होये, सिनेट सदस्य जॉन कॉर्निन आणि इतर मित्रांनी भारताच्या विकासाची जी प्रशंसा केली आहे; ती अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांचा, त्यांचे सामर्थ्य, त्यांच्या कर्तुत्वाचा सन्मान आहे. 130 कोटी भारतीयांचा हा सन्मान आहे.
निवडून आलेल्या प्रतिनिधींव्यतिरिक्त अनेक अमेरिकी मित्र आज या कार्यक्रमाला आले आहेत. मी प्रत्येक भारतीयांतर्फे सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या आयोजकांचे देखील मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोकांनी नोंदणी केली होती परंतु जागेच्या अभावी हजारो लोकं येथे येऊ शकले नाहीत. जे लोकं येथे येऊ शकले नाहीत त्यांची मी व्यक्तीशः क्षमा मागतो.
अगदी दोन दिवसांपूर्वी हवामानात बदल झालेले असताना, कमी वेळात टेक्सास प्रशासनाने जी व्यवस्था केली आहे त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. खूप चांगली व्यवस्था केली आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी हे सिद्ध केले की ह्युस्टन सक्षम आहे.
मित्रांनो, या कार्यक्रमाचे नव हाउडी मोदी आहे.....हाउडी मोदी परंतु मोदी एकटे कोणीच नाही. 130 कोटी भारतीयांच्या आदेशानुसार काम करणारा मी एक साधारण व्यक्ती आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही विचारले हाउडी मोदी तेव्हा माझे मन सांगते ह्याचे उत्तर हेच आहे. भारतात सर्व काही छान आहे, सब चंगा सी
मित्रांनो, आपल्या अमेरिकी मित्रांना आश्चर्य वाटत असेल की मी हे काय बोलत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि माझ्या मित्रांनो मी एवढंच बोललो की सर्व काही छान आहे. आमच्या उदारमतवादी आणि लोकशाही समाजाची खूप मोठी ओळख आहे आमच्या भाषा, शेकडो वर्षांपासून आपल्या देशात शेकडो भाषा, शेकडो बोली भाषांसह अस्तित्वाच्या भावनेसह एकत्र नांदत आहेत, आज करोडो लोकांची मातृभाषा वेगवेगळी आहे आणि मित्रांनो, केवळ भाषाच नाही, आमच्या देशात असलेले वेगवेगळे पंथ, डझनभर संप्रदाय, वेगवेगळ्या पूजा पद्धती, शेकडो पद्धतीच्या प्रादेशिक भोजन पद्धती, वेगवेगळ्या वेशभूषा,वेगवेगळे हवामान या धरतीला अद्भुत बनवतात. विविधतेत एकता, ही आमचा वारसा आहे, ही आमची विशेषता आहे.
भारताची हीच विविधता आपल्या उत्स्फूर्त लोकशाहीचा आधार आहे. ही आमची शक्ती आहे, ही आमची प्रेरणा आहे. आम्ही जिथे जिथे जातो तिथे विविधता, लोकशाहीचे संस्कार सोबत घेऊन जातो. आज या स्टेडियममध्ये बसलेले 50 हजारांहून अधिक भारतीय आपल्या महान परंपरेचे प्रतिनिधी म्हणून येथे उपस्थित आहेत. येथे असे अनेक लोकं उपस्थित आहेत ज्यांनी भारतीय लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवात – 2019 च्या निवडणुकींमध्ये आपले सक्रीय योगदान दिले आहे.
खरंच ही अशी निवडणूक होती जिने भारतीय लोकशाहीचा झेंडा संपूर्ण जगभर फडकवला. या निवडणुकीत 61 कोटींहून अधिक मतदार सहभागी झाले होते. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास दुप्पट. यातील 8 कोटी म्हणजेच 80 दशलक्ष तरुण मतदार होते जे पहिल्यांदाच मतदान करणार होते. भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदा महिला मतदारांची संख्या सर्वाधिक होती आणि यावेळी सर्वाधिक महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.
मित्रांनो, 2019 च्या निवडणुकांनी अजून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक असे सरकार निवडून आले, ज्यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पहिल्याहून अधिक मताधीक्यासह बहुमताने निवडून आले आहे. सरते शेवटी हे का झाले, कोणामुळे झाले. मुळीच नाही, मोदी मुळे नाही घडले, हे सगळं भारतीय नागरिकांमुळे शक्य झाले.
