पंतप्रधान कार्यालय

पूर्व आर्थिक मंचाच्या समारोप सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 05 SEP 2019 9:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2019

 

सन्मानीय राष्ट्रापती पुतीन,

अध्यक्ष बटुल्गा,

पंतप्रधान आबे,

पंतप्रधान महाथिर,

मित्रांनो, नमस्कार !

दोब्रे दिन !! 

व्लादिव्होस्टोकच्या शांत आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधताना एक सुखद अनुभव येत आहे. प्रातःकाळी सूर्यकिरणे सर्वात प्रथम इथंच पडतात आणि मग संपूर्ण दुनियेला प्रकाशमान तसंच ऊर्जावान करतात. आज आपण केलेलं हे मंथन केवळ अतिपूर्वेकडील भागाच्याच नाही तर अवघ्या मानवजातीच्या कल्याणासाठी होत असलेल्या प्रयत्नांना नवीन ऊर्जा आणि नवी गती देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली यासाठी आमचे मित्र राष्ट्रपती पुतीन यांचा मी आभारी आहे.

पुतीन यांनी मला हे निमंत्रण भारतातल्‍या  सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच दिले होते. 130 कोटी भारतवासियांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि हे निमंत्रण देतानाच त्यांच्या विश्वासावर एक मोहर लावली गेली होती. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपती पुतीन यांनी सेंट पीटर्सबर्ग  इथं आर्थिक मंच कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. युरोपच्या फ्रंटियरपासून ते पॅसिफिकच्या गेटवेपर्यंत माझीही एक प्रकारे ट्रान्स-सायबेरियनयात्रा झाली. व्लादिव्होस्टोक युरेशिया आणि पॅसिफिक यांचा संगम आहे. हा आर्कटिक आणि नॉर्दर्न सागरी मार्गासाठी नवनवीन संधीची व्दारे खुली करतो. रशियाचा जवळपास तीन चतुर्थांश भूप्रदेश आशियामध्ये आहे. अतिपूर्वेकडील देश या महान देशाची आशियाई ओळख सुदृढ करतात. या क्षेत्राचा आकार भारतापेक्षा जवळपास दुप्पट आहे. आणि या क्षेत्राची लोकसंख्या फक्त 6 मिलियन आहे. परंतु हे क्षेत्र खनिज आणि तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या नैसर्गिक साधन-सामुग्रीने संपन्न आहे. इथल्या लोकांनी अथक परिश्रम, मेहनत करून आणि कमालीचे साहस दाखवले आहेच त्याचबरोबर नवसंकल्पनांचा स्वीकार करून निसर्गानं निर्माण केलेल्या आव्हानांवर विजय मिळवला आहे. इतकंच नाही तर कला, विज्ञान, साहित्य, क्रीडा, उद्योग आणि साहसी क्रीडा प्रकार यांच्यासह सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवले आहे. अतिपूर्वेच्या या लोकांनी, व्लादिव्होस्टोकच्या प्रतिनिधींनी यशाचं शिखर गाठलं नाही, असं एकही क्षेत्र शिल्लक नाही. सगळ्या क्षेत्रात या लोकांनी यशाचा ध्वज फडकवला आहे. अतिशित म्हणजे बर्फाळ भूमीचे रूपांतर फुलांच्या उद्यानामध्ये करून एका सुवर्णमयी भविष्याचा मजबूत आधार तयार केला आहे. काल राष्ट्रपती पुतीन यांच्याबरोबर स्ट्रीट ऑफ द फार ईस्टहे प्रदर्शन मी पाहिले. या भागातली विविधता, लोकांमध्ये असलेली प्रतिभा आणि तंत्रज्ञानाचा विकास पाहून मी खूप प्रभावित झालो. यांच्यामध्ये प्रगती आणि सहयोग यासाठी अमर्याद शक्यता असल्याचे मला जाणवलं. 

