पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान भेटीच्या वेळी जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन

Posted On: 18 AUG 2019 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2019

 

  1. भारताचे पंतप्रधान महामहीम नरेंद्र मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान महामहीम डॉ. लोते त्सेरिंग यांच्या निमंत्रणावरून 17-18 ऑगस्ट 2019 रोजी भूतानला भेट दिली. मे 2019 मध्ये पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांची ही पहिली द्विपक्षीय भेट होती.
  2. पारो विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भूतानचे पंतप्रधान डॉ. त्सेरिंग, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी समारंभपूर्वक ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन स्वागत केले.
  3. भूतानचे राजे जिग्मे खेसार नामग्येल वांगचुक यांची पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली. महाराज आणि महाराणींनी आपल्याकडे आलेल्या मान्यवर अतिथींच्या स्वागतासाठी प्रिती भोजनाचे आयोजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान नरेश आणि महाराणी यांना आपल्या सोयीनुसार भारताला लवकरात लवकर भेट देण्याचे निमंत्रण दिले.   
  4. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान डॉ. त्सेरिंग यांची मर्यादित कालावधीत भेट झाली आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली.  पंतप्रधान डॉ. त्सेरिंग यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी औपचारिक मेजवानीचे आयोजन केले.
  5. भूतानच्या नॅशनल ऐसेंब्लीमधील विरोधी पक्षनेते डॉ. पेमा ग्याम्तशो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
  6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 30 मे 2019 रोजी झालेल्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी भूतानचे पंतप्रधान डॉ. त्सेरिंग उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेची आठवण केली. भूतान आणि भारत यांच्यात नियमित उच्च स्तरीय संपर्काची परंपरा ही एका विशेष आणि सन्माननीय संबंधांचे महत्त्वाचे प्रतीक असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
  7. या चर्चेदरम्यान दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधाबरोबरच इतर महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सर्वसमावेशक आढावा घेतला. परस्परांविषयी विश्वास आणि आदर यावर आधारित आणि सामायिक ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक, विकासात्मक आणि जनतेचा जनतेशी असलेला संवाद यांनी गुंफलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या अतिशय उत्तम असलेल्या स्थितीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. यासंदर्भात भूतानच्या धोरणी सम्राटांनी आणि त्यानंतरच्या भारतीय आणि भूतानी नेतृत्वाने मैत्रीचे आणि अतिशय जवळच्या दोन शेजाऱ्यांमधील सहकार्याचे एक असामान्य उदाहरण म्हणून या संबंधांची जोपासना करण्यामध्ये बजावलेल्या भूमिकेची दोन्ही पक्षांनी प्रशंसा केली.
  8. दोन्ही बाजूंकडून आपल्या सामायिक सुरक्षाविषयक हितसंबंधांचा पुनरुच्चार करण्यात आला आणि परस्परांच्या सुरक्षाविषयक आणि राष्ट्रीय हितसंबंधांवर परिणाम करणाऱ्या मुद्यांबाबत परस्परांशी योग्य समन्वय राखण्याबाबत वचनबद्धता व्यक्त करण्यात आली.
  9. भूतान सरकार आणि तेथील जनता यांच्या गरजा आणि आकांक्षांनुसार भूतानचा आर्थिक विकास आणि तेथील पायाभूत सुविधांचा विकास यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भूतानची श्रेणी उंचावून त्याचा समावेश मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या श्रेणीमध्ये झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी भूतान सरकारचे आणि तेथील जनतेचे अभिनंदन केले. समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि अमूल्य पर्यावरण यांचे संवर्धन करत असतानाच, सकल राष्ट्रीय आनंद या भूतानच्या विकासाच्या इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या तत्वज्ञानाच्या आधारे केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांनी भूतानच्या जनतेचे कौतुक केले.