मित्रांनो, धैर्य ही आम्हां भारतीयांची ओळख आहे परंतु आता आम्ही देशाच्या विकासासाठी, 21 व्या शतकात देशाला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी अधीर आहोत. आज भारतातील सर्वाधिक चर्चित शब्द आहे विकास. सबका साथ- सबका विकास हा आज भारताचा मंत्र आहे, लोकसहभाग हे भारताचे सर्वात मोठे धोरण आहे. ‘संकल्प से सिद्धी’ हा भारताचा नारा आहे आणि नव भारताची निर्मिती हा भारताचा सर्वात मोठा संकल्प आहे.
नव भारताच्या निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी भारत आज अहोरात्र काम करत आहे. आणि यातील विशेष बाब म्हणजे आमची स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नसून स्वतःशीच आहे. आम्ही स्वतःला आव्हान देत आहोत, आम्ही स्वतःला आव्हान देत आहोत.
मित्रांनो, आज भारत आधीच्या तुलनेत जलद गतीने पुढे मार्गक्रमण करू इच्छितो. काही बदल घडूच शकत नाही असे विचार असणाऱ्या लोकांच्या विचारधारेला भारत आज आव्हान देत आहे.
मागील पाच वर्षात 130 कोटी भारतीयांनी एकत्रित येऊन प्रत्येक क्षेत्रात अशी चमकदार कामगिरी केली आहे ज्याची यापूर्वी कधी कोणी कल्पना देखील केली नव्हती. आमचे ध्येय उच्च आहे, आम्ही उच्च ध्येय साध्य करू.
बंधू आणि भगिनींनो, सात दशकांमध्ये ग्रामीण स्वच्छता 38 टक्के वर पोहोचली आहे. पाच वर्षात आम्ही 11 कोटी म्हणजे 110 दशलक्षाहून अधिक शौचालये बांधली गेली आहेत. आज ग्रामीण स्वच्छता 99 टक्के आहे. यापूर्वी देशात स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन 55 टक्क्यांपर्यंत होते. पाच वर्षात आम्हीं ते 95 टक्क्यांपर्यंत नेले आहे. केवळ पाच वर्षात आम्ही 15 कोटी म्हणजे 115 दशलक्ष लोकांना गॅस कनेक्शन दिले आहे. भारतात यापूर्वी ग्रामीण रास्त जोडणी 55 टक्के होती. पाच वर्षात आम्ही टी 97 टक्के केली. मागील पाच वर्षांमध्ये आम्ही देशाच्या ग्रामीण भागात 2 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले आहेत. भारतात 50 टक्केहून कमी लोकांचे बँक खाते होते, आज 5 वर्षात जवळपास 100 टक्के कुटुंब बँकिंग प्रणालीशी जोडली गेली आहेत. पाच वर्षात आम्ही 37 कोटी म्हणजे 317 दशलक्षांहून अधिक नवीन बँक खाती उघडली आहेत.
मित्रांनो, आज लोकांच्या मूलभूत गरजांची चिंता कमी होत असल्याने ते मोठी स्वप्ने पाहत आहेत; आणि ती साध्य करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहेत.
मित्रांनो, आमच्यासाठी व्यापार सुलभीकरण जितके महत्वाचे आहे तितकेच सुलभ राहणीमान देखील महत्वाचे आहे. आणि त्याचा मार्ग आहे सशक्तीकरण, जेव्हा देशातील सामान्य नागरिक सक्षम होईल तेव्हा देशाचा सामाजिक आणि आर्थिक विकास जलद गतीने होईल.
मी आज तुम्हाला एक उदाहरण देतो. मित्रांनो, आजकाल डेटा हे नवीन तेल आहे (डेटा इज द न्यू ऑइल) असे म्हंटले जाते. जेव्हा तेलाची गोष्ट येते तेव्हा तुम्हां ह्युस्टनच्या लोकांना याचा अर्थ नक्कीच माहीत आहे. मी यामध्ये अजून एक गोष्ट जोडू इच्छितो, डेटा हे नवीन सोनं आहे.(डेटा इज द न्यू गोल्ड). जरा नीट लक्ष देऊन ऐका, संपूर्ण जगात सर्वात स्वस्त डेटा हा भारतात उपलब्ध आहे. आज भारतात 1 जीबी डेटा साठी 25 ते 30 सेन्ट्स म्हणजे एका डॉलरचा चौथा हिस्सा मोजावा लागतो. मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की 1 जीबी डेटाची जागतिक बाजारातील किंमत याहून 25 ते 39 पट जास्त आहे.