मित्रांनो,

भारत आणि फार ईस्टयांच्यातील नातेसंबंध काही आता नव्यानं निर्माण झाले आहेत असं नाही. तर हे संबंध खूप जुने आहेत. व्लादिव्होस्टोक या देशात आपले दुतावास सुरू करणारा भारत हा पहिला देश आहे. त्यावेळी आणि त्याच्याही आधी भारत आणि रशिया यांच्यामध्ये खूप चांगले विश्वासाचे संबंध होते. सोव्हिएत रशियाच्यावेळी ज्यावेळी परदेशींना इथं येण्याची मनाई होती, त्यावेळीही व्लादिव्होस्टोक भारतीय नागरिकांसाठी मुक्त होता. संरक्षण आणि विकास यांचे बहुतांश सामान व्लादिव्होस्टोकच्या माध्यमातून भारतामध्ये येत होते. आता आज या भागीदारीच्या वृक्षाने आपली मुळं अधिक खोल केली आहेत. दोन्ही देशांच्या लोकांसाठी सुख-समृद्धीचा आधार बनत आहेत. भारताने इथं ऊर्जा क्षेत्र आणि दुसरे म्हणजे हिऱ्यासारख्या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये महत्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. सखालिन इथले तेलक्षेत्र म्हणजे भारतीय गुंतवणुकीच्या यशस्वीतेचे एक उत्तम उदाहरण आहे.

मित्रांनो,

राष्ट्रपती पुतीन यांचा प्रस्ताव आणि त्यांची दूरदृष्टी या क्षेत्रासाठीच नाही तर भारतासारख्या रशियाच्या भागीदारांसाठी अभूतपूर्व संधी घेवून आली आहे. त्यांनी रशियन फार ईस्टच्या विकासाला 21 व्या शतकामध्ये प्राधान्याने करण्याचे राष्ट्रीय कार्य म्हणून घोषित केले आहे. त्यांचा या कामाकडे पाहण्याचा सर्वंकष दृष्टिकोन जीवनाच्या प्रत्येक पैलूचा विचार करण्यासारखा आहे. यामध्ये आर्थिक असो, शैक्षणिक असो किंवा आरोग्य अथवा क्रीडा, संस्कृती असो किंवा दूरसंचार-दळणवळण, व्यापार तसेच परंपरा असो सर्व क्षेत्रांना अधिक चांगले बनवण्यासाठी प्रेरक प्रयत्न आहे. आणखी एक त्यांनी गुंतवणुकीचे मार्ग मुक्त केले आहेत. त्याचबरोबर इतर गोष्टींकडे आणि सामाजिक स्तरावरही त्यांनी तितकेच लक्ष दिले आहे. त्यांची ही दूरदृष्टी पाहून मी खूपच प्रभावित झालो आहे म्हणून इथं त्याविषयी सांगतोय. त्यांच्या या दूरदृष्टीने आखलेल्या प्रवासामध्ये, वाटचालीमध्ये भारत प्रत्येक पावलावर सहकार्य करून रशियाबरोबर मार्गक्रमणा करू इच्छितो. मला आलेल्या अनुभवाच्या आधारे मी सांगू शकतो की, ‘फार ईस्ट आणि व्लादिव्होस्टोकच्या वेगवान, संतुलित आणि सर्व समावेशक विकासासाठी राष्ट्रपती पुतीन यांच्या जवळ जी भविष्यासाठीची दृष्टी आहे ती नक्कीच यशस्वी ठरेल. याचे कारण म्हणजे हे व्हिजनवास्तववादी आहे. आणि त्याच्यामागे मूल्यवान साधन सामुग्री तसेच लोकांकडे असलेली अमर्याद प्रतिभा आहे. त्यांच्या या व्हिजनमध्ये या क्षेत्रासाठी आणि इथल्या लोकांसाठी सन्मान आणि प्रेम दिसून येतंय. भारतामध्येही आम्ही सबका साथ-सबका विकास और सबका विश्वासअसा मंत्र जपत एका नवीन भारताच्या निर्माणासाठी कार्य करीत आहोत. 2024 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 अमेरिकी डॉलर ट्रिलियनची बनवण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि या संकल्पाच्या सिद्धीसाठी आम्ही कार्यरत आहोत. भारत वेगाने पुढे जात आहे आणि भारताची प्रतिभा या क्षेत्राच्या विकासासाठी भागीदाराचे काम करत आहे. त्यामुळे एक आणि एक  असे दोन नाही तर एकावर एक अकरा बनण्याची ऐतिहासिक संधी आहे.

मित्रांनो,

याच प्रेरणेने पूर्व आर्थिक मंचमध्ये सहभागी होण्यासाठी  आम्ही अभूतपूर्व तयारी केली. अनेक मंत्री, चार राज्यांचे मुख्यमंत्री आणि जवळपास 150 व्यावसायिक क्षेत्रातले दिग्गज इथं आले आहेत. त्यांनी राष्ट्रपतीचे विशेष दूत, फार ईस्टचे सर्व 11 राज्यपाल आणि त्यांच्या व्यावसायिक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. रशियाचे मंत्री आणि फार ईस्टचे व्यावसायिक नेतेही भारतात आले. आमच्या या सर्व प्रयत्नांमुळे खूप चांगले परिणाम दिसून येत आहेत, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. ऊर्जा क्षेत्रापासून ते आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रापासून ते कौशल्य विकास, खनिज संपदेपासून ते टिम्बरपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये जवळपास 50 व्यावसायिक करार झाले आहेत. यामुळे अनेक बिलियन डॅालर्सची व्यापारी गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा आहे. 

