पंतप्रधान कार्यालय
मथुरा येथे राष्ट्रीय पशु आजार नियंत्रण आणि राष्ट्रव्यापी कृत्रिम रेतन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Posted On:
11 SEP 2019 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2019
भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची आल्हादिनी शक्ती राधेच्या जन्माची साक्षीदार असलेल्या पावन ब्रिजभूमी च्या पवित्र मातीला मी प्रणाम करतो. इथे आलेल्या सर्व ब्रिजवासीयांना प्रणाम ! राधे राधे !!
मोठया संख्येने आलेले माझे प्रिय शेतकरी बंधू-भगिनी, पशुपालक बंधू-भगिनी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा राधे राधे !
नव्या जनादेशानंतर कृष्णाच्या या नगरीत पहिल्यांदाच येण्याचे सौभाग्य मिळाले आहे. मथुरा आणि पूर्ण उत्तर प्रदेशाचे अनेक आशीर्वाद पुन्हा एकदा मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना मिळाले आहेत. त्यासाठी, तुमच्या या सहकार्यासाठी देशहितासाठी निर्णय घेण्यासाठी मी तुमच्यासमोर आज या ब्रज भूमीतून नतमस्तक होतो आहे,आणि तुमचे आभार मानतो आहे. आपल्या सर्वांच्या आदेशानुसार, गेल्या 100 दिवसांत आम्ही अभूतपूर्व काम करुन दाखवले आहे. देशाच्या विकासासाठी तुमचा पाठींबा आणि सहकार्य मला सदैव मिळत राहील, असा मला विश्वास वाटतो.
मित्रांनो, या ब्रिजभूमीने कायमच संपूर्ण देशाला, समस्त जगाला, मानवतेला, जीवनाला प्रेरणा दिली आहे. आज संपूर्ण जग पर्यावरण संरक्षणासाठी, झाडे वाचवण्यासाठी संपूर्ण जगात एक रोल मॉडेल शोधत आहे. मात्र भारताकडे यासाठी भगवान श्रीकृष्णासारखा प्रेरणास्रोत कायमच राहिला आहे. पर्यावरण प्रेमाशिवाय श्रीकृष्णाची कल्पनाही अपूर्ण आहे.
तुम्ही जरा विचार करा, कालिंदी, जिला आपण यमुना म्हणूनही ओळखतो ती नदी, तुळशीची माळ, मोरपीस, बासरी, कदंब वृक्षांची सावली आणि हिरवेगार गवत चरणाऱ्या गाई या सगळ्यावाचून श्रीकुष्णाची प्रतिमा पूर्ण होऊ शकेल काय? दूध, दही, लोणी यांच्याशिवाय बाळगोपाळाची कल्पना कोणी करु शकेल का?
मित्रांनो, निसर्ग, पर्यावरण आणि पशुधनाशिवाय आपली आराध्य दैवते आपल्याला जितकी अपुरी वाटतात, तितकाच आपला देशही या सगळ्याशिवाय आपल्याला अपूर्ण वाटतो.
पर्यावरण आणि पशुधन हे कायमच भारताच्या आर्थिक चिंतनाचा विषय ठरले आहेत. हेच कारण आहे की स्वच्छ भारत असो, जलजीवन अभियान असो किंवा मग कृषी आणि पशुपालनाला प्रोत्साहन देण्याचा विषय असो, निसर्ग आणि आर्थिक विकासात संतुलन साधतच आपण सशक्त आणि नव्या भारताच्या निर्माणाच्या दिशेने वाटचाल करतो आहोत.
बंधू आणि भगिनींनो, याच विचारांना पुढे नेत आज काही मोठे संकल्प आम्ही इथे केले आहेत. आणि मला विश्वास आहे की देशातील कोट्यवधी पशूंसाठी, पर्यावरणासाठी, पर्यटनासाठी असा कार्यक्रम सुरु करण्याच्या दृष्टीने ब्रिजभूमीपेक्षा जास्त योग्य ठिकाण कोणतेच नसेल.
थोड्या वेळापूर्वीच ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. राष्ट्रीय पशु आजार नियंत्रण कार्यक्रम देखील सुरु करण्यात आला आहे.पशूंचे आरोग्यसंवर्धन, पोषण आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित काही अनेक योजनाही सुरु करण्यात आल्या आहेत.