हा स्वस्त डेटा भारतात डिजिटल इंडियाची नवीन ओळख निर्माण करत आहे. या स्वस्त डेटामुळे भरतात प्रशासनाला पुन्हा परिभाषीत केले आहे. आज भारतात केंद्र आणि राज्य सरकारांच्या अंदाजे 10 हजार सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत.
मित्रांनो, एक असा काळ देखील होता जेव्हा पारपत्र तयार व्हायला दोन ते तीन महिने लागायचे. आता एका आठवड्यात पारपत्र घरपोच मिळते. पूर्वी व्हीजा साठी खूप त्रास सहन करावा लागायचा. हे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असेल,भारताच्या ई व्हीजा सुविधेचा लाभ घेणाऱ्यांपैकी अमेरिका देखील एक आहे.
मित्रांनो, एक काळ होता जेव्हा नवीन कंपनीच्या नोंदणीसाठी दोन ते तीन आठवडे लागायचे. आता 24 तासात नवीन कंपनीची नोंदणी होते.
एक काळ होता जेव्हा कर परतावा भरणे ही फार मोठी डोकेदुखी होती. कर परतावा मिळायला महिनोंमहिने लागायचे परंतु आता जे बदल घडले आहेत ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यावर्षी 31 ऑगस्ट या एका दिवशी, मी फक्त एक दिवसा विषयी बोलत आहे. या एका दिवसात अंदाजे 50 लाख म्हणजे 5 दशलक्ष लोकांनी ऑनलाईन पद्धतीने आपला कर परतावा भरला. म्हणजे एका दिवसातच 50 लाख रिटर्न. हा आकडा ह्युस्टनच्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पट आहे. आणि कर परतावा मिळायला जिथे महिने लागायचे ते आता आठवडा दहा दिवसांच्या आत थेट बँक खात्यात जमा होतात.
बंधू आणि भगिनींनो, जलद गतीने विकास करणाऱ्या कोणत्याही देशासाठी, आपल्या नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे गरजेचे असते. गरजू नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्या सोबतच नव भारताच्या निर्मितीसाठी काही गोष्टींना तिलांजली देखील दिली जाते. आम्ही जितके महत्व कल्याणकारी योजनांना दिले आहे तितकेच महत्व काही अनावश्यक गोष्टी बंद करण्याला देखील दिले आहे.
या 2 ऑक्टोबर ला देश महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी करणार आहे, त्यावेळी भारत हगणदारी मुक्त होईल. भारताने मागील 5 वर्षात 1500 हून अधिक जुने कायदे रद्द केले आहेत. भारतात व्यापार पूरक वातावरण निर्मितीमध्ये भारतातील भरमसाट करांचे जाळे अडथळा निर्माण करत होते. आमच्या सरकारने करांच्या या जाळ्याला तिलांजली दिली आणि जीएसटी लागू केले.
अनेक वर्षांनंतर आम्ही देशात ‘एक देश-एक कर प्रणालीचे’ स्वप्न साकार केले आहे. मित्रांनो, आम्ही भ्रष्टाचाराला देखील आव्हान दिले आहे. त्याच्या समूळ उच्चाटनासाठी आम्ही लोगोपाठ उपाययोजना राबवत आहोत. मागील 2 ते 3 वर्षात भारतात साडे तीन लाख म्हणजे 350 हजारांहून अधिक संशयित कंपन्या बंद केल्या आहेत. सरकारी सेवांचा फायदा घेण्यासाठी केवळ कागदोपत्री असलेल्या 8 कोटी म्हणजे 80 दशलक्षाहून अधिक बनावट नावं आम्ही रद्द केली आहेत.
मित्रांनो, तुम्ही कल्पना करू शकता की ही बनावट नावं रद्द केल्यामुळे कितीतरी पैसे आपण चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवले आहेत. हा आकडा जवळपास दीड लाख कोटी इतका आहे. म्हणजे अंदाजे 20 बिलियन अमेरिकी डॉलर. प्रत्येक भारतीया पर्यंत विकासाचा फायदा पोहोचावा म्हणून आम्ही देशात पारदर्शक कार्यप्रणाली राबवत आहोत. बंधू आणि भगिनींनो, एकही भारतीय विकासापासून दूर राहिलेला भारताला मंजूर नाही.
70 वर्षांपासून देशासमोर एक खूप मोठे आव्हान होते, जे काही दिवसांपूर्वी संपुष्टात आणले. तुम्ही ओळखलेच असेल, हा विषय आहे – कलम 370 चा, कलम 370 ने जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना विकास आणि समान अधिकारांपासून वंचित ठेवले होते. याचाच फायदा दहशतवादी आणि फुटीरतावादी संघटना घेत होत्या.
