माहिती आणि प्रसारण मंत्रालय

देशाच्या चित्रपट ठेव्याचे जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध – प्रकाश जावडेकर


देशाच्या चित्रपट ठेव्याचे जतन करण्यासाठी एनएफएचएम हा महत्वाचा उपक्रम – माहिती आणि प्रसारण मंत्री

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात चित्रपट जतन आणि रक्षण विषयक नव्या सुविधा येणार - जावडेकर

Posted On: 30 JUN 2019 6:16PM by PIB Mumbai

पुणे, 30 जून 2019

 

देशाच्या राष्ट्रीय चित्रपट ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान हा माहिती अणि प्रसारण मंत्रालयाचा महत्त्वाचा उपक्रम आहे. या उपक्रमाची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. पुण्यातल्या एनएफएआय अर्थात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला त्यांनी आज भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्रालयाच्या नॅशनल फिल्म हेरीटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान या महत्वाच्या प्रकल्पाचा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यक्रमांचाही त्यांनी आढावा घेतला. सुमारे 1.32 लाख चित्रपट रिळांच्या स्थितीच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे आणि प्रतिबंधात्मक संवर्धनाचे काम सुरु आहे, असे सांगून चित्रपट डिजिटायझेशनचे काम लवकरच सुरु होईल, असे जावडेकर म्हणाले. सुमारे तीन एकर जमिनीवर सरकार जतनविषयक नव्या सुविधा (वज्रकक्ष) उभारत आहे, याशिवाय एनएफएआयमधे विविध गटातल्या मुलांसाठी बाल चित्रपट क्लबही राहील, असे ते म्हणाले. नुतनीकरण केलेल्या जयकर बंगल्यात नवी डिजिटल लायब्ररी आणि चित्रपट संशोधकांसाठी विशेष कक्ष राहिल, असेही त्यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान जावडेकर यांनी चित्रपट संघटनेतील मान्यवरांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत चित्रपटाची प्रत कोणत्या स्थितीत आहे, याचे मूल्यांकन, सुमारे 1,50,000 चित्रपट रिळांचे जतन, सुमारे 3500 चित्रपटांचे डिजिटायझेशन, भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाचे स्थान मिळवलेल्या सुमारे 2000 चित्रपटांच्या ध्वनी मूळ स्थितीत आणणे, जतन आणि संरक्षण कप्पे निर्मिती, प्रशिक्षण आणि कार्यशाळा, समावेशक वेब आधारीत माहिती तंत्रज्ञान प्रणाली निर्मिती यांचा समावेश आहे.

M.Chopade/N.Chitale/D. Rane



(Release ID: 1576378) Visitor Counter : 225


Read this release in: English