त्याशिवाय, मथुरेच्या पायाभूत सुविधा आणि पर्यटनाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन देखील आज झाले आहे. या योजना आणि प्रकल्पांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन ! माझ्यासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रात त्या त्या क्षेत्रातील हजारो शेतकरी एकेका केंद्रावर एकत्र जमून हा कार्यक्रम बघत आहेत. कोट्यवधी शेतकरी आणि पशुपालक आज तंत्रज्ञानाच्या मदतीने ब्रिजभूमीतल्या या कार्यक्रमाचा भाग बनू शकते ही माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे! त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो.
मित्रांनो, अगदी काही दिवसांनी आपला देश महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करणार आहे. निसर्गाविषयी, स्वच्छतेविषयी महात्मा गांधी यांचा जो आग्रह होता, त्यावरून प्रेरणा घेत त्याचे आपल्या आयुष्यात आचरण करणे आपण सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. आणि हीच त्यांना सर्वोत्तम श्रद्धांजली देखील ठरेल. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे 150 वे वर्ष आपल्यासाठी प्रेरणेचे वर्ष आहे, ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानामागे देखील हीच भावना आहे. आजपासून सुरु झालेल्या या अभियानात यावेळी विशेषतः प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्ती साठी प्रयत्न केले जाणार आहेत.
बंधू आणि भागींनीनो,
प्लास्टिकमुळे होणाऱ्या समस्यांनी काळानुसार अत्यंत गंभीर स्वरुप धारण केले आहे. तुम्हा ब्रिजवासियांना तर माहिती आहेच की प्लास्टिकमुळे पशु-पक्ष्यांचा कसा बळी जातो आहे. त्याचप्रमाणे नदी-नाले, तलाव, जलाशये, समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांनाही त्याचा त्रास होतो. मासोळीने प्लास्टिक गिळले तर त्या जगू शकत नाही. आणि म्हणूनच, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आता आपल्याला समूळ नष्ट कराव्या लागतील. या वर्षी दोन ऑक्टोबरपर्यत आपली घरे, कार्यालये आणि कामाच्या इअतर जागांना एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करावाच लागणार आहे.
मी देशभरात, गावागावांत काम करत असलेल्या प्रत्येक स्वयंसहायता बचत गटांना, नागरी सोसायटी, सामाजिक संस्था आणि खाजगी संस्था, युवा मंडळे, क्लब, शाळा आणि महाविद्यालये अशा सर्व संस्थांना, व्यक्तींना, जे जे या अभियानात सहभागी झाले आहेत, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपल्या अपत्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला हे करावेच लागणार आहे. तुम्ही प्लास्टिकचा जो कचरा जमा कराल, तो घेऊन जाण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासन करेल. आणि मग त्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाईल. ज्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया होऊ शकत नाही, त्याचा वापर सिमेंटचे कारखाने किंवा रस्ते बनवण्याच्या कामासाठी वापरले जात आहे.
बंधू आणि भगिनींनो, काही वेळापूर्वीच मला अशा काही महिलांना भेटण्याची संधी मिळाली. या महिला विविध प्रकारचे प्लास्टिक गोळा करतात. या प्लास्टिकचा बहुतांश भाग पुनर्प्रक्रीयेसाठी वापरला जातो. यातून या महिलांना उत्पन्नही मिळते आहे. मला वाटतंय की प्रत्येक गावात हे काम सुरु करायला हवं. कचऱ्यातून सोने हा विचार आपल्या पर्यावरणाचे रक्षण करेल. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला स्वच्छ बनवेल.
मित्रांनो, स्वच्छता ही सेवा या अभियानासोबतच काही बदल आपल्याला आपल्या सवयींमध्ये देखील करावे लागतील. लाल किल्यावरुन देखील मी या विषयावर बोललो आहे. आज पुन्हा मी ह्या विषयावर बोलतो आहे. आता आम्हाला निश्चय करायचा आहे, की जेव्हा आपण दुकानात, बाजारात, भाजी घ्यायला किंवा काहीही खरेदी करायला जाऊ तेव्हा आपली पिशवी, बैग सोबत नक्की घेऊन जाऊ. पेकिंगसाठी दुकानदाराला प्लास्टिकचा कमीतकमी वापर करायला सांगायचा, हे सगळे बदल आपल्याला करावेच लागतील. माझी तर ही इच्छा आहे की सरकारी कार्यालये, सरकारी कार्यक्रम इथे देखील प्लास्टिकच्या बाटल्यांच्या ऐवजी धातू किंवा मातीच्या भांड्यांचा वापर करण्याची व्यवस्था केली जावी.
