माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ : प्रकाश जावडेकर

Posted On: 14 SEP 2019 6:14PM by PIB Mumbai

पुणे, 14 सप्‍टेंबर 2019

पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ झाला असून भारतनेट, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांचा लाभही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती, (दिशा) पुणे यांची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर जावडेकर म्हणाले, “योजनांचे नियोजन करण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख  ठेवण्यासाठी दिशाच्या बैठका होतात. मुद्रा योजनेची जिल्ह्यात वेगाने प्रगती होत असून याअंतर्गत जिल्यातील 9 लाख तरुणांना 8000 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. पुणे विभागातील 58 रेल्वे स्थानकांपैकी 46 स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध आहे. 5 सरकते जिनेदेखील बसवले आहेत.

बारामतीमधील पासपोर्ट सेवा केंद्राने आतापर्यंत 5000 पारपत्र वितरीत केली असून यामुळे सर्वसामान्यांचे आयुष्य सुकर झाले आहे; 5 जिल्ह्यात 50 ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु केली आहेत. भारतनेटने जिल्ह्यतील 790 ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर कनेक्शन दिले असून दररोज सरासरी 20 जीबी वापर होतो. शाळांना क्रीडासामग्री पुरवली जात असून खेळाचा तासही शाळांमध्ये बंधनकारक केला जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले.

आयुष्मान योजना आणि इतर योजनांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामुळे पुण्यात बालमृत्यू दर, मातृमृत्यू दर, जन्म आणि मृत्यू दर कमी करण्यात यश आले आहे; असे जावडेकर यांनी सांगितले. ‘’आतापर्यंत पुण्यातील 60,000 महिलांना प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा लाभ मिळाला आहे. शौचालय बांधण्याचे उद्दिष्टदेखील साध्य केले असून स्वछ्तेमध्ये पुण्याची क्रमवारी दहाव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लोकसहभागामुळे अंगणवाड्यादेखील वेगाने प्रगती करत आहेत”.

लोकांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देताना जावडेकर यांनी सर्व प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या धोरणाचा पुनरुच्चार केला. इंटरनेटवर हिंदीच्या वाढत्या वापराचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक भाषा लोप पावत असल्याबद्दलची भीती दूर केली. इतर कोणत्याही देशात भाषेमधील इतकी विविधता क्‍वचितच पहायला मिळते; असे मत त्यांनी व्यक्त केले.

खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, देखील यावेळी उपस्थित होते.

 

 

M.Chopade/S.Kakade/D.Rane



(Release ID: 1585088) Visitor Counter : 101


Read this release in: English