संरक्षण मंत्रालय
संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत खासगी उद्योगांनी सहभाग वाढवावा-राजनाथ सिंह
आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज
Posted On:
20 AUG 2019 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2019
संरक्षण क्षेत्रातल्या शस्त्रास्त्र आणि उपकरणांबाबत परदेशी उत्पादकांवर अवलंबून राहणं कमी करून देशी बनावटीच्या संरक्षण आयुधांचा वापर वाढवायला हवा, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. नवी दिल्लीत आज भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरण आणि देशीकरणाच्या योजना या विषयावर आयोजित चर्चा सत्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. संरक्षण क्षेत्रासाठी सरकारने जाहीर केलेल्या धोरणांचा लाभ खासगी उद्योगांनी घ्यावा, असे सांगत संरक्षण सेवा, संरक्षण सार्वजनिक क्षेत्र आणि आयुध निर्माण मंडळासोबत चर्चा करून त्यांना आवश्यक ती आयुधं पुरवावीत, असे आवाहन त्यांनी केले. संरक्षण क्षेत्रात भारतीय उद्योगांच्या विकासात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा पुनरूच्चार त्यांनी केला. मात्र उद्योगांनी छोटे फायदे न बघता दीर्घकालीन लाभांसाठी गुंतवणूक करावी, अशी सूचना त्यांनी केली.
भारतीय हवाई दल तंत्रज्ञानदृष्ट्या अत्यंत आधुनिक असल्याचे ते म्हणाले. अलिकडच्या काळात दहशतवादविरोधी कारवायांद्वारे देशाच्या सर्वच सैन्य दलांची सिद्धता स्पष्ट झाली आहे, असे ते म्हणाले. संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाची गरज असून त्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत खासगी क्षेत्रांनी पुढे यावे, असे ते म्हणाले. सरकारने संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक वाढवली आहे. याचा लाभ घेत परदेशी कंपन्यांनी भारतात येऊन कंपन्या सुरू कराव्यात असे राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षण उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या गुणवत्ता मानकांच्या चाचणीसाठी खासगी क्षेत्रांना सरकारी चाचण्यांच्या सुविधा वापरता येतील, अशी घोषणाही राजनाथ सिंह यांनी यावेळी केली.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1582440)
Visitor Counter : 101