मित्रांनो, जेव्हां पर्यावरण स्वच्छ राहते, आजूबाजूला घाण-कचरा होत नाही तेव्हा त्याचा सरळ आणि सकारात्मक परिणाम आरोग्यावरही दिसतो. मी योगी सरकारचे कौतुक करेन की ते स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात अत्यंत गांभीर्याने काम करत आहे. आता योगीजींनी ज्या मेंदूज्वराची सविस्तर माहिती दिली, त्याच्या तापाचे परिणाम त्यांनी सांगितले. आणि योगीजी जेव्हा खासदार होते, तेव्हा संसदेचे असे एकही सत्र नव्हते ज्यात योगीजींनी ह्या मेंदूज्वराच्या हृदयद्रावक कथा सांगून देशाला त्याविषयी जागृत केले नाही. हजारो मुले या मेंदूज्वराने मरत होती. योगीजी सातत्याने हा विषय मांडत होते. मात्र जेव्हा योगीजींचे सरकार आले तेव्हा नुकतीच त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात झाली होती. मात्र ज्या आजाराबद्दल योगीजींनी आयुष्यभर लढा दिला, संसदेला जागं केलं, देशाला जागं केलं. ते सगळं बाजूला ठेवत, जुने मृत्यू विसरून जात, काही लोकांनी या मृत्यूंसाठी योगीजीना जबाबदार धरले. मात्र तरीही, योगीजी डगमगले नाहीत. ज्या मुद्द्यावरून ते 30-40 वर्षे सातत्याने काम करत होते, ते काम त्यांनी सोडले नाही. आणि आता ते जे आकडे देत होते ते माध्यमांनी लक्षात घेतले की नाही, मला माहित नाही. मात्र देशाने त्याकडे नक्की लक्ष द्यायला हवे. ज्या गंभीर आजारामुळे, जो केवळ घाणीमुळे होतो, त्यामुळे आपल्या इतक्या मुलांचा बळी गेला, त्या आजारांचे मूळ कारण म्हणजे अस्वच्छता आणि घाण दूर करण्यासाठी योगी सरकारने जे अभियान सुरु केले त्यात त्यांना मोठे यश मिळाले असून यशस्वीपणे ते हे अभियान पुढे घेऊन जात आहेत. आणि मानवतेच्या या पवित्र कार्यात त्यांनी अनेक मुलांचे जीव वाचवले आहेत आणि त्यासाठी जोडलेल्या सगळ्या नागरिकांना, कुटुंबाना, संस्थांना, सरकारला सर्वांना मी शुभेच्छा देतो. हे अभियान यशस्वी करण्याऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो.
मित्रांनो, पर्यावरण आणि आरोग्याशी संबंधित आणखी एक महत्वाचा विषय आहे जलसंकट आणि जलसंकटावर उपाय आहे जल जीवन अभियान. या अभियानाअंतर्गत जल संरक्षण आणि प्रत्येक घरी पाणी पोहचवण्यावर आम्ही भर देतो आहोत. जल जीवन अभियानाचा खूप मोठा लाभ आमच्या गावात राहणाऱ्या लोकांना मिळणार आहे, शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सर्वात मोठे म्हणजे आमच्या माता भगिनींना सुविधा मिळणार आहे. पाण्यावरचा खर्च कमी होण्याचा सरळ सरळ अर्थ आहे, या गरीब लोकांची बचतही होणार आहे.