मित्रांनो,

फार ईस्टच्या विकासमध्ये  योगदान देण्यासाठी भारत 1 बिलियन डॅालर्सचे लाईन ऑफ क्रेडिटदेईल. आम्ही पहिल्यांदाच इतर कोणा देशाला लाईन ऑफ क्रेडिटदेणार आहोत. माझ्या सरकारच्या अॅक्ट ईस्टधोरणामुळे पूर्व आशियामध्ये अनेक कामांना वेग आला आहे. आज इथं केलेली ही घोषणा म्हणजे अॅक्ट फॅार ईस्टच्या उड्डाणाला वेग देणारी ठरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. आम्ही उचललेली पावले आमच्या आर्थिक व्यूहरचनेलाही एक नवीन वळण देणारी ठरणार आहे. मित्र राष्ट्रांच्या क्षेत्रीय विकासामध्ये आम्ही त्यांच्या प्राधान्यक्रमाचा विचार करून कृतिशील भागीदार बनणार आहोत.

मित्रांनो,

भारताच्या प्राचीन सभ्यतेच्या, संस्कृतीच्या मूल्यांनी आम्हाला काही गोष्टी शिकवल्या आहेत. आपल्याला जितकी आवश्यकता आहे, तितकंच निसर्गाकडून घ्यावं. नैसर्गिक साधन संपदेच्या संवर्धनावर आमचा विश्वास आहे. निसर्गाबरोबर संतुलन राखण्याचं काम आम्ही युगांपासून करीत आहोत. कारण आमच्या अस्तित्वाचा आणि विकासाचा एक मुख्य घटक निसर्ग आहे. 

मित्रांनो,

ज्या ज्या देशांमध्ये भारतीय आहेत, तिथले नेते ज्यावेळी मला भेटतात, त्यावेळी भारतीयांच्या परिश्रम करण्याच्या तयारीची, इमानदारी, शिस्त आणि निष्ठा याविषयी भरपूर कौतुक, प्रशंसा ते करतात. भारतीय कंपन्यांनी, उद्योजकांनी जगभरामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणण्यत योगदान दिले आहे. संपत्ती निर्माणाचे कार्यही केले आहे. त्याचबरोबर भारतीयांनी आणि आमच्या कंपन्यांनी स्थानिक संवेदनशील मुद्दे आणि संस्कृती यांचा नेहमीच आदर केला आहे. भारतीयांचा पैसा, त्यांची घाम गाळण्याची तयारी, प्रतिभा आणि व्यावसायिकता यामुळे फार ईस्टमध्ये वेगाने विकास होईल, असा माझा पूर्ण विश्वास आहे. पूर्व आर्थिक मंचामध्ये भारताच्या सहभागामुळे जे काही सर्वोत्तम परिणाम दिसून आले आहेत, ते असेच पुढेही नेण्यासाठी फार ईस्टच्या सर्व 11 राज्यपालांना भारताला भेट देण्याचं मी आमंत्रण देतो. 

मित्रांनो,

मी आणि राष्ट्रपती पुतीन यांनी भारत- रशिया यांच्यातील सहयोगासाठी महत्वाकांक्षी उद्देश निश्चित केला आहे. आमच्या संबंधांमध्ये आता आम्ही एक नवीन चांगले वळण घेतले आहे. वाटचालीत विविधता आणली आहे. संबंधांना सरकारच्या चौकटीतून बाहेर काढून खाजगी उद्योगांचाही सक्रिय सहयोग असावा, यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांना राजधानीच्या बाहेर काढून राज्यांपर्यंत आणि विविध क्षेत्रांपर्यंत नेले आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकार्य करून आपल्या स्पेशल अँड प्रिव्हिलेज्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या साच्यात घातले आहे. आम्ही मिळून अवकाशातले अंतरही पार करू आणि सागराच्या तळातूनही समृद्धी होवू शकेल, असं काम करू.