भारतीय राज्यघटनेने जे अधिकार इतर भारतीयांना दिले आहेत, तेच अधिकार आता जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना देखील मिळाले. तेथील महिला- मुले- दलितांसोबत होणारा भेदभाव संपला.
मित्रांनो, आमच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये या विषयावर तासंतास चर्चा झाली; ज्याचे थेट प्रसारण संपूर्ण देशासह जगभर करण्यात आले होते. भारतात आमच्या पक्षाला राज्यसभेत बहुमत नाही. असे असले तरीही आमच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात लोकसभा आणि राज्यसभेत हा निर्णय दोन तृतीयांश बहुमताने पारित झाला. मी तुम्हाला विनंती करतो की, भारतातील सर्व खासदारांसाठी एकदा उभे राहून टाळ्या वाजवूया. खूप खूप धन्यवाद.
भारत इथे जी प्रगती करत आहे, त्याचा काही लोकांना त्रास होत आहे, जे स्वतःचा देश सांभाळू शकत नाहीत. या सर्वांनी नेहमी भारताचा द्वेष करण्याचेच राजकारण केले. या लोकांना देशात अशांतता हवी आहे, हे दहशतवादाचे समर्थक आहेत, हे लोकं दहशतवादाला आसरा देतात. यांना केवळ तुम्हीच नाही तर संपूर्ण जग चांगले ओळखते. अमेरिकेतील 9/11 असो की मग मुंबईतील 26/11, याचे षडयंत्रकार कुठे राहतात?
मित्रांनो, दहशतवादाविरुद्ध आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठामपणे दहशतवादा विरुद्ध उभे आहेत हे मी येथे ठामपणे सांगू इच्छितो. दहशतवादा विरुद्धच्या लढाई मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मनोधैर्यासाठी आपण सर्वांनी उभे राहून त्यांचे देखील टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. धन्यवाद.....धन्यवाद....मित्रांनो.
बंधू आणि भगिनींनो भारतात खूप काही घडत आहे, खूप काही बदलत आहे आणि खूप काही बदल घडवण्याच्या इच्छाशक्तीने आम्ही मार्गक्रमण करत आहोत. आम्ही नवीन आव्हाने निश्चित करण्याची, त्यांना पूर्ण करण्याची जिद्द आहे. देशातील हीच भावना लक्षात घेत मी काही दिवसांपूर्वी मी एक कविता लिहिली होती. त्याच्या दोन ओळी ऐकवतो, आज जास्त वेळ देखील नाही.
वो जो मुश्किलों का अंबार है,
वही तो मेरे हौसलों की मीनार है।”
मित्रांनो, भारत आज आव्हानांना टाळण्याचा प्रयत्न करत नसून, आम्ही आव्हानांना सामोरे जात आहोत. भारत आज लहान- सहान वृद्धीकारक बदलांवर नाही, समस्यांच्या सूमळ उच्चाटनावर भर देत आहे. अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आज भारत शक्य करून दाखवत आहे.
मित्रांनो, आता भारताने पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी कंबर कसली आहे. आम्ही पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि निर्यात वाढवण्यावर भर देत आहोत. आम्ही लोकाभिमुख, विकासाभिमुख आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करून पुढे जात आहोत. आम्ही पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रुपये म्हणजे जवळ जवळ 1.3 ट्रिलियन डॉलर खर्च करणार आहोत.
मित्रांनो, गेल्या पाच वर्षात जगात अनेक प्रकारच्या अस्थिर स्थितीनंतरही भारताचा विकासदर सरासरी 7.5 टक्के राहिला आहे आणि हे देखील लक्षात घेतले पाहिजे, पूर्वीच्या एखाद्या सरकारच्या संपूर्ण कार्यकाळाची सरासरी पाहिली तर यापूर्वी कधीही असे घडलेले नाही. पहिल्यांदाच एकाच वेळी अल्प चलनफुगवटा, अल्प वित्तीय तूट आणि उच्च विकासदर अशी स्थिती पाहायला मिळत आहे. आज भारत जगातल्या थेट परकीय गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक बनला आहे. 2014 ते 2019 पर्यंत थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ जवळ जवळ दुप्पट झाला आहे. अलीकडेच आम्ही सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीचे निकष सुलभ केले आहेत.