मित्रांनो शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यात पशुपालन आणि इतर व्यवसायांची खूप मोठी भूमिका आहे. पशुपालन असो, मासेमारी असो, कुक्कुटपालन असो किंवा मधुमक्षिका पालन, या सगळ्यात केलेली गुंतवणूक चांगले उत्पन्न देते. आणि त्यासाठीच, गेल्या पाच वर्षात, कृषिशी संबंधित इतर अनेक पर्यायांवर आम्ही नव नवे दृष्टीकोन घेऊन पुढे वाटचाल करतो आहोत. पशुधनाची गुणवत्ता आणि आरोग्याशी संबंधित, दुग्धउत्पादनांच्या विविधतेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने जी आवश्यक पावले होती ती देखील आम्ही उचलली आहेत. दुभत्या गाई-म्हशींची गुणवत्ता उत्तम राहील, हे सुनिश्चित करण्यासाठी आधी राष्ट्रीय गोकुळ अभियान सुरु करण्यात आले आणि या वर्षी देशभरातील पशूंच्या उत्तम देखभालीसाठी कामधेनू आयोग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच नव्या दृष्टीकोनाचा परिणाम म्हणून गेल्या पाच वर्षात देशात दुग्ध उत्पादनात सुमारे सात टक्क्यांची वाढ झाली आहे. तसंच, शेतकरी आणि पशुपालकांच्या उत्पन्नातही सुमारे 13 टक्क्यांची सरासरी वाढ नोंदवण्यात आली आहे.
मी माझा आणखी एक अनुभव आपल्याला सांगु इच्छितो. आफ्रिकेत एक छोटासा देश आहे रवांडा. मी गेल्या वर्षी तिकडे गेलो होतो. आणि त्यावेळी इथे ज्या बातम्या आल्या त्या वाचून काही लोकांनी मोठा हल्लाबोल केला होता. मोदीनी रवांडा इथे जाऊन अडीचशे गाई भेट दिल्या, यावरून मोठी टीका झाली, मात्र, देशासमोर कधीही पूर्ण सत्य आणले गेले नाही. रवांडा सारख्या छोट्याशा देशात, आफ्रिका खंडातला हा चिमुकला देश अत्यंत अद्भूत योजना राबवतो आहे. ती म्हणजे रवांडा सरकार तिथल्या गावांना गाय भेट देते आणि मग त्या गायीला कालवड झाली कि ती ते लोक सरकारला परत देतात. ज्यांच्याकडे गाय नाही, अशांना ती कालवड भेट म्हणून दिली जाते. हे चक्र असेच सुरु राहते. आणि त्यातून रवांडा मधल्या प्रत्येक गावात, प्रत्येक घरात किमान एक गाय येईल आणि पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि त्यातून तो त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आधार बनावा, असे तिथल्या सरकारचे प्रयत्न आहेत. खूप उत्तम प्रकारे त्यांनी ही योजना बनवली आहे. मला तिथल्या वास्तव्यात रवांडातील गावात जाण्याचीही संधी मिळाली. या योजनेचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले आणि मला जवळून बघता आले की त्यांनी कशाप्रकारे गायीच्या दुधाच्या माध्यमातून जीवनचर्या व्यतीत करण्याची संपूर्ण व्यवस्था उभी केली आहे. मी ते सगळे स्वतः पहिले. मात्र आपल्या देशाचे दुर्दैव आहे की काही लोकांच्या कानावर जर ओम शब्द पडला तर त्यांचे केस उभे राहतात, गाय शब्द ऐकला तर त्यांचे केस उभे राहतात. त्यांना वाटतं की देश आता लगेचच सोळाव्या-सतराव्या शतकात जाणार आहे. अशी विचारसरणी असलेल्या लोकांनी ह्या देशाचे नुकसान करण्यात काही कसर ठेवलेली नाही. आणि म्हणूनच आज हा विचार बदलवण्याची गरज आहे. ग्रामीण भारतातील अर्थव्यवस्थेत पशुधनाला खूप महत्व आहे, ते आपल्यासाठी अत्यंत मूल्यवान आहे. कोणी कल्पना करू शकेल का की पशुधनाशिवाय अर्थव्यवस्था चालू शकेल? गावाचा कारभार चालू शकेल? गावातल्या कुटुंबांचा चरितार्थ चालू शकेल का? पण का, कोणजाणे, काही शब्द ऐकल्यावरच लोकांना एकदम करंट लागल्यासारखे होते.
मित्रांनो, पशुधनाच्या बाबतीत सरकार किती गंभीर आहे याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की सरकार बनल्यानंतर 100 दिवसांत जे दोन मोठे निर्णय घेतले गेले, त्यातला एक पशुंच्या लसीकरणाशी संबंधित आहे. या अभियानाचा विस्तार करत राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम आणि कृत्रिम रेतन कार्यक्रमाची सुरुवात केली गेली.
