उपराष्ट्रपती कार्यालय
पायाभूत सुविधांच्या विकासावर मोठ्या प्रमाणात भर देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
गुडूर ते विजयवाडा दरम्यान नवीन इंटर-सिटी सुपर फास्ट एक्सप्रेस सेवेचा शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
01 SEP 2019 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2019
भारताला विकसित देश बनविण्यासाठी जोडणी महत्त्वाची असल्याचे लक्षात घेत देशात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करणे, विशेषत: रेल्वे, रस्ते, हवाई आणि बंदर जोडणी उपलब्ध करून देणे आणि या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी केले. गुडूर रेल्वे स्थानकात गुडूर-विजयवाडा इंटर-सिटी सुपर फास्ट एक्स्प्रेसला आज उपराष्ट्रपतींनी हिरवा झेंडा दाखवला, त्यानंतर ते बोलत होते. पायाभूत सुविधा मजबूत आणि आधुनिक करण्यासाठी रेल्वे, विमानतळ, बंदरे, अंतर्देशीय जलमार्ग, ग्रामीण रस्ते, गोदामे, तसेच ग्रामीण भागातील रस्ते आणि कोल्ड स्टोरेज युनिट्स यासाठीची गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
व्यंकटाचलम-ओबुलावरीपल्हे या भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा असणाऱ्या (चेरलोपल्ली ते रापुरू दरम्यान 6.6 किमी) रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे तसेच पुनर्बांधणी केलेल्या गुडुर रेल्वे स्थानक यार्डाचे देशार्पण तसेच नव्या फलाटांचे आणि उद्घाटनही नायडू यांनी केले.
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असल्याचे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले की 100 स्मार्ट शहरे, 10 हरीत विमानतळ, 7 हाय-स्पीड ट्रेन कॉरिडोर, 5 प्रमुख बंदरे यांसह महामार्ग, अंतर्देशीय जलमार्ग, ग्रामीण रस्ते, गोदामे आणि कोल्ड स्टोरेज साखळी उभारण्याबरोबरच देश आणि ग्रामीण भागात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याच्या महत्वाकांक्षी योजनांवर काम सुरू आहे. हे कार्यक्रम जोडणीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करतील आणि त्यायोगे आपला व्यापार आणि गुंतवणुक नवीन स्तरावर पोहोचेल, असे ते म्हणाले.
भारतमाला प्रकल्पांतर्गत सुमारे 60,000 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जात आहेत. 111 नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून विकसित करायचे ठरविण्यात आले आहे. रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याबरोबरच, शहरांमध्ये नवीन मेट्रो आणि व्यापारी वाहतुकीसाठी समर्पित रस्ते बांधले जात आहेत. रेल्वे स्थानकांचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण होत असून पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी जवळपास 500 स्थानके हाती घेण्यात आल्याबद्दल नायडू यांनी आनंद व्यक्त केला. नायडू यांनी मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे द्योतक अशा शब्दात भारताच्या पहिल्या हाय-टेक ऊर्जा-सक्षम ट्रेनचा, वंदे भारत एक्स्प्रेसचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावल्याबद्दल भारतीय रेल्वेचेही नायडू यांनी कौतुक केले. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वेची मोठी भूमिका आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी, आंध्र प्रदेशचे पाटबंधारे मंत्री, पी. अनिल कुमार यादव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
D.Wankhede/M.Pange/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1583812)
आगंतुक पटल : 293
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English