  10. पंतप्रधान डॉ. त्सेरिंग यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये पदाची सूत्रे स्वीकारल्यावर डिसेंबर 2018 मध्ये केलेल्या पहिल्या परदेश दौऱ्याच्या म्हणजे भारताच्या दौऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला. भूतानच्या सध्या सुरु असलेल्या बाराव्या पंचवार्षिक योजनेला दिलेल्या पाठबळाबद्दल पंतप्रधान डॉ. त्सेरिंग यांनी भारत सरकारचे आभार मानले आणि गेल्या दशकांमध्ये भूतानच्या विकासात भारताने दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.
  11. परस्परांना द्विपक्षीय सहकार्यासाठी सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणून दोन्ही बाजूंनी जलविद्युत निर्मिती क्षेत्राच्या महत्त्वावर भर दिला. नुकत्याच पूर्ण झालेल्या 720 मेगावॅट क्षमतेच्या मांगडेचू जलविद्युतनिर्मिती प्रकल्पाचे दोन्ही पंतप्रधानांनी औपचारिकपणे उद्‌घाटन केले. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि समर्पित आणि स्पर्धात्मक वृत्तीबद्दल या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे आणि व्यवस्थापनाचे त्यांनी अभिनंदन केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे भूतानमध्ये संयुक्तरित्या उभारलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पांची क्षमता आता 2000 मेगावॅटपेक्षा जास्त झाली आहे. हा महत्त्वाचा टप्पा सर केल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले आणि पुनात्सांगचू-1, पुनात्सांगचू-2 आणि खोलोंगचू यांसारख्या प्रगतीपथावर असलेल्या इतर प्रकल्पांचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करायचा निर्धार व्यक्त केला. दोन्ही देशांनी संकोष जलाशय जलविद्युत निर्मिती प्रकल्पाबाबत सुरु असलेल्या द्विपक्षीय चर्चेचा देखील आढावा घेतला.या प्रकल्पामुळे दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात होणारा फायदा लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या उभारणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी प्रक्रियेतील आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्याबाबत सहमती व्यक्त केली. जलविद्युत निर्मिती क्षेत्रात परस्परांना पूरक असलेल्या भारत-भूतान सहकार्याला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी भूतानी टपाल तिकिटांचे अनावरण केले.
  12. भारताकडून जारी होणाऱ्या रुपे कार्ड योजनेचे दोन्ही पंतप्रधानांनी औपचारिक उद्‌घाटन केले. या कार्डमुळे भूतानला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांना फायदा होणार आहे. त्यांना भूतानमधील वास्तव्यादरम्यान जास्त रोख रक्कम बाळगण्याची गरज उरणार नाही, त्याचबरोबर भूतानी अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल आणि दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांचेही एकात्मिकरण होईल. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच भूतानी बँकांकडून जारी होणाऱ्या रुपे कार्ड योजनेसाठी जलदगतीने काम करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी व्यक्त केला. या कार्डमुळे भारतात येणाऱ्या भूतानी पर्यटकांना लाभ मिळणार आहे आणि अशा प्रकारे रुपे कार्ड दोन्ही देशांमध्ये कार्यान्वित होणार आहे. रुपे कार्ड सुरु करण्याबरोबरच दोन्ही देशांदरम्यान रोखविरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे भारत इंटरफेस फॉर मनी(भीम) ऍप सुरू करण्यासाठी देखील भूतानने सहमती दर्शवली आहे.
  13. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी दक्षिण आशियायी उपग्रहाचे थिंपू येथील पृथ्वीवरील कक्षाचे उद्‌घाटन केले. या केंद्राची उभारणी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या(इस्रो) सहकार्याने करण्यात आली होती. 2017 मध्ये या दक्षिण आशियायी उपग्रहाचे (SAS), दक्षिण आशियायी प्रदेशासाठी भेट म्हणून प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीची भूतानचे पंतप्रधान डॉ. त्सेरिंग यांनी प्रशंसा केली. या उपग्रहामुळे भूतानच्या दळणवळण सेवा सुधारण्यास आणि त्यावरील खर्चात कपात करण्यास मदत मिळाली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत आपत्ती व्यवस्थापन क्षमतेत वाढ झाली आहे.