मित्रांनो,

इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये सहयोगाच्या नवीन अध्यायाला आम्ही प्रारंभ करणार आहोत. व्लादिव्होस्टोक आणि चेन्नई यांच्या दरम्यान ज्यावेळी जहाजांची आवक-जावक सुरू होईल तसेच ज्यावेळी व्लादिवास्तोक नॉर्थ ईस्ट अशियाच्या बाजारपेठेत भारताचा स्प्रिंगबोर्ड बनेल, त्यावेळी भारत -रशिया यांच्या सहकार्याला आणखी नवे आणि सखोल परिणाम प्राप्त होतील. उभय देशातले हे ऋणानुबंध अधिक दृढ होतील, मैत्रीचं नातं अधिक बहरेल, अधिक फुलेल. त्यावेळी फार ईस्ट एकाबाजूला युरेशियन युनियन आणि दुसऱ्या बाजूला मुक्त आणि सर्वसमावेशी इंडो-पॅसिफिक यांचा संगम होईल. या क्षेत्रामध्ये आपल्या संबंधाचा हा मजबूत आधार असेल. रूल बेस्ड ऑर्डर, सोवेरनिटी आणि टेरीटोरियल इंटीग्रिटी यांच्यासाठी सन्मान आणि अंतर्गत मुद्यांमध्ये दखल घेण्याचं टाळले जाईल.

मित्रांनो,

प्रसिद्ध तत्वज्ञानी आणि लेखक टॉलस्टॉय हे भारतीय वेदांमध्ये असलेल्या अमर्याद ज्ञानाविषयी खूप प्रभावित झाले होते. एक वेदवाक्य तर त्यांना खूपच आवडत होतं. ते वाक्य म्हणजे - ‘‘एकम् सत् विप्रः बहुधा वदन्ति ’’!! हेच वाक्य त्यांनी आपल्या शब्दात सांगताना लिहिलं होतं. ‘‘ऑल दॅट एक्सिस्ट इज वन. पीपल कॉल दॅट वन बाय डिफरंट नेम्स.’’

यावर्षी संपूर्ण जगभरामध्ये महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. टॉलस्टॉल आणि गांधीजी यांनी एकमेकांवर अमिट प्रभाव टाकला होता. चला तर मग या, भारत आणि रशिया यांच्या या संयुक्त प्रेरणा आपण अधिक बळकट करू या. एकमेकांच्या प्रगतीमध्ये आता आणखी जास्त भागिदार बनूया. आपण आपले व्हिजन एकमेकांना सांगितले आहे. आता त्यासाठी आणि या संपूर्ण विश्वाच्या स्थिरतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी संयुक्तपणे कार्य करूया. हा आपल्या सहभागीत्वाच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ आहे. मी ज्या ज्यावेळी रशियाला येतो त्या त्यावेळी इथल्या लोकांमध्ये भारताविषयी असलेले प्रेम, मैत्रीभाव आणि सन्मान दिसून येतो. आजही याच भावनांची अनमोल भेट घेवून आणि खूप मोठ्या प्रमाणात सहकार्याचा संकल्प करून मी इथून जात आहे. मी आमचे मित्र राष्ट्रपती पुतीन यांना विशेष धन्यवाद देवू इच्छितो. आम्ही ज्या ज्यावेळी भेटतो, त्या त्यावेळी अगदी मोकळ्या मनानं खूप गप्पा मारतो. एकमेकांबरोबर शक्य तितका जास्त वेळ घालवतो. काल ते अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते, तरीही त्यांनी माझ्याबरोबर अनेक ठिकाणी आले. आम्ही अनेक तास एकत्रित घालवले. इतकच नाही तर रात्री एक वाजपर्यंत आम्ही एकत्रच होतो. माझ्यासाठी असे नाही तर भारताविषयी त्यांच्या मनात जी प्रेमाची भावना आहे, ती भावना त्यांच्या वर्तनातून दिसून येते. इथल्या आणि भारताच्या संस्कृतीमध्ये एक समानता मला दिसून येते. माझे गृहराज्य गुजरातमध्ये एकमेकांचा निरोप घेताना कधीच बाय-बाय असं म्हटलं जात नाही. तर बाय-बाय ऐवजी आवजोअसं म्हणतात. आवजोचा अर्थ आहे, - तुम्ही पुन्हा लवकर यावे! इथं म्हणतात - दस्विदानियाँ !!

म्हणूनच मी सर्वांना म्हणतो - आवजो, दस्विदानियाँ !!

खूप -खूप धन्यवाद , स्पासिबा !!

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 



(Release ID: 1584525) Visitor Counter : 86


Read this release in: English