पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 सप्टेंबरला प्रारंभ होणार

Posted On: 09 SEP 2019 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2019

 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांपैकी महत्वाचा भाग असलेल्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातल्या मथुरा येथे येत्या 11 सप्टेंबरला प्रारंभ होणार आहे. पशुधनामधला लाळ खुरकत रोग आणि ब्रुसेलोसिस निर्मूलनासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

यासाठी केंद्र सरकारकडून 100 टक्के निधी पुरवला जाणार असून 2024 पर्यंतच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 12,652 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कार्यक्रमाद्वारे 50 कोटी गुरे, म्हशी, बकऱ्या, मेंढ्या आणि डुक्कर यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

ब्रुसेलोसि‍सच्या निर्मुलनासाठी 3.6 कोटी मादी वासरांचे लसीकरण करण्याचे उदिृष्टही या कार्यक्रमाअंतर्गत ठेवण्यात आले आहे. 2025 पर्यंत रोगावर नियंत्रण मिळवणे आणि 2030 पर्यंत या रोगांचे उच्चाटन करणे असे या कार्यक्रमाचे दोन घटक आहेत.

पंतप्रधान याच दिवशी राष्ट्रीय कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम सुरु करणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते लसीकरण,  रोग व्यवस्थापन, कृत्रिम गर्भधारणा आणि उत्पादकता या विषयावर देशातल्या 687 जिल्ह्यातल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये राष्ट्रव्यापी कार्यशाळांचा प्रारंभही होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांच्या मथुरा भेटीत ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रम होणार आहे.    

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1584602) Visitor Counter : 150


Read this release in: English