मित्रांनो, तुम्हा सर्वांना नीट माहिती आहे की पशु आजारी पडणे शेतकऱ्यासाठी किती गंभीर बाब असते. आपली जनावरं वारंवार आजारी पडायला नको आणि त्यांच्या उपचारांच्या खर्चाचे ओझे शेतकऱ्यावर पडायला नको, पशुपालाकावर पडायला नको, या विचारातूनच आज 13 हजार कोटी रुपयांच्या एका मोठ्या अभियानाची सुरुवात केली गेली आहे. एफ एम डी म्हणजेच, फूट एंड माउथ डिसीज या रोगापासून देशभरातील पशुंना मुक्ती मिळावी, यासाठी आम्ही हे व्यापक अभियान सुरु करत आहोत.
एफएमडी म्हणजे फूट एंड माउथ डिसीजसाठी उत्तरप्रदेशातल्या काही गावांत एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे- मुंहपका. या मुंहपका नावाच्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठीच हे अभियान आहे. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की कित्येक देशांनी अशा प्रकारचे अभियान राबवून आपापल्या देशांना या आजारापासून मुक्त केले आहे. अनेक छोट्या छोट्या गरीब देशांनीही त्यासाठी काम केले आहे. आपल्याकडे मात्र दुर्दैवाने अनेक सरकारांनी प्रयत्न करूनही, त्यांना यश आले नाही आणि आपले पशू या आजारापासून मुक्त झाले नाहीत.
जगातील गरीब, छोटे देश जर आपल्या पशूंना या आजाराच्या संकटातून बाहेर काढू शकतात, तर मग श्रीकृष्णाच्या या भूमीवर कोणीही पशु अशा संकटात जगायला नको. म्हणूनच, त्याला या आजारापासून मुक्त करण्यासाठी आम्ही हे अभियान सुरु करत आहोत. या अंतर्गत, गाय, म्हैस, मेंढी, बकरी आणि डुकरे या सर्व पशूना वर्षातून दोनदा लास टोचली जाईल. इतकेच नाही, तर ज्या पशुंचे लसीकरण होईल, त्यांना पशू आधार म्हणजे युनिक ओळख क्रमांक देऊन त्यांच्या कानात टैग लावला जाईल. पशुंनाही आरोग्य कार्ड दिले जाईल.
बंधू आणि भगिनीनो, या कार्यक्रमांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. आपले पशुधन निरोगी राहावे, त्याला पोषक आहार मिळावा आणि पशूंच्या अनेक उत्तम वाणांचा विकास करता यावा, याच रस्त्याने चालत असतांना आमच्या पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्याचाही आमचा प्रयत्न असेल. आमच्या मुलांना योग्य प्रमाणात दूध मिळेल आणि जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून भारताची ओळख निर्माण होईल.
बंधू आणि भगिनींनो, भारताच्या दुग्धउत्पादन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आम्हाला नवनवीन संशोधनांची गरज आहे, तंत्रज्ञानाची गरज आहे. ही संशोधने आपल्या ग्रामीण समाजातूनही यावीत यासाठी आज स्टार्ट अप कंपन्यांना, विशेषतः युवकांना मी विशेष आवाहन करतो आहे. बंगरूळू, हैदराबाद या शहरात स्टार्ट अप कंपन्या चालवणाऱ्या युवकांना मी सांगू इच्छितो, कि तुम्ही हे आव्हान स्वीकारा. आयआयटीतल्या लोकांना आवाहन करतो की जरा संशोधन करा, देशात पशुंसाठी चाऱ्याची व्यवस्था कशी होऊ शकेल, त्याना पोषक आहार कसा मिळेल. प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून स्वस्त आणि सुलभ व्यवस्था कशी असेल, यावरही संशोधन करायला हवे. अशा विषयांवर संशोधन करणाऱ्या स्टार्ट अप कंपन्या सुरु व्हायला हव्यात. चला, आपण सगळे जण एकत्र येऊन नवनव्या कल्पना विकसित करुया, त्यातूनच देशाच्या मातीसाठी आवश्यक ते उपाय आपल्याला निश्चितच सापडतील
मी माझ्या युवा साथीदारांनाही आश्वासन देऊ इच्छितो की त्यांनी आणलेल्या अभिनव कल्पनांचा गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांना पुढे नेले जाईल आणि त्यासाठी गुंतवणुकीची व्यवस्था देखील केली जाईल. यातून रोजगाराच्याही अनेक संधी निर्माण होतील.