कोळसा, खाणकाम आणि कंत्राटी उत्पादनाच्या क्षेत्रात आता 100 टक्के परदेशी गुंतवणूक करणे शक्य आहे. माझी काल इथे ह्युस्टनमध्ये एनर्जी सेंटरच्या सीईओंशी भेट झाली. भारतात कॉर्पोरेट करात कपात करण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्यामुळे त्या सर्वांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या संदर्भात त्यांनी अशी माहिती दिली आहे की कॉर्पोरेट करात कपात करण्याच्या निर्णयामुळे केवळ भारतातच नाही तर आघाडीच्या जागतिक व्यावसायिक नेत्यांमध्येही अतिशय सकारात्मक संदेश पोहोचला आहे. हा निर्णय भारताला जागतिक पातळीवर आणखी स्पर्धात्मक बनवेल.
मित्रांनो, भारतीयांसाठी अमेरिका, अमेरिकेत आणि अमेरिकी नागरिकांना भारतात प्रगती करण्याच्या अमाप संधी आहेत. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी नवभारताचा प्रवास आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेची भक्कम अर्थव्यवस्था या संधींना नवे पंख लावेल.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अर्थव्यवस्थेच्या ज्या चमत्कारांसंदर्भात सांगितलं आहे ते चमत्कार म्हणजे दुधात साखर म्हणावी लागेल. पुढल्या दोन-तीन दिवसात ट्रम्प यांच्याबरोबर माझी चर्चा होणार आहे. त्यातून काही सकारात्मक परिणाम दिसून येतील अशी मला आशा आहे. तसे पाहिले तर ट्रम्प मला टफ निगोशिएटर म्हणतात पण ते स्वतः देखील वाटाघाटी करण्यात अतिशय तरबेज आहेत आणि त्यांच्याकडून मी बरेच काही शिकत आहे.
मित्रांनो, एका चांगल्या भवितव्यासाठी आमची ही आगेकूच आणखी जलदगतीने होणार आहे आणि तुम्ही सर्व सहकारी या वाटचालीचा एक महत्त्वाचा भाग आहात, गती देणारे बळ आहात, तुम्ही तुमच्या मायभूमीपासून दर आहात पण तुमच्या मायभूमीचे सरकार तुमच्यापासून लांब नाही. गेल्या पाच वर्षात आम्ही भारतीय समुदायाशी संवाद साधण्याचे महत्त्व आणि पद्धत या दोन्हीत बदल केले आहेत. आता परदेशातील भारताचे दुतावास आणि वाणीज्य कार्यालये केवळ सरकारी कार्यालये राहिली नसून तुमचा सर्वात पहिला मित्र म्हणून भूमिका बजावत आहेत. परदेशात काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांसाठी, त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. मदत, ई- मायग्रेट, परदेशात जाण्यापूर्वीचे प्री- डिपार्चर प्रशिक्षण, अनिवासी भारतीयांच्या वीमा योजनांमध्ये सुधारणा, सर्व पीआयओ कार्डला ओसीआय कार्डाची सुविधा, अशी अनेक कामे केली आहेत. ज्यामुळे अनिवासी भारतीयांना परदेशात जाण्यापूर्वी आणि त्यानंतर बरीच मदत झाली आहे. आमच्या सरकारने भारतीय समुदायासाठी कल्याण निधी भक्कम केला आहे. परदेशात अनेक नव्या शहरांत अनिवासी भारतीय सहाय्यता केंद्र देखील उघडली आहेत.
बंधू आणि भगिनींनो, आज या मंचावरून जो संदेश मिळाला आहे त्याच्या प्रभावाने 21व्या शतकात नव्या परिभाषेचा उदय होणार आहे, नव्या शक्यता निर्माण होणार आहेत. आपल्याकडे समान लोकशाही मूल्यांची शक्ती आहे, दोन्ही देशांमध्ये नव-निर्माणाचा समान संकल्प आहे आणि दोघांची मैत्री आपल्याला एका उज्ज्वल भवितव्याकडे नक्कीच घेऊन जाणार आहे.
श्रीमान अध्यक्ष मला असे वाटते की तुम्ही सहकुटुंब भारतात यावे आणि आम्हाला तुमच्या स्वागताची संधी द्यावी. आम्हा दोघांची ही मैत्री भारत आणि अमेरिकेची सामाईक स्वप्ने आणि उज्ज्वल भवितव्याला नव्या उंचीवर नेईल. मी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचे, अमेरिकेच्य राजकीय, सामाजिक आणि व्यवसायाशी संबंधित येथील समस्त नेत्यांचे येथे उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार मानतो. टेक्सासच्या सरकारला, येथील प्रशासनाला देखील खूप खूप धन्यवाद देतो.
B.Gokhale/S.Mhatre/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1585991)
Visitor Counter : 193