पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहायक सचिवांच्या उद्‌घाटन सत्रामध्ये केलेले मार्गदर्शन


युवा अधिकाऱ्यांनी सहायक सचिव म्हणून काम करताना समस्यांना नवीन दृष्टिकोनातून पाहून, त्या नव्या विचारानं सोडवाव्यात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आवाहन

Posted On: 02 JUL 2019 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 2017 च्या तुकडीमधल्या जवळपास 160 भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या अधिकाऱ्यांची अलिकडेच भारत सरकारमध्ये सहायक सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी यावेळी मसुरी इथल्या प्रशिक्षण काळात या अधिकाऱ्यांच्या समुहाबरोबर झालेल्या बैठकीतल्या आठवणींना उजाळा दिला.

अधिकाऱ्यांनी बातचीत करताना फिल्डप्रशिक्षणाविषयी आपले अनुभव सांगितले. त्यांनी मसुरी इथं आपल्या प्रशिक्षण वर्गांच्या स़त्रांमध्ये आलेल्या अनुभवांची सांगड घातल्याचं सांगितलं. ज्या अधिकाऱ्यांनी आकांक्षीजिल्ह्यांमध्ये काम केलं होतं, त्यांनी सांगितलं की, या जिल्ह्यांमध्ये अलिकडेच राबवलेल्या विविध योजनांमुळे खूप चांगले, सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

आगामी तीन महिने हे अधिकारी ज्या पद्धतीने कार्यरत राहणार आहेत, ते अतिशय महत्वपूर्ण आणि सुविचारांच्या प्रक्रियेचा एक भाग असणार असल्याचे, पंतप्रधान यावेळी म्हणाले.  या कालावधीमध्ये प्रत्येक अधिका-याजवळ नीतीधोरण निश्चित करण्याची संधी असणार आहे, असंही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अधिकाऱ्यांनी सहायक सचिव म्हणून समस्या सोडवताना, नव्या दृष्टीने, नवीन दृष्टिकोनातून पाहून, त्या नव्या विचारानं सोडवाव्यात, यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहन दिलं.

ते यावेळी म्हणाले, या कार्यक्रमाचा उद्देश सरकारच्या कामामध्ये नावीन्य आणि ताजेपणा आणण्याचा आहे. अनुभवाचा संगम आणि नविनोत्तम  दृष्टिकोन  व्यवस्थेला लाभदायक ठरेल, असंही मोदी म्हणाले.

अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपवलेल्या कामाकडे नवीन आणि जनकेंद्रित दृष्टिकोणठेवावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

अधिकाऱ्यांवर जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती पूर्णपणे पार पडलीच पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

यावेळी त्यानी सूचवलं की, जे दिल्लीमध्ये काम करणार आहेत, त्यांनी स्वतःच्या कामाची  फिल्डमधल्या कामाशी सांगड घालावी. पंतप्रधान कार्यालयामधले राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह, पंतप्रधान कार्यालय आणि कार्मिक तसेच प्रशिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, ही प्रक्रिया पंतप्रधानांच्या सूचनेनुसार पाच वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. यावर्षी 2017 च्या तुकडीतले 169 भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये नियुक्त करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये 27 टक्के महिला आहेत. आणि हे अधिकारी सरासरी 28-29 वयोगटातले आहेत. विशेष म्हणजे या तुकडीमध्ये 111 अधिकारी अभियंते आहेत. तसेच 20 अधिकारी  वैद्यकीय पाश्र्वभूमी असलेले आहेत. यामुळे या अधिकाऱ्यांना डिजिटल भारत आणि आयुष्यमान भारत यासारख्या सरकारच्या योजना चांगल्या पद्धतीनेे समजणे सोपे जाणार आहे.

यावेळी सर्व अधिकाऱ्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी ध्वनिचित्रफितही दाखवण्यात  आली. भारतामध्ये प्रशासकीय सेवाचा पाया घालण्याचे श्रेय सरदार पटेल यांच्याकडे जाते.

यावेळी मंत्रिमंडळाचे सचिव पी.के.सिन्हा, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव डॉक्टर सी. चंद्र मोली आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

 

 

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 



(Release ID: 1576797) Visitor Counter : 66


Read this release in: English