  14. भूतानच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा विचार करून एसएएसच्या सकारात्मक परिणामानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या आवश्यकता लक्षात घेवून एका अतिरिक्त ट्रान्सपाँडरवर वाढीव बँडविथभेट स्वरूपामध्ये भूतानच्या नागरिकांना देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. भूतानचे पंतप्रधान डॉ. त्सेरिंग यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले. या प्रस्तावामुळे भूतानच्या जनतेला लाभ होणार असून अंतराळ साधनांचा वापर करणे शक्य होणार आहे. भारताने हे पाऊल उचलून उभय देशांमधील संबंध अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीने नवा अध्याय जोडला आहे. यामुळे आता भूतान, अंतराळ क्षेत्रातही कार्य करण्यास सिद्ध होवू शकेल.
  15. भूतानसाठी एक लहान उपग्रह संयुक्त रुपाने विकसित करण्याच्या निर्णयावर दोन्ही देशांच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. या योजनेच्या कार्याबरोबरच इतर संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी उभय देशांचे एक संयुक्त कार्यदल (जेडब्ल्यूजी) स्थापन करण्यात येईल. सुदूर संवेदी आणि भू-स्थानिक डाटाचा उपयोग करून नैसर्गिक साधन सामुग्री आणि आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी भूतानला एक जियो-पोर्टलकिंवा भू-पोर्टलप्रणाली विकसित करून देण्याच्या कामाचाही यामध्ये समावेश आहे. 
  16. डिजिटल आणि आधुनिक काळातील तंत्रज्ञानाच्या बरोबर अंतराळ तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणत्याही देशाचा सामाजिक आणि आर्थिक विकास वेगाने होवू शकतो. या क्षेत्राची व्यापक क्षमता लक्षात घेवून दोन्ही देशांनी आपआपसांमध्ये सहकार्य वाढवण्याची आवश्यकता आहे, यावर उभय राष्ट्र प्रमुखांचे एकमत झाले. 
  17. भारताची राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क अर्थात महाजाल आणि भूतानच्या संशोधन आणि शैक्षणिक नेटवर्क अर्थात महाजाल यांच्यामध्ये अंतर्गत संपर्क यंत्रणा निर्माण करून आपसांमध्ये संबंध दृढ करण्याच्या कार्यक्रमाचे उभय पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले. अशा प्रकारे संस्थागत स्तरावर वृद्धिंगत होणारे संबंध दोन्ही देशांमधल्या विद्यापीठांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये परस्पर संवाद वाढीस मदतगार ठरेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.
  18. या अधिकृत भेटीमध्ये पुढील सामंजस्य करार, पत्रे यांचे आदान-प्रदान झाले:-
  • दक्षिण अशियाई उपग्रहाच्या वापरासाठी सॅटकॉम नेटवर्कची स्थापना करून माहिती तंत्रज्ञान विभाग आणि आरजीओबीच्या टेलिकॉम तसेच भारतीय अंतराळ संस्था यांच्यात सामंजस्य करार.
  • राष्ट्रीय ज्ञान महाजाल (एनकेएन) आणि भूतानच्या ड्रूक संशांधन आणि शैक्षणिक महाजाल (ड्रकरेन) यांच्यामध्ये समकक्ष व्यवस्था निर्माण करण्याचा सामंजस्य करार.
  • हवाई अपघातांच्या तपासासंबंधी भारताचा विमान अपघात तपास विभाग (एएआयबी) आणि भूतानचा हवाई अपघात तपास विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार.
  • ते 7- भूतानचे रॅायल विद्यापीठ आणि भारतामधल्या आयआयटी दिल्ली, कानपूर आणि मुंबई, तसेच एनआयटी सिल्चर यांच्यामध्ये सहयोग आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आदान-प्रदान करण्यासंबंधी चार सामंजस्य करार.
  • विधी-न्याय शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधले संबंध आधिक वृद्धिंगत करण्यासाठी नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगलूरू आणि जिग्मेसिंगये वांगचूक स्कूल ऑफ लॉ, थिम्पू यांच्यामध्ये सामंजस्य करार.
  • विधी शिक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य आणि आदान-प्रदान करण्यासाठी भूतान राष्ट्रीय विधी संस्था आणि राष्ट्रीय न्याय अकादमी यांच्यामध्ये सामंजस्य करार.
  • पीटीसी इंडिया लिमिटेड आणि ड्रक ग्रीन पॉवर कॉरर्पोरेशन, भूतान यांच्यामध्ये मैंगडेछू जलविद्युत प्रकल्पासाठी ऊर्जा खरेदी करण्याचा सामंजस्य करार.
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीमध्ये भूतानमधल्या रॉयल विद्यापीठातल्या युवकांना एका विशेष कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं. त्यांनी व्दिपक्षीय संबंध हे जनता-केंद्रीत असावेत त्याचबरोबर उभय देशांमध्ये अध्यात्मिक तसेच बौद्ध धर्माचे ऋणानुबंध खोलवर रूजले आहेत, याविषयी आपल्या भाषणात प्रकाश टाकला. भारत आणि भूतान यांच्यातील संबंधांना नवीन उंचीवर नेण्यासाठी या दोन्ही देशातल्या युवकांनी शैक्षणिक आणि उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, यावर भर दिला. भूतानमध्ये विकास, पर्यावरण आणि संस्कृती यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे