संरक्षण मंत्रालय
आयएनएस तर्कश स्पेनमधल्या कॅडीज येथे दाखल
Posted On:
19 AUG 2019 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2019
भारतीय नौदलाच्यावतीने परदेशातल्या बंदरामध्ये संयुक्त कवायती केल्या जातात, त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आता ‘आयएनएस तर्कश’ ही युद्धनौका स्पेनमधल्या कॅडिज बंदरामध्ये दाखल झाली आहे. ‘तर्कश’ तीन दिवसांच्या स्नेहपूर्ण भेटीसाठी स्पेनमध्ये दाखल झाली आहे. याआधी ‘तर्कश’ने अफ्रिका, युरोप आणि रशियातल्या बंदरांना भेटी दिल्या आहेत. ‘तर्कश’ च्या या स्पेन भेटीमुळे उभय देशातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळणार आहे. तसेच सागरी सुरक्षा क्षेत्रामध्ये दोन्ही देशांना एकत्रित कार्य करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. आयएनएस तर्कश कॅडिज बंदरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी संयुक्त कवायतीमध्ये सहभागी होणार आहे.
‘आयएनएस तर्कश’ या युद्धनौकेचे नेतृत्व कॅप्टन सतीश वासुदेव करीत असून ही भारतीय नाविक दलामधली महत्वपूर्ण युद्धनौका आहे. या युद्धनौकेवरून वेगवेगळ्या क्षमतेच्या शस्त्रास्त्रांचा मारा करता येतो. तर्कश नौदलाच्या मुंबईस्थित पश्चिम विभागाच्या ताफ्यामधली सर्व शस्त्रांनीयुक्त युद्धनौका आहे.
कॅडिज बंदरामध्ये ‘तर्कश’ आल्यानंतर स्पेन सरकारमधले अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच नाविक क्षेत्रातले तज्ञ या युद्धनौकेला भेट देणार आहेत. तसेच ‘तर्कश’वर कार्यरत असणाऱ्या नौदलाचे अधिकारीही या स्पेनमधल्या नाविक तज्ञांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय क्रीडा स्पर्धा, इतर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामुळे उभय नाविक दलांमध्ये सामंजस्य निर्माण होऊन संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळणार आहे.
स्पेन आणि भारत यांच्यामध्ये परंपरागत चांगले मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत. उभय देशांची विविध क्षेत्रात व्दिपक्षीय सामंजस्य आणि सहकार्याचे करार केले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये मजबूत ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. सुरक्षित सागरी प्रवास, व्यापार आणि वाहतूक कायम रहावी असे उद्दिष्ट साध्य करण्याचे काम भारतीय आणि स्पॅनिश नाविक दलांना करायचे आहे. यासाठी उभय देश एकमेकांना सहकार्य करीत आहेत.
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
(Release ID: 1582329)
Visitor Counter : 157