मित्रांनो, मथुरेसकट हे संपूर्ण ब्रिज क्षेत्र अध्यात्म आणि आस्थेचे स्थान आहे. इथे वारसा पर्यटनाच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. मला आनंद आहे, की योगजींचे सरकार या दिशेने सक्रीयतेने कार्य करत आहे.
आज मथुरा, नंदगाव, गोवर्धन, बरसाना या गावांचे सौंदर्यीकरण आणि त्यांना एकत्र जोडण्याशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले गेले. इथे निर्माण होणाऱ्या सुविधा केवळ उत्तरप्रदेशातच नाही तर संपूर्ण देशातील पर्यटन क्षेत्राला मोठी ताकद देणाऱ्या आहेत. गेल्या पाच वर्षात देशात पर्यटन क्षेत्राला ज्या प्रकारे प्रोत्साहन दिले गेले आहे त्यामुळे जागतिक पातळीवरील भाजपाच्या क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. काही दिवसांपूर्वी पर्यटनाच्या जागतिक क्रमवारीची यादीत भारताचा कमांक 34 वा क्रमांक होता. 2013 साली हाच क्रमांक 65 वा होता. भारताच्या या सुधारलेल्या क्रमवारीचा अर्थ हाच आहे की पर्यटनाच्या क्षेत्रातही भारतात रोजगारनिर्मिती होत आहे.
मित्रांनो, 11 सप्टेंबरचा आजचा दिवस आणखी एका गोष्टीसाठी महत्वाचा आहे. एका शतकापूर्वी आजच्याच दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे आपले ऐतिहासिक भाषण दिले होते. या भाषणामुळेच, संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, आपल्या परंपरांची सखोल माहिती मिळाली होती. आपल्या या भाषणात स्वामी विवेकानंद यांनी विश्व शांतीसाठी भारताचे तत्वज्ञान, दर्शनशास्त्रे देखील जगापुढे मांडली होती. मात्र, दुर्दैव बघा, त्याचं 11 सप्टेंबर या तारखेला, अमेरिकेवर एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाला, या भीषण हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले.
बंधू आणि भागींनीनो, आज दहशतवाद ही एक नवी विचारधाराच झाली आहे आणि त्यावर कुठल्याही देशांच्या सीमेचे बंधन नाही. ही जागतिक समस्या बनली आहे आणि या समस्येची पाळेमुळे आपल्या शेजारच्या देशातच मजबूत होत आहेत. या दहशतवादी विचारप्रणालीला पुढे नेणाऱ्या, त्यांना संरक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात संपूर्ण जगाने संकल्प करण्याची गरज आहे. कठोर कारवाई करण्याची गरज आहे. भारत आपल्या पातळीवर या आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, हे सगळ्यां जगाने पहिले आहे आणि पुढेही बघेल. अलीकडेच आम्ही दहशतवाद विरोधी कायदा बदलून तो अधिक कठोर केला आहे. हा निर्णयही दहशतवाद विरोधी लढ्याविरोधात केलेला प्रयत्न आहे. आता अशा संघटना आपले नाव बदलून दहशतवादी कारवाया लपवू शकणार नाहीत.
बंधू-भगिनीनो, समस्या दहशतवादाची असो, प्रदूषणाची असो किंवा मग आरोग्याची, आपण सगळ्यांनी एकत्र येऊनच या समस्येचा सामना करायला हवा आहे. चला आपण सगळ्यांनी संकल्प करुया आणि ज्या उद्देशाने आपण सगळे आज इथे जमलो आहोत, ते उदिष्ट मिळवण्याचा प्रयत्न करुया. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना या नवनवीन प्रकल्पांसाठी शुभेच्छा देतो. तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. माझ्या सोबत संपूर्ण ताकदीने बोला, दोन्ही हात वर करून बोला-
भारत माता की - जय
भारत माता की - जय
भारत माता की - जय
खूप खूप धन्यवाद …
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1585166)
Visitor Counter : 188