संघर्ष नाही उलट चांगल्याप्रकारे या गोष्टींचा ताळमेळ घातला आहे, याबद्दल प्रशंसा केली. या सामंजस्याबरोबरच प्रसन्नतेवर भर देत असलेल्या भूतानकडून मानवतेचा एक उत्कृष्ट संदेश मिळत आहे, असे नमूद केले. त्यांनी अंतराळ आणि डिजिटल तसेच आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये व्दिपक्षीय भागिदारीचा नवीन अध्याय सुरू होत असल्याचे अधोरेखित केले. याबरोबरच युवकांनी नवाचार तसेच सतत विकास यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक उपयोग करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान डॉ. त्सेरिंग आणि भूतानच्या राष्ट्रीय विधिमंडळाचे तसेच राष्ट्रीय मंडळाचे मान्यवर सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानी नागरिकांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, ही सेवा जास्तीत जास्त जनतेला मिळावी यासाठी भूतानचे पंतप्रधान डॉ. त्सेरिंग यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे कौतुक केले. भूतानमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी युक्त असे बहुविध रूग्णालयाच्या निर्मितीसाठी तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी अलिकडेच एका भारतीय तज्ञांच्या पथकाने दौरा केल्याचे नमूद केले.
  3. दोन्ही देशांनी व्दिपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक यांना प्रोत्साहन देण्यावर एकमत व्यक्त केलं. भूतान सरकारने व्दिपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान डॅा. शेरिंग यांनी डिसेंबर, 2018 मध्ये भारताला भेट दिली होती. त्याप्रसंगी भारत सरकारच्यावतीने 4 बिलियन रूपयांचे व्यापारी मदत भारताने देवू केली होती. या मदतीबद्दल यावेळी भारताची प्रशंसा करण्यात आली. या मदतीपैकी भारत सरकारने 800 दशलक्ष रूपयांचा पहिला हप्ता दिला आहे, त्याबद्दलही भारताचे आभार मानण्यात आले. सार्क चलन देवाण-घेवाण प्रारूपाअंतर्गत चलनाच्या देवाण-घेवाणीची मर्यादा वाढवण्यासाठी भूतानने केलेल्या मागणीनुसार सकारात्मक विचार केला जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅा. शेरिंग यांच्याशी बोलताना व्यक्त केला. अंतरिम उपाय योजना म्हणून पंतप्रधान मोदीयांनी अतिरिक्त देवाण-घेवाण व्यवस्थेनुसार अतिरिक्त 100दशलक्ष डॉलर चलनाची देवाण-घेवाण करण्याचा प्रस्ताव ठेवला.
  4. भूतान सरकारच्या अनुरोधानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानला उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या एलपीजीच्या विद्यमान कोट्यामध्ये 700 एमटीची वृद्धी करून आता तो दरमहा 1000 एमटी देण्याची घोषणा केली. देशांतर्गत वाढलेल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि भूतान सरकारला ग्रामीण भागामध्ये एलपीजीचा पुरवठा करता यावी, यासाठी भारत ही मदत करेल.
  5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिम्पूमध्ये ऐतिहासिक सिमटोखा जोगमध्ये प्रार्थना केली. या स्थानी भूतानचे संस्थापम श्रद्धेय झाबद्रुंग न्गावांग नामग्याल यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारताने भूतानला भेट दिला आहे. उभय देशांमध्ये असलेले घनिष्ठ संबंध लक्षात घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानला दिलेल्या कर्जाची मुदत आणखी पाच वर्षांनी वाढवण्यात येईल, अशी घोषणा यावेळी केली. त्यांनी भारतातल्या नालंदा विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या भूतानी विद्यार्थ्‍यांच्या छात्रवृत्तीची संख्या दोनवरून पाच केल्याची घोषणाही केली.
  6. उभय देशांनी भारत आणि भूतान यांच्यामध्ये युवापिढीचे आदान-प्रदान अधिक व्यापक व्हावे, यावर भर देण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. तसेच नवनवीन क्षेत्रामध्ये सहकार्याचा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार केला.
  7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भूतान भेटीमध्ये विचार-विनिमय अतिशय उत्साहामध्ये आणि सौहार्दपूर्ण वातावरणात, एकमेकांच्या सन्मानाचा आदर करीत पार पडले. भारत आणि भूतान यांच्यामध्ये आधीपासूनच असलेले मैत्रीपूर्ण, विश्वासाचे ऋणानुबंध अधिक मजबूत झाले.

                                         

 

B.Gokhale/S.Bedekar/S.Patil/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1582498) Visitor Counter : 274


Read this release in: English