पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा केला प्रारंभ

Posted On: 11 SEP 2019 5:23PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2019

 

पशुधनाला होणाऱ्या लाळ्याखुरकत आणि ब्रुसेलोसिसला आळा घालण्यासाठी आणि त्याचे उच्चाटन करण्यासाठीच्या राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मथुरा येथे प्रारंभ केला.

12652 कोटी रुपयांच्या या संपूर्णपणे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत देशातल्या 600 दशलक्ष पशुधनाचे या दोन रोगांपासून मुक्त करण्यासाठी लसीकरण केले जाणार आहे.

राष्ट्रीय कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम, लसीकरण, रोग व्यवस्थापन, कृत्रिम गर्भधारणा आणि उत्पादकता यावरच्या देशातल्या 687 जिल्ह्यातल्या सर्व कृषी विज्ञान केंद्रातल्या देशव्यापी कार्यशाळेचा प्रारंभही पंतप्रधानांनी केला.

पर्यावरण आणि पशुधन हे विषय भारताच्या अर्थविषयक विचार आणि तत्वज्ञानाच्या गाभ्याशी राहिले आहेत. म्हणूनच मग ते स्वच्छ भारत अभियान असो, जल जीवन अभियान असो किंवा कृषी आणि पशुपालनाला प्रोत्साहन असो आपण नेहमीच निसर्ग आणि अर्थव्यवस्था विकास यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. यामुळे दृढ नव भारताची उभारणी शक्य झाल्याचे पंतप्रधानांनी विशाल जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले. देशात एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टीक वापर कमी करण्यासाठीच्या स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाचे उद्‌घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत आपली घरं, कार्यालयं ही ठिकाणं आपण एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकपासून मुक्त राखण्याचा प्रयत्न करू.

एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकविरोधातल्या या मोहिमेत बचत गट, समाज, स्वयंसेवी संस्था, महिला आणि युवा संघटना, प्रत्येक शाळा, महाविद्यालय, राज्य सरकार, खासगी संस्था आणि प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावं असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी स्वस्त आणि सुलभ पर्यायाचा शोध घेतला पाहिजे. स्टार्टअप्सद्वारे अनेक पर्याय सापडतील असे ते म्हणाले.

पशु आरोग्य, दुग्ध, पोषण इत्यादींवरच्या अनेक कार्यक्रमांचा पंतप्रधानांनी प्रारंभ केला.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात पशुपालन आणि इतर संलग्न कार्यक्रमांची महत्वाची भूमिका आहे. पशुपालन, मत्स्यविकास, मधमाशी पालन यामधली गुंतवणूक अधिक उत्पन्न देते.

गेल्या पाच वर्षात कृषी आणि संलग्न बाबींविषयी नवा दृष्टीकोन घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. पशुधनाचा दर्जा, दुग्ध उत्पादन यात सुधारणा घडवून त्यात वैविध्य आणण्यासाठी आम्ही आवश्यक ती पावले उचलली आहेत.

पशुधनासाठी हिरवा चारा आणि पोषक खाद्य यांचा नियमित पुरवठा रहावा यासाठी आपल्याला योग्य तो उपाय शोधण्याची गरज आहे.

भारतातल्या दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी नाविन्यता आणि नवे तंत्रज्ञान ही आजची गरज आहे. खेड्यातून हे नाविन्य यावे यासाठी स्टार्ट अप ब्रॅण्ड चॅलेंजची आम्ही सुरूवात केली आहे. त्यांच्या कल्पनांवर गांभीर्याने विचार करून त्यापुढे नेऊन त्यासाठी योग्य गुंतवणूक शोधण्याचे आश्वासन मी युवा मित्रांना देतो यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1584745) Visitor Counter : 264


Read this release in: English