माहिती आणि प्रसारण मंत्रालय

उपराष्ट्रपतींच्या दोन वर्षांच्या कार्यकाळावर आधारित 'लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग' पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 11 AUG 2019 7:39PM by PIB Mumbai

चेन्नई, 11 ऑगस्ट 2019

 

370 कलम रद्द करणे हे देशहिताचे आहे असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नईत त्यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळावर आधारित 'लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग' पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. हा राजकीय मुद्दा मानला जाऊ नये, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच जम्मू आणि काश्मीरच्या जनतेच्या भविष्यासाठी हे धाडसी पाऊल उचलण्यात आल्याचे नायडू म्हणाले.

लोकांनी नेहमीच इतिहासातून शिकावे आणि पुढे जावे. याप्रसंगी आपण काश्मिरी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे असे ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग' या पुस्तकाचे प्रकाशन केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले.

राज्यसभेत सर्व सदस्यांची मते ऐकून घेतल्यानंतर दोन तृतीयांश बहुमताने हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचे उपराष्ट्र्पती म्हणाले.

शेतकरी कुटुंबात जन्मल्यावर समर्पण, बांधिलकी, प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर भाजपा आणि सरकारमध्ये नवी उंची गाठणे शक्य झाल्याचे ते म्हणाले. विकासाबाबत लोकांचा दृष्टिकोन बदलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रिफॉर्म, परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म या मंत्राची त्यांनी प्रशंसा केली.

राज्यसभेचे कामकाज सुरळीत चालावे, त्यात व्यत्यय आणणाऱ्या वृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन करतानाच त्यांनी संविधान निर्मात्याचे स्वप्न साकारण्याचे आवाहन खासदारांना केले.

लोकांच्या कल्याणासाठी सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी चेन्नईसह देशाच्या विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन करण्याची गरज आहे कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि न्यायदान व्यवस्था विश्वासार्ह, समान आणि पारदर्शक असायला हव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले.

अपात्र सदस्यांना अन्य पक्षात जाण्यापासून रोखणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

370 कलम रद्द केल्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद संपुष्टात येईल आणि काश्मीरचा विकास होईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. हे याआधीच व्हायला हवे होते असे मत त्यांनी व्यक्त केले.

तरुणपणी कलम 370 विरोधातील चळवळीत सहभागी झालेले नायडू हा प्रस्ताव मंजूर झाला तेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष होते ही महत्वपूर्ण घटना असल्याचे ते म्हणाले.

उपराष्ट्रपतीचे खासदारां बरोबर उत्तम संबंध होते, त्यामुळे राज्यसभेचे कामकाज सुरळीत पार पडले. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात विक्रमी विधेयके मंजूर झाल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

या कार्यक्रमाला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पालानीस्वामी, विविध पक्षांचे खासदार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने चेन्नईच्या रिजनल आउटरीच ब्युरोने उपराष्ट्र्पतींचा विद्यार्थी दशेपासूनचा प्रवास दाखवणारे छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले होते.

    

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane



(Release ID: 1581791) Visitor Counter : 145


Read this release in: English