पंतप्रधान कार्यालय

ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमसाठी रशियाच्या व्लाडिव्होस्टोक इथे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

Posted On: 03 SEP 2019 7:16PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2019

 

मी 4-5 सप्टेंबर 2019.रोजी रशियाच्या व्लाडिव्होस्टोकला भेट देणार आहे. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागाला मी देणार असून कुठल्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. आमच्या मजबूत द्विपक्षीय संबंधांचे बंध वैविध्यपूर्ण आणि अधिक मजबूत करण्याची इच्छा हा दौरा अधोरेखित करतो.

माझ्या भेटीचा उद्देश दुहेरी आहे - रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आमंत्रणावरून 5 व्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणे आणि त्यांच्याबरोबर 20 वी  भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद घेणे. रशियाच्या सुदूर पूर्व भागात व्यवसाय आणि गुंतवणूकीच्या संधींच्या विकासावर फोरमने लक्ष केंद्रित केले आहे आणि या प्रदेशात भारत आणि रशिया यांच्यात घनिष्ट आणि परस्पर लाभदायक सहकार्य विकसित करण्यासाठी या फोरमने अमाप संधी उपलब्ध केल्या आहेत .

आमच्या विशेष आणि धोरणात्मक भागीदारीच्या भक्कम पायावर आधारित, आमच्या दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध आहेत. संरक्षण, नागरी अणुऊर्जा आणि अंतराळाचा शांततापूर्ण वापराच्या मोक्याच्या क्षेत्रात दोन्ही देश मोठ्या प्रमाणावर सहकार्य करतात. आमचे संबंध मजबूत असून व्यापार आणि गुंतवणूक संबंध देखील वाढत आहेत.

बहुध्रुवीय जगाला प्रोत्साहित करण्याच्या इच्छेने आमची मजबूत भागीदारी अधिक भक्कम झाली आहे आणि दोन्ही देश प्रादेशिक आणि बहुपक्षीय क्षेत्रात या दृष्टीने जवळून सहकार्य करत आहेत.

 माझे मित्र राष्ट्रपती पुतिन यांच्याशी आमची द्विपक्षीय भागीदारी आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या विविध पैलूंबाबत चर्चा करायला मी  उत्सुक आहे. मी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमला उपस्थित राहणाऱ्या अन्य जागतिक नेत्यांना भेटायला तसेच यामध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय उद्योग आणि व्यापार प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी देखील मी उत्सुक आहे.

 

R.Tidake/S.Kane/P.Kor

 



(Release ID: 1584030) Visitor Counter : 119


Read this release in: English