गृह मंत्रालय

जनगणना, 2021 ची तयारी सुरु


पुण्यातील यशदा येथे 03 ते 11 जून या कालावधीत राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

Posted On: 12 JUN 2019 6:25PM by PIB Mumbai

पुणे, 12 जून 2019

 

भारताच्या महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त, नवी दिल्ली कार्यालयामार्फत देशाच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच जनगणना 2021 ची तयारी सुरु झाली आहे. जनगणना, 2021 च्या पूर्वतयारी अंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालिम म्हणजेच प्री-टेस्टसंपूर्ण देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर, 2019 या कालावधीत होणार आहे.

जनगणनेअंतर्गत माहिती संकलित करण्याच्या पध्दतीमध्ये क्रांतीकारक बदल आगामी जनगणनेमध्ये प्रस्तावित आहे. या जनगणनेत ऑनलाईन पध्दतीने माहिती संकलित होणार असून, भारताचे महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त, नवी दिल्ली कार्यालयाने यासंबंधी दिनांक 3 ते 11 जून, 2019 या कालावधीत यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाचे उद्‌घाटन रश्मी झगडे, भाप्रसे, जनगणना संचालक, महाराष्ट्र यांच्या हस्ते 3 जून, 2019 रोजी झाले. 

राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण मे 2019 मध्ये नवी दिल्ली येथे संपन्न झाले होते. या प्रशिक्षकांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि गोवा राज्यांमधील प्रशिक्षकांना यशदा, पुणे येथे प्रशिक्षण दिले. राज्यस्तरीय प्रशिक्षक या पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील.

प्रशिक्षणाच्या उद्‌घाटनप्रसंगी जनगणना संचालक, महाराष्ट्र यांनी प्री-टेस्ट ही जनगणनेची रंगीत तालिम असल्याने त्यातील प्रत्येक टप्प्यात बिनचूक काम झाल्यास प्रत्यक्ष जनगणनेची प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पध्दती आणि माहिती संस्करणाची पध्दती सुनिश्चित करणे शक्य होईल असे प्रतिपादन केले.

प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी, राज्यस्तरीय प्रशिक्षकांनी, पुणे जिल्हयातील निवडक ग्रामीण व शहरी भागात चाचणीसाठी माहिती संकलन केले. प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमास भारताचे महारजिस्ट्रार आणि जनगण्ना आयुक्त, विवेक जोशी  उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना विवेक जोशी यांनी जनगणना 2021 साठी प्री-स्टेट अत्यंत महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. जनगणना 2021 मध्ये पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाईन पध्दतीने करण्याचे प्रस्तावित असून, त्याची चाचणी प्री- टेस्ट मध्ये होणार आहे. जनगणना 2021 मध्ये माहितीचे संकलन ऑनलाईन पध्दतीने झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी आणि संशोधकांना आवश्यक जणगणनेची माहिती वेळेत उपलब्ध होऊ शकेल.

 

S.Tupe/S.Kane/D.Rane


(Release ID: 1574056) अभ्यागत कक्ष : 303
Read this releasein: English