नौवहन मंत्रालय

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे 309 कोटी रुपये खर्चाने अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टी उभारणार


नव्या लिक्विड जेट्टीमुळे बंदराची क्षमता वार्षिक सुमारे 4 दशलक्ष टनाने वाढण्याचा नौवहन मंत्री मनसुख मांडविया यांना विश्वास

Posted On: 09 AUG 2019 7:40PM by PIB Mumbai

मुंबई, 9 ऑगस्ट 2019

 

मुंबईमध्ये जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे आज अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टीचे केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडविया यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. पेट्रोलियम तेल आणि वंगण, स्वयंपाकाचा गॅस, खाद्य तेल, काकवी आणि रसायने यांसारख्या द्रवरुप मालाची वाढलेली वाहतूक हाताळण्याच्या उद्देशाने 309 कोटी खर्चाचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. द्रवरुप मालाची ने-आण करणाऱ्या जहाजांना या ठिकाणी थांबता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदरांच्या माध्यमातून होणाऱ्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. हे लक्षात घेऊन भारतातील बंदरांचा विकास करण्यात येत आहे आणि जागतिक पातळीवर सुरु असलेल्या कामकाजाला अनुरुप असे त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे असे मांडविया यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांनी प्रत्येक घरात गॅसची शेगडी पोहोचवण्याचा निर्धार केला असल्याने देशात एलपीजी सारख्या द्रवरुप मालाला स्थानिक आणि औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढत आहे. सध्या वार्षिक 6 दशलक्ष टन द्रवरुप मालाची हाताळणी करण्याची जवाहरलाल नेहरु बंदराची क्षमता आहे.  नव्या जेट्टीमुळे या क्षमतेत वार्षिक 4 दशलक्ष टनाने वाढ होईल असा विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला. यामुळे राष्ट्रीय गरजांची पूर्तता अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि त्यामुळे बंदराला देखील त्याचा फायदा होईल असे नौवहन मंत्र्यांनी सांगितले.

त्यापूर्वी मांडविया यांनी सर्व टर्मिनल ऑपरेटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बंदर वापरकर्ते, सेवा पुरवठादार आणि जेएनपीटीचे अधिकारी यांची बैठक घेतली. नौवहन मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मांडविया यांची जवाहरलाल नेहरु बंदराची ही पहिली भेट होती. भूमीपूजन समारंभानंतर त्यांनी चौथ्या कंटेनर टर्मिनलला भेट दिली आणि जेएनपीटी, एसईझेड प्रकल्पस्थळाला भेट दिली. यावेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी उपस्थित होते.  

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1581710)
Read this release in: English