संरक्षण मंत्रालय

20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली

Posted On: 26 JUL 2019 3:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जुलै 2019

 

20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्धस्मारकात जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

भारताची प्रतिष्ठा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कारगिलच्या युद्धात ज्या शूर जवानांनी आपले आयुष्य अर्पण केले त्या जवानांना माझी श्रद्धांजली! त्यांचे शौर्य आणि त्याग सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. या सैनिकांनी केलेला सर्वोच्च त्याग कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरणार नाही. अशी आपण आज कारगिल विजय दिवसानिमित्त प्रतिज्ञा करुया अशी प्रतिक्रिया संरक्षणमंत्र्यांनी या स्मारकाच्या अभ्यागत पुस्तिकेत व्यक्त केली.

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह सैन्यदलांचे प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कारगिल युद्धात ऑपरेशन विजयमध्ये पराक्रम गाजवणाऱ्या सर्व जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

1999 साली मे ते जुलै या कालावधीत भारत-पाकिस्तान यांच्यात झालेले हे जगातले उंच प्रदेशातले सर्वात कठीण युद्ध मानले जाते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जोजिला पास ते पूर्वेकडच्या तुरतूक या गावापर्यंतच्या प्रदेशात झालेल्या या युद्धात भारतीय जवानांनी अतुलनीय पराक्रम गाजवत घुसखोरी करुन भारतीय प्रदेशात आलेले पाकिस्तानी सैन्य परतवून लावले होते. 12,000 फूट उंचावर लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय लष्कराच्या हवाई दलानेही महत्वाची कामगिरी बजावली होती

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1580406) Visitor Counter : 162
Read this release in: English